अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ’द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजचे पहिले दोन्ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या सीरिजचा पहिला सीझन 2019, तर दुसरा सीझन 2021 मध्ये आला होता. त्यामुळे प्रेक्षक तिसर्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेता मनोज वाजपेयीनेच पुढच्या सीझनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
अभिनेता मनोज वाजपेयी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ’द फॅमिली मॅन’च्या पुढील सीझनचे शुटिंग पूर्ण झाले असल्याची घोषणा केली आहे. ’फॅमिली मॅन 3 चे शूटिंग पूर्ण झाले आहे. नवीन सीझन पाहण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागेल.’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मनोज वाजपेयीने पुढच्या सीझनची रिलीज तारीख सांगितली नसली तरीही शूटिंग पूर्ण झाल्यामुळे नवीन सीझन वर्ष 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी 2024 च्या अखेरीस पुढील सीझन रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मनोज वाजपेयीने या सीरिजमध्ये साकारलेली मध्यमवर्गीय कुटुंबातील गुप्तहेराची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. पुढील सीझनमध्ये देखील अभिनेता शीकांत तिवारीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. त्यासोबतच प्रियामणी, शरीब हाश्मी, अश्लेषा ठाकूर आणि वेदांत सिन्हा हे कलाकार देखील दिसतील. नवीन सीझनमध्ये खलनायकाची भूमिका कोण साकारणार आहे, याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे.- जगदीश काळे
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र