लेख-समिक्षण

‌‘धुरंधर‌’ देवाभाऊ

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणाचा इतिहास, भूगोल आणि व्याकरण बदलले असल्याची साक्ष देणारे आहेत. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीने या निवडणुकांत दणदणीत विजय मिळवताना राज्यातील 288 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी तब्बल 215 ठिकाणी अध्यक्षपदे आपल्या ताब्यात घेतली आहेत. याउलट काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून केवळ 51 अध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकांत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. पक्षाने 129 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवला. विशेष म्हणजे 2017 च्या स्थानिक निवडणुकांतील 1,602 नगरसेवकांवरून यावेळी भाजपची संख्या 3,325 वर पोहोचली आहे. शहरी आणि निमशहरी भागांत पक्षाची संघटनात्मक पकड लक्षणीय रीत्या वाढल्याचे हे द्योतक आहे.
महायुतीच्या या विजयामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते, घटक पक्षांचे शीर्षस्थ नेते या सर्वांचा मोलाचा वाटा असला तरी या यशावर एकहाती प्रभाव आहे ते देवाभाऊंचा म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पिछेहाटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या तडफदारपणाने आणि कौशल्याने राजकीय समीकरणांना नवे आयाम दिले त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकांमध्ये ढळढळीतरित्या दिसून आले. महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासात आणि भाजपच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात कधीही मिळाले नव्हते इतके यश यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळाले. या निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह 32 आमदारांच्या साहाय्याने महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याची किमयाही देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वासामुळेच शक्य झाली होती. त्यापाठोपाठ अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सामावून घेण्याचा फडणवीसांचा निर्णयही मास्टरस्ट्रोक ठरला. सुरुवातीला यामुळे भाजपाला फटका बसेल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांदरम्यान दिलेल्या मुलाखतींमधून या बेरजेच्या राजकारणाचे तर्कशास्र प्रभावीपणे पटवून दिले आणि जनतेने त्यावर ठेवलेला विश्वास विधानसभा निकालांमधून दिसून आला. या दोन्ही पक्षांना सोबत घेतल्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे राजकीय चित्र पालटणार हे स्पष्ट झाले होते. नगरपालिका-नगरपंचायतींच्या निवणुकांमधून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यातील 288 पैकी 129 नगराध्यक्ष एकट्या भाजपचे निवडून आले आहेत. 2017 मध्ये हा आकडा 94 होता. महायुतीने एकूण 75 टक्के नगराध्यक्ष पदे पटकावली आहेत. 2017 मध्ये भाजपचे 1602 नगरसेवक होते. 2025 च्या निवडणुकीत ही संख्या दुपटीने वाढून 3,325 झाली आहे. राज्यातील एकूण नगरसेवकांपैकी एकट्या भाजपकडे 48 टक्के नगरसेवक आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे आणि अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचे हे फलित आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात भाजपचा विस्तार केला आहे तो पाहिला असता राजकीय व्यवस्थापनशास्रातले अत्युत्तम उदाहरण म्हटले पाहिजे. सत्तेतून बाहेर फेकले गेल्यानंतरही न खचता, त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून बजावलेली भूमिका असो किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी दाखवलेला संयम आणि अभ्यासू वृत्तीने केलेले काम असो; राज्याच्या राजकारणात अशा प्रकारचे उदाहरण इतिहास आणि वर्तमानात नाही हे वास्तव आहे. ज्या ग्रामीण महाराष्ट्रात भाजपची ताकद एकेकाळी नगण्य किंवा दुर्लक्षित होता तिथे आज घराघरात कमळ पोहोचले आहे. याचे मुख्य श्रेय फडणवीस यांच्या ‌‘गाव तिथे शाखा‌’ आणि ‌‘बूथ प्रमुख‌’ या संकल्पनांच्या अंमलबजावणीला जाते. ग्रामीण भागातील जनतेला केवळ भावनिक साद न घालता त्यांच्या विकासाच्या प्रश्नांना हात घालणे आणि प्रामाणिकपणाने त्यांची सोडवणूक करणे हे फडणवीस यांच्या धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. मग ते जलयुक्त शिवार योजनेचे पुनरुज्जीवन असो वा शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याची ‌‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना‌’ असो, ‌‘लाडकी बहीण‌’ योजना असो किंवा सात बाराचा निर्णय असो; या प्रत्येक योजनेने ग्रामीण भागातील मतदारांच्या मनात देवाभाऊंबद्दल एक विश्वासाचे नाते निर्माण केले.
फडणवीस यांच्या राजकीय धोरणांमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‌‘परफेक्टनेस‌’. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कोणाशी युती करायची, कोणत्या जागांवर ताकद लावायची आणि कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवायचे, याचा अभ्यास ते अत्यंत शास्त्रीय पद्धतीने करतात. महायुतीच्या जागावाटपावेळी त्यांनी ज्या संयमाने आणि मुत्सद्देगिरीने निर्णय घेतले, त्यामुळेच आज 75 टक्क्यांहून अधिक नगरपालिकांवर महायुतीचा भगवा फडकत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानले जायचे; परंतु फडणवीस यांनी हा सहकाराचा अक्ष पूर्णपणे भाजपाकडे वळवला आहे. अनेक साखर कारखाने आणि दूध संघांच्या निवडणुकांमध्ये भाजप किंवा मित्रपक्षांनी मिळवलेला विजय हा याच धोरणात्मक बदलाचा भाग आहे.
गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या कामगिरीचा आलेख पाहिला तर त्यांनी या शास्रात प्राविण्य मिळवले असल्याची मनोमन साक्ष पटते. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाची क्षमता पारखून त्याला योग्य स्थान देणे आणि कार्यकर्त्यांच्या फौजेला निवडणुकीच्या मैदानात बूथ स्तरावर सक्रिय करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य भाजपच्या विस्ताराचे आणि महायुतीच्या सलग विजयाचे मुख्य कारण ठरले आहे.
महाराष्ट्राची सामाजिक गुंतागुंत मोठी विलक्षण आहे. फडणवीस हे उच्चवर्णीय असल्याने त्यांच्यासाठी ही गुंतागुंत सोडवणे अधिक क्लिष्ट होते. परंतु विविध जातीसमुदायांचे प्रश्न मुळाशी जाऊन समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांना तोड नाही. राजकारणात केवळ गर्दी जमवणारा नेता असून चालत नाही, तर त्या गर्दीला दिशा देणारा, गर्दीत बसलेल्यांचे प्रश्न संवेदनशीलपणाने समजून घेऊन त्यांचे निराकरण करणारा ‌‘अभ्यासू‌’ नेता असावा लागतो. देवाभाऊंचा कामाचा झपाटा, प्रशासनावरील पकड, कायद्याचे आकलन, अर्थकारणातील प्राविण्य आणि तांत्रिक विषयांवरील त्यांचे प्रभुत्व हा अनेक गुणांचा समुच्चय त्यांना ‌‘स्टेटस्‌‍मन‌’ बनवणारा आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतरही गाफील न राहता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतः मैदानात उतरून सभा घेणे आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणे, ही त्यांची कार्यपद्धती त्यांच्यातील अजेय विजिगीषु वृत्तीचे दर्शन घडवते. सध्याच्या बेताल राजकारणामध्ये राहूनही प्रचंड संयमी आणि आक्रमक भाषणातही तोल ढळू न देणारी समतोल वक्तृत्वशैली त्यांना मैदान गाजवणाराच नव्हे तर गर्दीचे रुपांतर प्रत्यक्ष मतांमध्ये परावर्तीत करणारा वक्ता म्हणून पुढे आणणारी ठरली आहे. -हेमचंद्र फडके

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …