लेख-समिक्षण

नायकांचा विवाहमहिमा

बॉलिवूडमध्ये प्रेम आणि नाती नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. काही नाती दीर्घकाळ टिकतात, तर काहींमध्ये दुरावा निर्माण होतो. अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या आयुष्यात एकाहून अधिक वेळा विवाह केले आहेत. काहींनी प्रेमासाठी, काहींनी वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांमुळे, तर काहींनी आयुष्याला नवा सुरुवात देण्यासाठी दुसर्‍या लग्नाचा निर्णय घेतला आहे. सध्या बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या आमीर खान याच्या नव्या प्रेमाची चर्चा सुरू आहे. अर्थात आमीरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बर्‍याचदा चर्चा होत असते. अनेकांना माहीत असेलच की, आमीरने दोन वेळा विवाह असून या दोन्ही नात्यातून तो विभक्त झालेला आहे. 1986 मध्ये रीना दत्ताशी त्याचा पहिला विवाह झाला. रीना त्यावेळी सिनेसृष्टीत नव्हती. मात्र तिने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात एक छोटा रोल केला होता. त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचं झालं, तर दोघे शेजारी राहायचे आणि कॉलेजपासून त्यांचं प्रेम होतं. मात्र, काही वर्षांनी त्यांच्यात दुरावा आला आणि 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या विवाहातून त्यांना दोन मुले आहेत. जुनैद खान आणि इरा खान.
पुढे ‘लगान’ या चित्रपटाच्या सेटवर आमिरची ओळख किरण राव हिच्याशी झाली. किरण या त्या चित्रपटाच्या असिस्टंट डायरेक्टर होत्या. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि 2005 मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील आनंद 2011 मध्ये अजून वाढला, जेव्हा त्यांना सरोगसीद्वारे पुत्र झाला आझाद राव खान. मात्र, 2021 मध्ये आमिर आणि किरण यांनी आपला घटस्फोट जाहीर केला. त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्यातील नातं मैत्रीपूर्ण राहील आणि ते मुलाच्या संगोपनासाठी नेहमी एकत्र असतील.
लग्नाव्यतिरिक्त आमिरच्या अफेअरच्या चर्चाही खूप झाल्या. बॉलीवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं. आमिर व ममता कुलकर्णी यांचं अफेअर होतं असं म्हटलं जातं. त्यावेळी आमिर विवाहित होता. आमिर किंवा ममता यांनी कधीच याबाबत भाष्य केलं नाही. या व्यतिरिक्त आमिरचे नाव अभिनेत्री पूजा भट्टबरोबर जोडले गेले होते. त्यावेळीही आमिर खान विवाहित होता. तसेच आमिर व ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्स यांच्या अफेअरची चर्चाही झाली होती. जेसिकासोबतच्या अफेअरमुळे आमिर खान खूप वादात सापडला होता. ब्रिटिश पत्रकार जेसिकाने दावा केला होता की आमिर खान तिच्या मुलाचा बाबा आहे. रेचल शैलीसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. त्यांनी ‘लगान’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही, असं म्हटलं जातं. तसेच आमिर खान व त्याची ‘दंगल’मधील को-स्टार अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्या अफेअरच्याही खूप चर्चा रंगल्या होत्या. फातिमा आमिरपेक्षा तब्बल 26 वर्षांनी लहान आहे. या दोघांनी ‘दंगल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात फातिमाने आमिरच्या मुलीची भूमिका केली होती. फातिमाला या विषयावरून बरंच ट्रोलही केलं गेलं होतं. मात्र, तिने किंवा आमिरने याबाबत कधीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
आता वयाच्या 60 व्या वर्षी आमीरने आपल्या नव्या नात्याबाबत मोठी घोषणा करत सर्वांना चकित केलं आहे. एका महिलेला अभिनेत्याने जोडीदार म्हणून घोषित केलं असून यामुळे त्याच्या तिसर्‍या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. 13 मार्च रोजी मुंबईत मीडियासोबत एका अनौपचारिक प्री-बर्थडे गेट-टूगेदरमध्ये आमीरने गौरीची ओळख करून दिली. आमिर आणि गौरी गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. गौरी स्प्रॅट ही मूळची बेंगळुरूची असून ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊस आमिर खान फिल्म्समध्ये बर्‍याच दिवसांपासून काम करत आहे. तिने हेअरड्रेसिंगमध्ये काम केले आहे. तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समधून फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफडीए केलं आहे. गौरीची आई तामिलियन असून वडील आयरिश आहेत. तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गौरी 6 वर्षांच्या मुलाची आई देखील आहे.
यानिमित्ताने बॉलीवूडमधील एकाहून अधिक विवाह करणार्‍या नायकांची चर्चाही रंगली आहे. यामध्ये नेहमीप्रमाणेच महानायक अमिताभचे प्रकरणही चर्चेत आले आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांचे प्रेमप्रकरण 70-80च्या दशकात गाजले होते. मात्र, अमिताभ यांनी जया भादुरी यांच्याशी 1973 मध्ये विवाह केला. त्यांच्या नात्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले, पण अमिताभ यांनी कधीही दुसर्‍या विवाहाची पुष्टी दिली नाही. तथापि, काही रिपोर्टनुसार, रेखाशी त्यांनी गुपचूप विवाह केला होता, पण तो अधिकृत मानला जात नाही.
‘खलनायक’ आणि ‘वास्तव’ फेम अभिनेता संजय दत्त याने तीन वेळा विवाह केला आहे. त्याचा पहिला विवाह अभिनेत्री ऋचा शर्मा यांच्याशी झाला. मात्र, ऋचाला ब्रेन ट्युमर झाल्याने 1996 मध्ये तिचे निधन झाले. त्यानंतर संजूबाबाने मॉडेल रिया पिल्लईसोबत दुसरा विवाह केला, पण काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. अखेरीस 2008 मध्ये त्याने मान्यता दत्तशी लग्न केले आणि आज ते एकत्र सुखी आयुष्य जगत आहेत.
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने अमृता सिंग यांच्याशी 1991 मध्ये विवाह केला. मात्र, वयातील मोठ्या अंतरामुळे आणि काही वैयक्तिक कारणांमुळे 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, 2012 मध्ये बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आणि कपूर घराण्याची बेबो करिना कपूर हिच्याशी दुसरा विवाह केला. या दोघांना आता दोन मुले आहेत.
बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकहाण्या गाजल्या, पण काही नाती लोकांच्या मनात कायम कोरली जातात. त्यापैकी एक म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नितांतसुंदर प्रेम! त्यांच्या प्रेमकहाणीने 70-80च्या दशकात बॉलिवूडमध्ये खळबळ उडवली होती. दोघांच्या नात्याला अनेक अडथळे आले, पण शेवटी त्यांनी प्रेमासाठी सर्व काही झुगारून एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं ठरवलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट 1970 मध्ये ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्या वेळी धर्मेंद्र आधीच प्रकाश कौर यांच्याशी विवाहबद्ध होते आणि त्यांना चार मुले होती, सनी देओल, बॉबी देओल, अजीता आणि विजेता. हेमा मालिनी या त्या काळातील ‘ड्रीमगर्ल’ होत्या, आणि त्यांना अनेक मोठमोठ्या नायकांनी प्रपोज केलं होतं, पण त्यांचं मन धर्मेंद्रकडे ओढलं गेलं. धर्मेंद्र यांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली, पण मोठी अडचण अशी होती की, त्या काळातील हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करता येत नव्हतं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं प्रेम जसजसं वाढत गेलं, तसतसे त्यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या. धर्मेंद्र यांना पहिली पत्नी घटस्फोट देण्यास तयार नव्हती, त्यामुळे त्यांनी एक वेगळाच मार्ग स्वीकारला. 1979 मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि निकाह लावला. धर्मेंद्र यांनी आपलं नाव ‘दिलावर खान’ ठेवलं, तर हेमा मालिनी यांचं नाव ‘आयशा बी’ असं ठेवलं. त्यानंतर त्यांनी गुपचूप विवाह केला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत ईशा देओल आणि अहाना देओल.
गायक आणि अभिनेता किशोर कुमार यांनी तब्बल चार लग्ने केली होती. त्यांचा पहिला विवाह बंगाली गायिका आणि अभिनेत्री रुमा गुहा ठाकुर्ता यांच्याशी झाला. नंतर त्यांनी मधुबालाशी लग्न केले, मात्र मधुबालाच्या अकाली निधनामुळे ते एकटे पडले. त्यानंतर योगिता बाली आणि शेवटी लीना चंदावरकर यांच्याशी विवाह केला.
बॉलीवूडचा एकेकाळचा सदाबहार अभिनेता आणि अलीकडील काळात दक्षिणेकडील राजकीय क्षेत्रात उतरलेल्या कमल हसन यांनी पहिल्या पत्नी वाणी गणपती यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री सारिका यांच्याशी विवाह केला. मात्र, काही वर्षांनंतर त्यांच्याही नात्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले. नंतर गौतमी ताडिमल्ला यांच्यासोबत त्यांनी दीर्घ काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले.
कबीर बेदी यांनी चार वेळा विवाह केला आहे. त्यांचा पहिला विवाह प्रोतिमा बेदीसोबत झाला होता, त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फॅशन डिझायनर सुजान हंफ्रीस हिच्याशी लग्न केले. तिसर्‍या वेळी त्यांनी टीव्ही होस्ट निक्की बेदी हिच्याशी लग्न केले. अखेरीस, 70 वर्षांनंतर त्यांनी परवीन दुसांज हिच्याशी चौथ्या लग्नगाठीत अडकले.
टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेता करन सिंग ग्रोवर यानेही तीन लग्ने केली आहेत. त्याचा पहिला विवाह शद्धा निगमशी झाला, मात्र ते फार काळ टिकले नाही. नंतर त्याने अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्याशी विवाह केला, पण त्यांचाही घटस्फोट झाला. अखेरीस, 2016 मध्ये त्याने बिपाशा बसू हिच्याशी लग्न केले.
एकूण काय तर, बॉलिवूडमध्ये प्रेम आणि नाती नेहमीच चर्चेत राहतात. कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. काहींनी प्रेमासाठी दुसर्‍यांदा लग्न केले, काहींनी नात्यांमधील गुंतागुंतीमुळे विवाहसोहळे केले. पण या सर्व कहाण्या हेच दाखवतात की, नातींमध्ये असलेला विश्वास आणि समजूतदारपणा किती महत्त्वाचा असतो!- सोनम परब

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …