मुदहशतवाद हा जगाचा सर्वांत मोठा शत्रू आहे असं भारतासह अनेक देश मानतात, कारण दहशतवादाची विविध रूपं या देशांनी पाहिली आहेत; भोगली आहेत. एखाद्या शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना अचानक गोळीबार सुरू होतो आणि अनेकांना रस्त्यातच अखेरचा श्वास घ्यावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी एखादा भरधाव ट्रक घुसतो आणि लोकांना चिरडून निघून जातो. ‘सायबर टेररिझम’ हा नवाच प्रकार सध्या जग अनुभवत आहे. ‘डीप नेट’मध्ये घुसखोरी करून दहशतवादी अत्यंत संवेदनशील माहिती पळवून तिचा गैरवापर करीत आहेत. महत्त्वाच्या सरकारी आणि बिगरसरकारी संस्थांच्या संगणकीय यंत्रणा ‘हॅक’ करत आहेत. परंतु दहशतवादाचा जो नवा प्रकार समोर आला आहे, तो विशेषत्वाने भारतासाठी आत्यंतिक धोकादायक आहे. या प्रकाराचं नाव आहे ‘अॅग्रो टेररिझम’ अर्थात कृषी दहशतवाद. भारताची निम्म्याहून अधिक लोकसंख्या उपजीविकेसाठी आजही शेतीवर अवलंबून आहे. जीडीपीमध्ये शेतीचा वाटा किती, यापेक्षा किती लोकांना रोजगार देण्याची क्षमता शेतीमध्ये आहे, ही बाब अधिक महत्त्वाची. कारण रोजगारामुळं क्रयशक्ती (पर्चेसिंग पॉवर) निर्माण होते आणि त्यामुळंच बाजारपेठेत हालचाल निर्माण होते. निम्म्याहून अधिक लोकसंख्येची क्रयशक्ती शेतीवर ठरत असेल तर भारताने या नव्या प्रकारच्या दहशतवादाकडे गांभीर्याने पाहायला हवं. अत्यंत क्रूरपणे आणि कुणाला कानोकान खबर न लागू देता शेतीवर हल्ला करण्याची योजना आखली जात आहे.
अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेने दोन चिनी नागरिकांना नुकतीच अटक केली. ‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरम’ नावाची आत्यंतिक धोकादायक बुरशी त्यांच्याकडे आढळून आली. हेच कृषी दहशतवादाचं प्रमुख ‘अस्त्र’ असल्याचं सांगितलं जात आहे. ही बुरशी पिकांवर रोग पसरवून संपूर्ण पीक नष्ट करू शकते आणि जमिनीची गुणवत्ताही कमी करू शकते. दहशतवादाचं हे नवं रूप घातक अशासाठी आहे, की यात कोणत्याही पारंपरिक शस्त्राचा वापर केला जात नाही. थेट कुणाचाच जीव घेतला जात नाही; परंतु त्याद्वारे एक दूरगामी कट रचला जात असल्याचा संशय आहे. अन्यथा कुणी बुरशी सोबत घेऊन फिरावं, यासाठी कोणतंही तार्किक कारण दिलं जाऊ शकत नाही. या बुरशीमुळं ‘हेड ब्लाइट’ नावाच्या रोगाचा प्रसार करते आणि या बुरशीजन्य रोगामुळं जगात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत. मानवाच्या यकृतालाही धोकादायक ठरू शकेल अशी ही बुरशी सोबत बाळगणंच मुळात संशयाला जन्म देणारं आहे आणि त्यातून ‘अॅग्रो टेररिझम’ जन्माला घालण्याचा डाव असावा, या शंकेला पुष्टी मिळते.
कोणत्याही देशाच्या दृष्टीने सुरक्षा जितकी महत्त्वाची तितकीच अन्नसुरक्षाही महत्त्वाची असते. अन्नधान्य आणि अन्य कृषी उत्पादनात झपाट्याने घसरण झाल्यास देशाची अन्नसुरक्षा धोयात येऊ शकते. मुळात असे जैविक हल्ले सुरुवातीच्या काळात समजूनसुद्धा येत नाहीत, कारण या बुरशीची आणि अन्य धोकादायक जैविक घटकांची वाढ अत्यंत धीम्या गतीने होते. पहिल्या टप्प्यावर न कळणार्या कॅन्सरइतकाच हा कृषी दहशतवाद खतरनाक ठरू शकतो. आर्थिक आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण करू शकतो. त्यामुळं पारंपरिक संरक्षणप्रणालीत कालसुसंगत बदल होणं अत्यावश्यक आहे, कारण शेती हाच देशाचा आत्मा आहे.
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र