काळानुसार बदलणे हा मानवी स्वभाव असला आणि हा बदल अपरिहार्य असला तरी त्याला नैतिकतेची, नीतीनियमांची चौकट असावीच लागते. ही चौकट अप्रत्यक्ष असते; पण तिचे परिणाम प्रत्यक्ष असतात. बॉलीवूडमधील नायकांबाबत या विषयाच्या अनुषंगाने विचार केल्यास पूर्वीच्या नायकांमध्ये आणि आजच्या नायकांमध्ये एक मुलभूत फरक दिसतो, तो म्हणजे आज पैसा मिळवण्यासाठी नायकांनी आपल्या स्टारडमचा समाजमनावर होणारा परिणाम हा मुद्दाच विचारात घेणे सोडून दिले आहे. त्यामुळेच पानमसाला, मद्य यांसारख्या जाहिराती ते बिनधास्तपणाने स्वीकारताना दिसतात. – सोनम परब, सिनेअभ्यासक
्
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास शंभर वर्षांहून अधिक जुना आहे. या काळात नायकांचं रुप, भूमिका आणि समाजावरचा प्रभाव सतत बदलत गेला आहे. जुन्या काळातील हिरो आणि आजच्या काळातील नायक यांच्यात अनेक बाबतींत मूलभूत फरक दिसून येतो. दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, गुरुदत्त यांचं व्यक्तिमत्त्व सोज्वळ, साधं, आणि भावनिक असायचं. शरीरयष्टी सरळ, मध्यम बांधा असलेली असायची. ते सामान्य माणसाशी जवळीक साधणारे वाटायचे. याउलट हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांसारखे नवे हिरो फिटनेसवर भर देतात. सिस पॅक, मस्युलर शरीर आणि स्टायलिश लुक हे त्यांच्या ओळखीचे वैशिष्ट्य आहे.
पूर्वीच्या काळातील चित्रपटातील नायक आपल्या नायकत्वाच्या प्रतिमेचा अतिशय जपून विचार करत. केवळ पैशासाठी ते आपल्या मूल्यांशी तडजोड करत नसत. दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर या लोकप्रिये नायकांचे स्टारडम वेगळ्या प्रकारचे होते. त्यात एक प्रकारचा आत्मगौरव होता. मात्र आजकालचे बहुतांश नायक कोणत्याही प्रकारची जाहिरात करायला तयार असतात. मग ती कितीही अवास्तव किंवा भ्रामक का असेना.
आजचे नायक ः भौतिक आकर्षणात हरवलेले
नव्या युगातील बहुतांश नायक नायकसुलभ जबाबदारी स्वीकारताना दिसत नाहीत. आजच्या भौतिकतावादी स्पर्धेत ते स्वतःची जाण व भान हरवत चालले आहेत. एक काळ होता, जेव्हा नायक त्यांच्या प्रतिमेप्रती गंभीर असायचे. केवळ पैसे मिळवण्यासाठी काहीही करणे हे त्यांच्या तत्त्वांना पटणारे नव्हते. तेव्हा बाजारपेठेचा पसाराही आजच्याएवढा मोठा नव्हता. तरीही जाहिरातीसाठी काही मार्ग खुलेच होते. मोठ्या नायकांचा प्रभाव तेव्हाही अफाट होता. त्यांच्या पोस्टर्सचा, स्वाक्षरी केलेल्या कार्डस्चा यांचा जबरदस्त बोलबाला होता. दिलीपकुमार, देवानंद आणि राज कपूर यांची लोकप्रियता गगनाला भिडणारी होती. मात्र त्यांच्या स्टारडममध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा, सयंम आणि मर्यादा होती.
दिलीप कुमार ः बॉलीवूडचे महानायक दिलीप कुमार यांनी त्यांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत फक्त ५५-६० चित्रपटच केले. अभिनयासाठी त्यांनी स्वतःला कधीही ‘मशीन’ बनू दिले नाही. प्रत्येक शॉट विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक घेत असत. बी.आर. चोप्रांच्या दास्तान चित्रपटाचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. एकदा संध्याकाळी शेड्यूल संपण्यापूर्वी त्यांच्याकडे विनंती करण्यात आली की, फक्त पाच मिनिटांचा एक शॉट राहिलाय, तुम्ही ड्रेसअपमध्ये आहातच, तर आत्ताच हा शॉट पूर्ण केला तर दिवसभराचं काम पूर्ण होईल. पण दिलीप साहेबांनी नकार दिला. अभिनय त्यांच्या दृष्टीने आत्मानुभूतीचा विषय होता, व्यवहाराचा नाही.
देव आनंद ः सदाबहार देव आनंद यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीच गेस्ट रोल केला नाही. शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाच्या अखेरच्या दिवशी अनेक दिग्गजांना छोट्या झलकासाठी बोलावले होते. फराह खानने देव साहेबांशी संपर्क साधला, पण त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.
राज कपूर ः ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाच्या अपयशाने राज कपूर फार व्यथित झाले होते. आर्थिक संकटात असताना करीम लाला व हाजी मस्तान या दोन कुख्यात तस्करांनी त्यांना मदतीचा प्रस्ताव दिला होता. पैसा आम्ही देतो, तुम्ही फक्त पुढची फिल्म तयार करा. पण राज कपूर यांनी ठामपणे नकार दिला. त्याऐवजी त्यांनी आपली संपत्ती गहाण ठेवून एक गाजलेला आणि यशस्वी चित्रपट बनवला, तो म्हणजे ‘बॉबी’.
चित्रपट इतिहासतज्ज्ञ राजगोपाल नांबरियार सांगतात की, काही जुन्या कलाकारांनी या परंपरेपासून वेगळी भूमिका घेतली. १९४९ मध्ये अशोक कुमार आणि मीना कुमारी यांनी एका छोटेखानी जाहिरात चित्रपटात काम केले होते. यानंतर अशोक कुमार, शम्मी कपूर यांनी अनेक जाहिरातीत काम केले. पुढे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या नायकांनी जाहिरात जगतात जबरदस्त काम केले. रणवीर सिंहसारख्या अभिनेत्याने पद्मावतनंतर जाहिरात विश्वात मोठा धमाका केला.
सनी देओल ः या सगळ्यांमध्ये सनी देओलने स्वतःला जाहिरात विश्वात मर्यादित ठेवले आहे. त्याने निवडक जाहिरातीतच काम केले. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची फी खूपच जास्त असते. गदर-२ साठी त्याने २० कोटी रुपये घेतले. आता ‘१९४७ लाहौर’ या आमिर खानच्या चित्रपटासाठी त्याची फी २५ कोटी आहे.
जाहिरात जगताचा विस्तार
बॉलिवूडमधील कलाकारांचा लोकांवर प्रचंड प्रभाव असतो. त्यामुळे दिग्गज कंपन्या नामांकित अभिनेत्यांना आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी निवडतात. केवळ चित्रपटांपुरतेच त्यांचे व्यक्तिमत्त्व मर्यादित राहत नाही, तर ते ब्रँड अॅम्बेसेडर बनून जनमानसावर विपणनाचा प्रभाव टाकतात. गेल्या काही वर्षांत जाहिरात विश्वाचा चेहरामोहरा बदलला आहे. म्हणूनच चित्रपटांव्यतिरिक्त प्रत्येक सार्वजनिक उपस्थितीबाबतही कलाकार सजग असतात. यामुळे जाहिरातींचे मोठमोठे काँट्रॅट्स् मिळवणे हा प्रमुख हेतू असतो. परंतु सामाजिक जीवनात आपली इमेज जपणारे काही कलाकार हे जाहिरातींचे प्रस्ताव स्वीकारताना त्या उत्पादनांच्या परिणामांचा विचार करत नाहीत. अलीकडील काळात शाहरुख खान, आमीर खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारख्या अनेक कलाकारांनी पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही नैतिक गाईडलाइनचे पालन केलेले नाही. पान मसाल्यापासून ते वस्त्रांच्या जाहिरातींपर्यंत सर्वकाही करून त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा कमावला आहे. पूर्वीचे नायक नायकत्वाची जबाबदारी स्वीकारत असत. त्यांचा अभिनय फक्त करिअर नव्हता, ती त्यांच्या मूल्यांची, लोकांवरील प्रभावाची एक अभिव्यक्ती होती. आजच्या नायकांसाठी बर्याच वेळा पैसा हा एकमेव निकष झाला आहे. अशा वेळी जुने आदर्श आठवणे आणि त्यातून शिकणे आवश्यक ठरते. बॉलिवूडमधील कलाकारांच्या जाहिरातींना लोक अंधपणे स्वीकारतात. म्हणूनच जेव्हा बॉलिवूड कलाकार तंबाखू, गुटखा, किंवा पानमसाल्यासारख्या आरोग्यविरोधी उत्पादनांची जाहिरात करतात, तेव्हा नैतिकतेचा, समाजप्रभावाचा आणि कायदेशीरतेचा प्रश्न उपस्थित होतो. तंबाखूजन्य उत्पादनांवर भारतात जाहिरातबंदी आहे. मात्र उत्पादक कंपन्या पानमसाला, एलिट स्पाईस मिस, बॅलेंस्ड लाईफस्टाइल अशा नावाखाली आपले उत्पादन बाजारात प्रसिद्ध करतात. या प्रक्रियेत सेलिब्रिटींना वापरून आरोग्याला घातक उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार केला जातो. जर एखादा लोकप्रिय अभिनेता एखाद्या पानमसाल्याच्या जाहिरातीत हसतमुखपणे सहभागी होत असेल, तर त्याचा सामाजिक संदेश असा जातो की हे उत्पादन सुरक्षित आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांनी तंबाखू-पानमसाल्यासारख्या उत्पादनांची जाहिरात करताना केवळ आर्थिक लाभ न पाहता समाजातील युवावर्ग, त्यांच्यावर असणारा आपला प्रभाव, आरोग्यप्रणाली आणि त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेवर होणारा परिणाम विचारात घ्यायला हवा. हा एक केवळ विपणनाचा मुद्दा नाही, तर सामाजिक आणि नैतिक जबाबदारीचा प्रश्न आहे.
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र