लेख-समिक्षण

निराशेतून आशेचा शोध घेणारा साहित्यक

दरवर्षी साहित्यातील नोबेल कुणाला जाहीर होणार याकडे सर्व साहित्यप्रेमींचे, वाचनप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले असते. हा पुरस्कार जगभरातील साहित्य कलाकृतींमधील सर्वोत्कृष्ट साहित्याला दिला जात असल्याने त्याचे मोल अनन्यसाधारण असते. गतवर्षी दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांची निवड या पुरस्कारासाठी झाली होती. यंदाच्या वर्षी स्वीडिश अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी हंगेरीच्या लास्झलो क्रॅस्नाहोरकाई यांची निवड केली आहे. हा पुरस्कार जाहीर करताना स्वीडिश अकादमीने व्यक्त केलेले मनोगत क्रॅस्नाहोरकाई यांच्याविषयी सर्व काही सांगून जाणारे आहे. त्यानुसार, लास्झ्लो क्रॅस्नाहोर्काई यांचे कार्य अत्यंत प्रभावशाली आणि दूरदर्शी आहे. प्रलयकाळातही कलेची ताकद दाखवून देणार्‍या, प्रभावी आणि दूरदर्शी साहित्यकृतींसाठी कास्नहोर्कई यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे नोबेल समितीने म्हटले आहे. म्हणजेच अपोकॅलिप्टिक भयाच्या काळातही कला टिकून राहते, यावर विश्वास ठेवणार्‍या त्यांच्या दृष्टिवान लेखनासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
लाझ्लो क्रास्नाहोरकाई यांचा जन्म १९५४ मध्ये लास्लो क्रास्नहोर्कई यांचा जन्म हंगेरीतील रुमानियाच्या सीमेनजीक असलेल्या द्युला शहरात झाला. झेगेद आणि बुडापेस्टमध्ये त्यांनी १९७०च्या दशकात कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर ते साहित्यनिर्मितीकडे वळले. युरोप, आशिया आणि अमेरिका खंडांमध्ये त्यांनी विपुल प्रवास केला आहे. त्या काळात हा देश इतिहासाच्या दडपणाखाली थकलेला होता. या शांत पण वेदनादायी वातावरणातूनच त्यांच्या लेखनाचा जन्म झाला. त्यांच्या कादंबर्‍यांमध्ये नामशेष झालेला विश्वास, माणसाची थकलेली चेतना आणि तरीही जगण्याच्या पोकळीत टिकून राहण्याची जिद्द अनुभवास येते. त्यांची वायरचना लांब आणि काहीशी दुर्बोध असली तरी ती खोल विचारांनी भरलेली असते. त्यांची वाक्ये जणू प्रार्थनेसारखी वाटतात. त्यांच्या प्रसिद्ध कादंबर्‍या ‘सातांतांगो’, ‘द मेलँकली ऑफ रेसिस्टन्स’ आणि ‘वॉर अँड वॉर’ या केवळ कथा नसून प्रगतीच्या फसव्या चित्राचा भंडाफोड करतात. जग बदलत असलं तरी माणसाची भीती, असुरक्षा आणि निराशा कायम आहे, हे या कादंबर्‍यांमधून ते दाखवून देतात. अमेरिकन लेखिका सुसान सॉनटॅग यांनी त्यांना अपोकॅलिप्सचा स्वामी म्हटले होते. त्यांच्या दृष्टीने अपोकॅलिप्स म्हणजे जगाचा अंत नाही, तर अर्थ हरवण्याची अवस्था आहे. आणि हा अर्थ फक्त कलाच पुन्हा जिवंत करू शकते. क्रास्नाहोरकाई यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक बेला टार यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. त्यांच्या मते, क्रास्नाहोरकाई यांना मिळालेला नोबेल पुरस्कार हा मेणबत्तीची एक थरथरणारी ज्योत आहे, जी वार्‍यातही न विझता टिकून राहते.
क्रास्नाहोरकाईंचे लेखन वाचकाला आराम देत नाही, तर ते विचार करायला भाग पाडते. निराशेकडे पाहणे टाळू नका, तिच्याकडे थेट पाहा आणि तिच्यात लपलेला अर्थ समजून घ्या हा संदेश त्यांच्या वाचनातून मिळतो. त्यांच्या लेखनाची तुलना काफ्का, बर्नहार्ड आणि बेकेट यांच्यासोबत केली जाते. या सर्वांनी आधुनिक जगाच्या वेदनेला भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त केले. पण क्रास्नाहोरकाईंची शैली स्वतंत्र आहे. मध्य युरोपच्या अंधुक वातावरणातून जन्मलेली आणि जगभरातील अस्वस्थांशी बोलणारी. त्यांचे अपोकॅलिप्स कोणत्याही धर्माचे नाही, कोणत्याही राष्ट्राचे नाही ‡ ते मानवतेचे अपोकॅलिप्स आहे, जिथे माणूस आपल्या निर्मितीनेच गिळंकृत होत आहे.
२००२ साली हंगेरीचेच लेखक इम्रे केर्तेश यांनी नोबेल पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर जवळजवळ २० वर्षेहंगेरी शांत होती. क्रास्नाहोरकाईंच्या पुरस्कारामुळे ती शांतता पुन्हा एकदा बोलकी झाली आहे. आजचा काळ पुन्हा त्यांच्या कादंबर्‍यांसारखा झाला आहे. हुकूमशाही प्रवृत्ती जगभरात वाढत आहेत, करुणा कमी होत आहे, भाषा आणि वनसंपदा नाहीशी होत आहे. अशा काळात त्यांचे गंभीर साहित्य मोलाचे ठरणारे आहे. क्रास्नाहोरकाई सांगतात, की निराशेकडे थेट पाहणे हेच धैर्य आहे आणि अंधारात लिहिणे हीच खरी आशा आहे.
या पुरस्कारामुळे जगभरात क्रास्नाहोरकाईंच्या पुस्तकांची पुन्हा चर्चा होईल. जुनी पुस्तके पुन्हा छापली जातील, नवीन वाचक निर्माण होतील. काहींना त्यांचे लेखन कठीण वाटेल, पण जे वाचून पुढे जातील त्यांना ते बदलून टाकेल. त्यांच्या कादंबर्‍यांमधील निराशा ही पराभव नसून जाणीव आहे.
क्रास्नाहोरकाई शेवटांबद्दल लिहितात, पण त्यांच्या वायांना शेवट नसतो. ती पुन्हा वळतात, पुन्हा सुरू होतात. जीवनचक्रही असेच सुरू असते. अव्याहत. त्या सातत्यावर, निरंतनतेवर त्यांचा प्रगाढ विश्वास आहे. अर्थ हरवला तरी भाषा अजूनही आश्रय देऊ शकते आणि त्या आश्रयाला क्रास्नाहोरकाई आशा म्हणतात.-डॉ. जयदेवी पवार

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …