अक्षयकुमार आणि सैफ अली खान या जोडगोळीने एकेकाळी बॉलीवूडमध्ये धमाल उडवून दिली होती.1994 मध्ये आलेला ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा या जोडीचा पहिला चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यानंतर तू चोर मैं सिपाही, कीमत, आरजू, टशन हे चित्रपटही बरेच गाजले होते. आता 17 वर्षांनंतर ही जोडगोळी लवकरच पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ या चित्रपटामध्ये अक्की आणि सैफ वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार पूर्णपणे नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे; तर ‘हैवान’मधील सैफ अली खानचा लूकही नुकताच समोर आला आहे. त्यावरुन सैफ या चित्रपटात गंभीर व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे दिसते.
सैफने आपल्या कारकिर्दीत रोमँटिक हिरोपासून ते खलनायकापर्यंत, तसेच प्रभावी सहकलाकाराच्या भूमिकांपर्यंत विविधांगी अभिनय केला आहे. मात्र प्रियदर्शनने ‘हैवान’साठी त्यांच्यासाठी ठेवलेला रोल पूर्वीपेक्षा वेगळा आहे. अलीबागमध्ये झालेल्या शूटमधून दिसते की ते पठडीतला खलनायक नसून, एक धीरगंभीर पात्र साकारणार आहे.
‘हैवान’ हा प्रत्यक्षात मलयाळम चित्रपट ‘ओप्पम’ची हिंदी आवृत्ती आहे. त्यामुळे कथानकात मोहनलाल यांचाही प्रभावी सहभाग असणार आहे आणि ते सैफच्या पात्राच्या बाजूने उभे राहतील, तर अक्षय कुमार स्पष्टपणे नेगेटिव्ह शेडमध्ये असेल. त्यामुळे या रीमेकमध्ये ड्रामा आणि मानसिक संघर्षाचे मिश्रण पाहायला मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे.
रोचक बाब म्हणजे प्रियदर्शन आणि सैफ अली खान यांची जोडी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. या चित्रपटाचा स्केल, टोन आणि स्टार पॉवर हे तीनही घटक पाहता ‘हैवान’ हा आगामी वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला थ्रिलर ठरेल असे मानले जात आहे. – राकेश माने
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र