दुल्हे का सेहरा सुहाना लगता है’ असं एक प्रसिद्धी चित्रपटगीत आहे. लग्न चित्रपटाच्या पडद्यावरचं असो किंवा वास्तव आयुष्यातील असो, नवर्या मुलाचा चेहरा खर्या अर्थाने त्याच्या डोक्यावरील फेट्यामुळेच उठून दिसत असतो. नवर्या मुलाच्या डोक्यावर फेटा बांधणं हा केवळ आपल्या परंपरेचाच भाग आहे असं नाही तर तो नवर्या मुलाचा लूकही खास बनवतो. फॅशनेबल नवर्या मुलाने फेट्याची निवड करताना थोडीशी चूक केली तर त्याचा इतर पोशाख फिका तर पडेलच पण, त्याचबरोबर त्याचा रुबाबही ढीला पडेल. त्यामुळे फेट्याची निवड करताना नवर्या मुलाला रॉयल लूक कसा मिळेल याची काळजी घ्यायला हवी.
आता पगडी स्टाईलचा फेटाही मिळतो. राजस्थानी पगडीचा थाट काही आगळाच आहे. लग्नामध्ये हेवी शेरवानी, कुर्ता किंवा बंद गळ्याच्या कोटवर पगडीचा लूक खूप जमून येतो. गोर्या किंवा गव्हाळ रंगाचे लोक लाल, पिवळा किंवा त्यासारख्या रंगाच्या पगडीची निवड करु शकतात. सावळ्या रंगावर मरुन, गुलाबी यासारख्या शेडसची पगडी उठून दिसेल. आपल्याला हवं असेल तर आपण कॉटन किंवा सिल्कच्या रंगीबेरंगी पगडीसोबत स्टोन किंवा मोत्याचा ब्राँचही लावू शकता. त्यामुळे नवर्या मुलाचा लूक आणखीनच शाही भासेल.
फुलं किंवा मोत्यांच्या छोट्या छोट्या माळा असणार्या फेट्यांची चलती दक्षिण भारतात अधिक आहे. यामध्ये नवर्या मुलाचा संपूर्ण चेहरा फुलांच्या किंवा मोत्यांच्या माळांनी सुशोभित होतो. खासकरुन उंच लोकांना हा फेटा आणखीनच उठून दिसतो. त्याची निवड करताना त्यामध्ये वापरण्यात आलेली फुलं एकदम ताजी असतील याकडे लक्ष द्यायला हवं. त्यांचा सुगंध मंद असावा आणि त्यामुळे आपल्याला अॅलर्जी होणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवं.
पगडी किंवा फेट्यांची खरेदी करताना ते फार घट्ट असणार नाहीत आणि फार सैलही असणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावं. फार घट्ट फेट्यामुळे अनेकदा फार घाम येतो. तो सैल असेल तर त्याचा डोक्यावर सांभाळ करणं अवघड होतं. केवळ फेटाच नाही तर नवर्या मुलाच्या इतर पोशाखाकडेही तेवढंच लक्ष द्यायला हवं. थ्री पीस असो किंवा शेरवानी असो, नवर्या मुलाच्या पर्सनॅलिटीनुसारच त्याच्या पोशाखांची निवड करावी. तसं केलं तर लग्नाच्या चित्रपटातील तो खरा हिरो बनू शकतो. नवर्या मुलाच्या पोशाखासाठी पर्यायांची कमतरता नाही. सूट, कुर्ता, पायजमा, शेेेरवानी, जोधपुरी कुर्ता, बंद गळ्याचा सूट असे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण, आपल्याला कोणत्या कार्यक्रमाच्या वेळी कोणता ड्रेस वापरायचा आहे त्यानुसारच पर्यायांची निवड करावी. उदाहरण द्यायचं झालं तर लग्नाच्या दिवशी जोधपुरी कुर्ता, रिसेप्शनच्या वेळी सूट किंवा बंद गळ्याचा सूट यासारखे पर्याय चांगले ठरु शकतात.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र