लेख-समिक्षण

दशावतार ः विकास-विध्वंसाचे द्वंद्व

भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर बोट ठेवणारे चित्रपट आले, मात्र ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे वेगळे स्थान पटकावले आहे. पौराणिक अवतारांचा आधार घेत वर्तमानातील भ्रष्ट व्यवस्था, अन्याय्य विकासाची संकल्पना आणि निसर्गविनाशाचे भयावह वास्तव उलगडून दाखवणारा हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता न राहता विचारप्रवृत्त करणारा ठरतो. दिग्दर्शकाची कलादृष्टी, प्रभावी संवाद आणि कलाकारांचा बहुआयामी, हृदयस्पर्शी अभिनय यामुळे ‘दशावतार’ने तिकिट खिडकीवर गल्ला कमावतानाच प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे.
ओशन आर्ट हाऊस निर्मित दशावतार हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने तिकिट खिडकीवर अक्षरशः धमाका उडवून दिला. या चित्रपटाने पहिल्या ३ दिवसांतच जगभरात ५.२२ कोटींचा गल्ला जमावल्याचे पाहायला मिळाले. ‘दशावतार’ रिलीज झाल्यावर ‘बागी ४’, ‘मिराय’ या अन्य बॉलीवूड, साऊथ चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असणार्‍या दिलीप प्रभावळकर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षीही हृदयस्पर्शी, कसदार आणि दमदार अभिनय सादर केला आहे. त्यांच्या चेहर्‍यावरचे निरागस हास्य, संवादफेक, भूमिकेतले बारकावे आणि रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद अजूनही तितकीच लाजवाब आहे, हे या चित्रपटाने पुन्हा एकदा ठळक केले आहे. नैसर्गिक सहजता, विनोदबुद्धी, भावनिक ताकद, भावमुद्रा, सूक्ष्म निरीक्षण, संयमित सहजसुंदर हृदयाला भिडणारा अभिनय आणि बहुआयामी भूमिका साकारण्याची क्षमता ही प्रभावळकरांची विशेषता आहे. त्यांच्या डोळ्यांमध्ये आणि चेहर्‍याच्या स्नायूंमध्ये प्रचंड अभिव्यक्तीशक्ती आहे. राग, दु:ख, विमनस्कता किंवा आनंद कुठलीही भावना ते थोडयात आणि प्रभावीपणे दाखवतात. त्यांचा विनोद कधीही कृत्रिम नसतो तर तो प्रसंगानुरूप उस्फूर्त असतो. ‘दशावतार’मध्ये तर आख्खा सिनेमा त्यांनी खाल्लाय !! सिद्धार्थ मेमन व प्रियदर्शिनी इंदलकर तसेच महेश मांजरेकर, भरत जाधव, रवी काळे, अभिनय बेर्डे या कलाकारांनी त्यांच्या छोट्या मोठ्या भुमिकेत खास ठसा उमटविला आहे. लेखकाचे हृदयस्पर्शी संवाद, दिग्दर्शकाची कलादृष्टी, छायाचित्रकाराची पारखी नजर, कथेला साजेसे पार्श्वसंगीत, कथा ओघवती राहिल असे संकलन तसेच इतर सर्व तांत्रिक बाजू यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांवर दमदार छाप उमटवण्यात यश मिळवले आहे.
मुळात, हा चित्रपट केवळ पौराणिक अवतारांची माहिती दाखवणारा चित्रपट नसून या अवतारांच्या माध्यमातून सांप्रतकाळच्या असामाजिक तत्त्वांचे उघडेनागडे बिभत्स स्वरुप निर्भिडपणे दाखवणारा आहे. कायदा हातात घेणे हा न्यायविसंगत चुकीचा मार्ग असल्याचे ज्ञान पाजळणार्‍याला कथानायक बाबुली मेस्री (दिलीप प्रभावळकर) थेट सुनावतात की, न्यायाच्या मार्गावर चुकीची माणसे बसल्यामुळे न्यायी माणसांना चुकीचाच मार्ग घ्यावा लागतो. यापेक्षा किती कठोर शब्दात भ्रष्ट व्यवस्थेचे धिंडवडे काढावेत ! गावात खाण खोदून जमीनीचे पोट फाडायचे अन् त्यावर आपले पोट भरायचे हे तत्वज्ञान बाबुली मेस्त्रीच्या जीवनतत्वात बसत नाही. नितांत सुंदर कोकण आणि माणसातल्या माणुसकीला साद घालणारी साधीसुधी माणसं अन्यायाविरुद्ध त्वेषाने लढताना कोकणच्या लाल मातीपेक्षाही जास्त लाल होतात! परंपरा, धार्मिक चालीरीती, कला, जल, जमीन जंगल आणि देवधर्म यावर निस्सीम प्रेम करणारी आणि त्यात रमणारी ही भावनाप्रधान आरस्पानी माणसं, कोकणी लहेजा इतकीच गोड आहेत.
जिथे हे कथानक घडते आहे त्या कोकणवासीयांना जल, जमीन आणि जंगल हे जीव की प्राण आहेत. त्याच्या संरक्षणासाठी ते जीवावर उदार होणार. परंतु जंगलसंपत्तीचे संरक्षण करणारा मुजोर, नादान, लालची आणि भ्रष्ट सरकारी अधिकारी (वाडेकर) आणि ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ची (सरकारच्या सोईनुसार) जबाबदारी असलेली भ्रष्ट आणि कर्तव्यकसूर करणारी पोलीस यंत्रणा संगनमत करुन, वरपर्यंत हात पोहचलेल्या धनाढ्य, हावरट आणि बेपर्वा घमेंडी खाणमालकाबरोबर (सरमळकर) भ्रष्ट युती करते. हा खाणमालक गावातील स्थानिक पुढारी असलेल्या तांडेलला पैशाची लालुच दाखवून आपलेसे करुन घेतो. ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ म्हणतात तोच हा प्रकार. विकला गेलेला हा गावपुढारी तांडेल गावकर्‍यांना विकासाच्या नावाखाली खोट्यानाट्या थापा मारून शांत करतो. तांडेल बाबुली मेस्रीच्या एकुलत्या एक मुलाला (माधव) खाणमालकाकडे विशिष्ट हेतू मनात ठेऊन नोकरी देतो. बाबुली मिस्रीला आपला भाग उद्ध्वस्त करु पाहणार्‍या खाणमालकाकडे मुलाने नोकरी करु नये असे मनोमन वाटते. पण मुंबईला दूर कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा गावात सुरु होत असलेल्या खाणीत केली तर जवळ राहील ही भावना. सरकारदरबारी आर्थिक पोहच असलेला खाणमालक मौल्यवान धातुच्या शोधासाठी भूमीपुत्रांच्या जंगल-जमीनीवर स्फोटके लावून हा भाग उद्ध्वस्त करु पहातो. जागृत ग्रामदैवत कातळेश्वराच्या खाली असलेल्या जमीनीत कोबाल्टसारखा मौल्यवान धातू असल्याने ते ठिकाण स्फोटके लावून उडवण्याचे ठरते. परंतु हे बाबुली मेस्रीच्या मुलाला समजते आणि हे बिंग फुटू नये म्हणून खाणमालकाची माणसे त्याचा खुन करुन प्रेमभंगामुळे त्याने आत्महत्या केल्याचे भासवतात. खाणमालकाने पैसे देऊन मिंधे केलेली पोलीस यंत्रणाही यात सहभागी होते. परंतु भुमीपुत्राचा प्रतिनिधी असलेला हाडाचा कलाकार आणि मातीशी इमान असलेला दशावतारी कलावंत बाबुली मेस्री ग्रामदैवत असलेल्या कातळेश्वराच्या आशिर्वादाने दशावतारातील मत्स्य, वराह, नरसिंह सारख्या विविध अवताराच्या रुपात त्या एकेकाचा खात्मा करतो.
खरेतर दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांनी कोकणात खदखदत असलेल्या तसेच अन्य ठिकाणी अशाच स्वरुपाच्या विषयावर कठोर भाष्य केले आहे. हा मुद्दा जितका ज्वलंत आहे तितकाच तो राजकिय दृष्ट्याही संवेदनशील आहे. अशा प्रकरणात मायबाप सरकार हे पडद्यामागचे सुत्रधार असतात. पडद्यापुढे लढायला त्यांचे शिलेदार असतात. राजकीय सूत्रधारांसाठी विकासाची व्याख्या आपमतलबी आणि खिसेभरु असते. ‘विकास छटाकभर अन् आमदनी किलोभर’ अशी यांची तर्‍हा असते. कोकणातील नाणार रिफायनरी, जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प अशा मोठमोठ्या प्रकल्पांविरोधात कोकणवासीयांनी संघर्ष केला आहे, त्याचे मर्म हेच आहे. हे मर्म जाणून त्याच्या वर्मावर हातोडा मारण्याचे काम या चित्रपटाने केले आहे.
आपल्यासमोर अन्याय्य घटना घडत आहेत, याची जाणीव होऊनही त्याकडे आपण कानाडोळा करत राहिलो तर विनाश अटळ आहे, हा महत्त्वाचा मौलिक संदेश या चित्रपटातून आपल्याला मिळतो. गावकर्‍यांनी एकत्र येऊन अशा अन्यायाविरोधात आवाज उठवला तर निश्चितपणे योग्य तो निकाल मिळू शकतो, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून निर्माते – लेखक – दिग्दर्शक यांनी या चित्रपटात केला आहे.
दशावतार चित्रपटात कथाविषयाला अनुरुप अशी मांडणी केली आहे. कोकणातील हिरवेगार घनदाट निबीड जंगल, कातळेश्वरासारखी खडकावरील कातळशिल्पे, अडव्या तिडव्या अरुंद निसरड्या पायवाटा, झुळझुळ पाण्याचे ओहळ, पशुपक्षांचे चिरपरिचित आवाज, नदी – नाले, डोंगरझाडी, मंदिरे, टुमदार कौलारू घरे, नारळी पोफळीची ताडमाड वनराई, रानफुलांची मनमोहक हिरवीकंच हिरवाई, काजव्यांचे उडणारे नयनरम्य ताटवे, रातकिड्यांची भयावह लयबद्ध किरकिर, गावकर्‍यांची वर्दळ यांचे सर्वांगसुंदर मनमोहक दर्शन चित्रपटात घडते. या पार्श्वभूमिवर यावर वरवंटा फिरवु पहाणारी खाणमालकाची खाण, स्फोटके, कर्णकर्कश आवाजाची अवजड मशिनरी पाहुन हृदयाची धडधड वाढते आणि मन विषण्ण होते. निर्माते – लेखक – दिग्दर्शक यांनी या दोन्हींची बेमालूम गुंफण करुन जनतेपर्यंत जो संदेश देणे अभिप्रेत होते तो सफाईदारपणे पोहचवला आहे. कोकणातील घनदाट जंगलात अनुभवायला मिळणारी गुढता, पशुपक्षी, धीरगंभीर व भितीदायक शांतता, पावलाचे हळुवार आवाज, छोटेमोठे इतर आवाज आणि त्याबरोबर होणार्‍या हालचाली या चित्रपटात प्रभावीपणे टिपल्या आहेत. परिपूर्ण तांत्रिक मांडणी करताना दिग्दर्शकाने विशेष लक्ष दिल्याचे प्रत्येक प्रसंगात जाणवते. निसर्ग जसा आहे तसा उभा करण्यात छायाचित्रकाराने कुठेही कसर ठेवली नाही. संकलन करताना कथा न रेंगाळता प्रवाही राहिल याची दक्षता घेतली. प्रकाशयोजना, ध्वनी, पार्श्वसंगीत यांचे यथोचित नियोजन केले आहे. या सर्वांच्या सुरेखसंगमातुन दशावतार खुपच देखणा झालाय यात शंका नाही. कथेच्या मागणीनुसार काही मालवणी संवादही आहेत आणि त्या संवादामूळे चित्रपट पहातांना कोकणबरोबर एक आगळीवेगळे नाते कधी जोडले जाते हे समजतही नाही.
– उत्तमराव निर्मळ, सिनेक्षेत्राचे अभ्यासक
(लेखक जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आहेत.)

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …