जोडीदार असो, मित्र असो किंवा अन्य कौटुंबिक नाते असो, किंबहुना प्रोफेशनल रिलेशन्स असले तरी हे नाते निभावणे आणि टिकवणे ही कला आहे. ज्यांना ही कला जमली त्यांचं आयुष्य आनंदमय आणि आनंददायी झालं. पण ही कला काही नियमांसह येते. यामध्ये सर्वांत महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे अगदी छोट्या-छोट्या सवयीही या नात्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात.
सबब तुम्हाला तुमचे नाते दीर्घकाळ टिकवायचे असेल, तर लवकरात लवकर या सवयींमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील बनले पाहिजे. वर उल्लेख केलेल्या नात्यांमध्ये जोडीदारासोबतचे नाते प्राधान्यस्थानी असावे.
तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये वारंवार हस्तक्षेप करता का? याचे उत्तर होय असेल, तर ही सवय तात्काळ बदलली पाहिजे.वैयक्तिक आयुष्यात सतत दुसऱ्याचा हस्तक्षेप हा नात्यांमधील घुसमट वाढवतो. याचा अतिरेक झाल्यास नातेसंबंध दुभंगू शकतात. काही जणी आपल्या जोडीदाराच्या कुटुंबीयांची म्हणजेच सासू, सासरे, नणंदा, त्यांचे नवरे, त्यांची मुलं अशा व्यक्तींना शोधून शोधून त्यांची सतत निंदा करतात किंवा त्यांच्या चुका काढत बसतात. तुम्हीही असंच करत असाल, तर वेळेवर ही सवय बदलणं शहाणपणाचं ठरेल. अन्यथा वैवाहिक नात्यात वितुष्ट निर्माण होऊ शकते.
बऱ्याच जणांना आपले निर्णय स्वतः घेण्याची सवय असते. त्यात चुकीचे असे काहीच नाही. पण तुम्ही एखाद्या नात्यात असता, तेव्हा आपले काही निर्णय हे जोडीदाराच्या आयुष्यावर सुद्धा परिणाम करत असतात. अशा निर्णयांपूर्वी तुम्ही जोडीदाराशी सल्लामसलत केली पाहिजे. अन्यथा ही मानसिकता नात्यात दुरावा निर्माण करणारी ठरू शकते.
थोडक्यात, एक मजबूत आणि प्रेमळ नाते टिकवण्यासाठी केवळ मोठ्या गोष्टींचा नव्हे तर लहानसहान सवयींचा सुद्धा विचार करणे आवश्यक असते. परस्पर आदर, मोकळेपणा आणि विश्वास हाच कोणत्याही नात्याचा पाया असतो. जर हे टिकवायचे असेल, तर वरील त्रुटींवर लक्ष देऊन वेळेत सुधारणा केली पाहिजे.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र