अॅलिस ऑगस्टा बॉल ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीस विज्ञानाच्या इतिहासात झळाळणारी संशोधिका. १८९२ मध्ये अमेरिकेत जन्मलेल्या या तरुणीला अतिशय कमी आयुष्य मिळूनही मानवी समाजासाठी तिने अमूल्य कार्य करून दाखवले. लहानपणापासूनच ती हुशार, जिज्ञासू आणि परिश्रमी होती. रसायनशास्त्रातील तिला असलेली गोडी पाहता तिने आपल्या शिक्षणाचा संपूर्ण भर विज्ञानावरच ठेवला. हवाई विद्यापीठातून तिने मास्टर्स पदवी मिळवली आणि ती या विद्यापीठाची पहिली महिला तसेच पहिली आफ्रिकन-अमेरिकन पदवीधर ठरली. त्याचबरोबर, तिने या विद्यापीठाची पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला प्राध्यापिका होण्याचा मानही मिळवला. त्या काळात वंशभेद आणि महिलांविषयीचे पूर्वग्रह समाजात घट्ट रुजलेले होते, त्यामुळे तिचे हे यश अपूर्व ठरते.
त्या काळातील वैद्यकशास्त्रातील एक मोठे आव्हान म्हणजे कुष्ठरोग. या रोगाने ग्रस्त झालेल्या लोकांना समाजापासून दूर ठेवले जात असे. त्यांच्यासाठी परिणामकारक औषध जवळजवळ नव्हते. रुग्णांवर एक विशिष्ट तेल वापरण्याचा प्रयत्न केला जात होता, पण ते शरीराला सहन होत नसे किंवा अपेक्षित परिणाम देत नसे. अॅलिस बॉलने हाच प्रश्न हाताळण्याचा निर्णय घेतला. तिने या तेलावर बारकाईने संशोधन केले आणि त्यातील प्रभावी घटक रासायनिक पद्धतीने वेगळे काढले. या घटकांना अशा स्वरूपात तयार केले की ते रुग्णाच्या शरीरात सहज जाईल आणि कुष्ठरोगावर प्रभावी उपचार होईल. ही क्रांतिकारक उपचारपद्धती पुढे ‘बॉल मेथड’ म्हणून ओळखली गेली. तिच्या उपचारपद्धतीमुळे हजारो कुष्ठरोगी रुग्णांना दिलासा मिळाला आणि समाजाने तिला एक खर्या अर्थाने तारणहार मानले.
पण तिच्या आयुष्यात दुर्दैवी वळण आले. फक्त २४व्या वर्षीच अॅलिस बॉलचे अकाली निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर तिच्या संशोधनाचा फायदा घेऊन आर्थर एल. डीन नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने हे निष्कर्ष स्वतःच्या नावाने प्रकाशित केले. त्यामुळे अॅलिसच्या महान कार्याला सुरुवातीला योग्य सन्मान मिळाला नाही. तिच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला नाही. पण काळ जसजसा पुढे गेला तसतसे तिच्या कामाचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले. १९२२ मध्ये अखेर इतिहास दुरुस्त झाला आणि अॅलिस बॉलला तिच्या बॉल मेथड संशोधनाचे खरे श्रेय मिळाले.
तात्पर्य ः खरी प्रतिभा आणि निःस्वार्थी मेहनत कधीच वाया जात नाही. योग्य वेळी तिला मान मिळतोच हे वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश
जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, …
पांचजन्य वृत्तपत्र