महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेहमीच भविष्यातील सत्तासंघर्षाची नांदी मानल्या जातात. नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निकालांनी राज्याच्या राजकारणातील अनेक प्रस्थापित समीकरणे उधळून लावली असली तरी नगरपालिका आणि नगर पंचायतींमधील महायुतीला अनुकूल असणारा जनमताचा कौल या निकालांमधूनही दिसून आला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर, या निकालांनी ‘प्रो-इन्कम्बसी’ म्हणजेच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असलेल्या लाटेवर शिक्कामोर्तब केले आहे. महापालिकांचे निकाल हे महाराष्ट्राच्या वेगाने वाढणाऱ्या महानगरांमधील बदलत्या नागरी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. मुंबईचा बालेकिल्ला ठाकरे परिवाराच्या हातून निसटणे, पुण्यात अजित पवारांच्या करिष्म्याला बसलेली खीळ आणि विदर्भात भाजपला मिळालेले संमिश्र यश, या सर्व घडामोडींचा अन्वयार्थ लावतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नेतृत्वाची आणि अचूक रणनीतीची झलक या निकालांमधून पुन्हा एकदा दिसली आहे. राज्याच्या राजकारणातील ‘डबल इंजिन’ आता ‘ट्रिपल इंजिन’च्या स्वरूपात महानगरांच्या रुळावर धावू लागले आहे.
राज्यातल्या 29 महापालिकांचा निकाल, ज्याच्याकडे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचेही लक्ष होते तो निकाल आता हाती आला असून त्यात भाजपने बाजी मारल्याचे दिसते आहे. भाजपचे लक्षणीय यश मुंबईमध्ये दिसले. त्यांनी तेथे ठाकरे यांची 25 वर्षांची सत्ता काबीज केली आहे. मुंबईचा किंग कोण हा सगळ्यात कळीचा मुद्दा होता. ठाकरे बंधूंनी ज्या हिरीरीने ही निवडणूक लढवली, ती पाहता भाजपने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने तेथे जे यश मिळवले ते लक्षणीय म्हणावे लागेल. बीएमसीच्या 227 जागांपैकी भाजप आणि शिंदे यांच्या युतीने 118 जिंकल्या. तर ठाकरे बंधूंच्या युतीला जेमतेम 72 जागा मिळू शकल्या. त्यात ठाकरे यांच्या शिवसेनेचे यश 65 जागांचे आणि मनसेचे 6 जागांचे आहे. काँग्रेसचे उमेदवार 24 ठिकाणी निवडून आले. मुंबईत काँग्रेसने वंचित बरोबर आघाडी केली आणि वंचितला 61 जागा देऊ केल्या, पण त्यातील 15 ठिकाणी ते उमेदवारच देऊ शकले नाहीत आणि उर्वरित जागांमध्ये त्यांना कसलीच कर्तबगारी दाखवता आली नाही. मुंबईसाठी भारतीय जनता पक्षाने पद्धतशीर व्युहरचना केली त्यामुळे त्यांना तेथे बाजी मारता आली. ठाकरे बंधूंच्या प्रचाराची सारी भिस्त मराठी मतांवर होती. मुंबईत मराठी माणसांचा टक्का जेमतेम 35 टक्क्यांवर आलेला आहे असे सांगितले जाते, मग फक्त एवढ्याच मतदार समूहावर लक्ष केंद्रित केल्याने उर्वरित 70 टक्के मतदार आपोआपच विरोधात जातात ही बाब बहुदा त्यांनी ध्यानात घेतली नाही. त्यातही भाजपचा चाणाक्षपणा असा की त्यांनी मराठी माणसांच्या मतपेढीत शिंदे सेनेच्या माध्यमातून निर्णायक फूट घडवली. त्याचा फटका ठाकरे बंधूंना बसला आणि त्यानुसार जो अपेक्षित निकाल होता तो लागला. मुंबईतील हे अपयश दोन्ही ठाकरे बंधूंना जिव्हारी लागणारे आहे, त्यातून उभारी घ्यायला त्यांना आता बराच वेळ लागेल. राज्याच्या अन्य भागातील महापालिकांचा विचार करता भारतीय जनता पक्षाने अनेक ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला जे एकतर्फी यश मिळाले ते अचंबित करणारे आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला वरचढ जाईल असे चित्र होते आणि पुण्यातही त्यांच्या पक्षाला लक्षणीय यश मिळेल अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करताना विरोधकांचे सगळेच आव्हान मोडीत काढले आहे.
आता काही राजकीय विलेषक म्हणतात की या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष मैदानावर असे चित्र दिसत नव्हते. अजित पवार यांच्या पक्षाच्या बाजूने बऱ्यापैकी वातावरण होते, त्यामुळे भाजपच्या या यशाचे नेमके गमक काय याचे सर्वच अंगांनी विलेषण करायला हवे. या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका अजित पवार यांनी अत्यंत जिद्दीने लढवताना भारतीय जनता पक्षाच्या कारभाराचे मोठे वाभाडे काढले. पिंपरी चिंचवडला कुत्र्याच्या नसबंदीत पण भाजपने भ्रष्टाचार केला, असे नमूद करताना भ्रष्टाचाराचा पाढाच ते तेथील सभांमध्ये वाचून दाखवत होते. पुण्यातल्या सभांमध्येही भाजपच्या गैरकारभाराचे धिंडवडे त्यांनी काढले. त्यांनी नुसता आक्रमक प्रचारच केला नाही, तर काँग्रेस आणि अन्य पक्षाचे प्रबळ उमेदवार त्यांनी आपल्याकडे ओढून भाजपच्या विरोधात मोठे आव्हान निर्माण केले. पण या दोन्ही महापालिकांचा निकाल त्यांच्या दृष्टीने अत्यंत विपरीत लागला आहे.
भारतीय जनता पक्षाला नागपूर, सोलापूर, इचलकरंजी, जालना, नांदेड, संभाजीनगर, नाशिक इत्यादी महापालिकांमध्ये एकतर्फी यश मिळाले. या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरून मोठा असंतोष उफाळून आलेला असतानाही त्यांना येथे मिळालेले हे एकतर्फी यशही अचंबित करणारे ठरले आहे. संपूर्ण 29 महापालिकांचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाने अशी व्युहरचना केली की राज्यात आपल्या बरोबरच सत्तेत असलेल्या शिंदे आणि अजित पवार यांना अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवायला भाग पाडून विरोधी पक्षाची स्पेससुद्धा त्यांच्यामार्फत व्यापणाचा आगळा प्रयोग भाजपने केला. त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्या विरोधात लढलेले हे पक्ष पुन्हा एकत्र करून त्या त्या महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करायला भाजप सिद्ध झाली आहे.
या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या पक्षाला महाराष्ट्रात गलित गात्र झालेला पक्ष असे वारंवार संबोधले गेले, त्या काँग्रेस पक्षाने मात्र आपले राजकीय अस्तित्व बऱ्यापैकी टिकवले आहे. चंद्रपूर, लातूरमध्ये त्यांनी स्पष्ट यश मिळवले. तर भिवंडी, परभणीत ते ठाकरे सेनेच्या मदतीने सत्ता मिळवण्याच्या स्थितीत आहेत. कोल्हापुरातही काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला, पण तेथे महायुतीतील पक्षांची एकत्रित बेरीज केली तर त्यांना कोल्हापूरची सत्ता सोडावी लागेल, असे चित्र आहे. सांगलीतही काँग्रेसने मित्र पक्षांच्या बरोबरीत मोठे यश संपादन केले आहे. भाजपच्या गदारोळात घड्याळाचे काटे उलटे फिरले असले, तुतारीचा आवाज बंद झाला असला तरी लातूरमध्ये मात्र काँग्रेसने आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे. काँग्रेसने वंचितच्या सहकार्याने लातूर महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे. लातूरकर लोकनेते विलासराव देशमुख यांना विसरलेले नाहीत हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. लातूरमध्ये 47 जागा जिंकून काँग्रेसने भाजपला सणसणीत चपराक लगावली आहे.
निवडणूक निकालाचा दिवस हा विजयी राजकीय पक्षांचे आणि उमेदवारांचे अभिनंदन करण्याचा दिवस असतो. कोणी कसे यश संपादन केले, कोणी सत्तेचा आणि पैशाचा किती उन्नतपणे वापर केला याची चर्चा लगेच करून विजयी झालेल्या राजकीय पक्षांच्या आनंदावर विरजण घालणे शिष्टसंमत ठरत नाही. त्यामुळे या बाबींवर या पुढील काळात अधिक नेमकेपणाने बोलता येईल. तूर्त तरी यशवंत आणि यशस्वीनींचे अभिनंदन करण्याशिवाय गत्यंतर नाही. आता महापौरनिवडीसाठीचा घोडेबाजार रंगणार आहे. आतापर्यंत ‘हिंदू महापौर’ असा नारा देणा-या भाजपने मुंबईचा महापौर ‘मराठीच’ होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या निकालांनी देवाभाऊंची ताकद शतपटींनी वाढणार असली तरी एकनाथरावांना सोबत ठेवण्याची अपरिहार्यताही स्पष्ट झाली आहे. अजितदादांसाठी हे निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत. -विश्वास सरदेशमुख,ज्येष्ठ पत्रकार-विलेषक
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र