एखादी व्यक्ती बेपत्ता होते. बरीच वर्षं तिचा शोध लागत नाही. अखेर ती या जगात नाही, असं सगळे मानू लागतात… आणि अनेक वर्षांनंतर ती व्यक्ती जिवंत असल्याचं समोर येतं. नाटक-सिनेमासाठी ही कथा ठीक आहे; पण प्रत्यक्षातही अशा काही घटना घडल्या आहेत. अर्थात, ज्याकाळी संपर्कमाध्यमं अत्यल्प होती, त्या काळात अशा घटना पाहायला मिळतात. विशेषतः युद्धावर गेलेला एखादा सैनिक बेपत्ता झाल्यास तो मरण पावलाय, असंच गृहीत धरलं जायचं. असे काही सैनिक कालांतरानं घरी परतल्याची उदाहरणं आहेत. परंतु आजच्या डिजिटल युगात अशी घटना दुर्मिळच! त्यातल्या त्यात एखाद्या व्यक्तीचा खून झाल्याचा संशय असेल, त्या आरोपाखाली कुणी शिक्षा भोगत असेल आणि काही वर्षांनी संबंधित व्यक्ती जिवंत असल्याचं स्पष्ट झालं, तर काय करायचं? कर्नाटकात नुकतीच अशी एक हादरवून टाकणारी घटना घडली. मृत मानण्यात आलेली महिला जिवंत असल्याचं तब्बल पाच वर्षांनी उघड झालं; परंतु तिच्या हत्येचा आरोप तिच्या पतीवरच ठेवण्यात आला आणि त्यासाठी तो शिक्षाही भोगत होता. हे प्रकरण एका गरीब आदिवासी मजुराच्या कुटुंबात घडलं म्हणून त्याची वासलात लावण्याची घाई पोलिसांनी केली होती का, असा प्रश्न उपस्थित झालाय. तपासातला अक्षम्य ढिसाळपणा लख्ख समोर आलाय. कारण मृतदेहाचे जे अवशेष पोलिसांना सापडले, ते त्या महिलेचे नव्हतेच!
पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार 2020 मध्ये खुद्द पतीनेच पोलिसात दिली होती. त्यानंतर परिसरात एका महिलेचा सांगाडा आढळला. जवळच एक साडी, चप्पल असं साहित्य. पोलिसांनी सांगाड्याचा संबंध बेपत्ता महिलेशी जोडला. पतीला अटक करून काही कागदांवर त्याच्या सह्या घेतल्या. त्याचं वकीलपत्र घ्यायला कुणी तयार होईना. अखेर एका वकिलाने त्याचा खटला लढवला. सापडलेल्या सांगाड्याचा डीएनए अहवाल येईपर्यंत आरोपीला जामीन मिळावा, अशी मागणी केली. परंतु ती फेटाळण्यात आली. जेव्हा डीएनए अहवाल आला आणि तो मृतदेह संबंधित महिलेचा नाही, हे स्पष्ट झालं तेव्हा वकिलांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तिथे जामीन मिळाला; पण त्यासाठी एक लाख रुपये भरणं गरीब मजुराला शक्य नव्हतं. त्यामुळं तो तब्बल दोन वर्षेम्हणजे सप्टेंबर 2024 पर्यंत तुरुंगातच राहिला. सुटका झाल्यानंतरही पत्नीचा शोध घेण्याची मागणी त्याने पोलिसांकडे केली; पण एकदा ‘क्लोज’ केलेली फाइल पोलिसांनी पुन्हा उघडलीच नाही. दरम्यान, आरोपीच्या मित्रांनी त्याच्या ‘मृत’ पत्नीला एका व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये कॉफी पिताना पाहिलं आणि प्रकरणाला अचानक कलाटणी मिळाली.
मित्रांनी तिथेच व्हिडिओ तयार करून तिच्या पतीला पाठवला. त्याने तो पोलिसांना दिला. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आणि नोव्हेंबर 2020 पासून ती एका व्यक्तीसोबत राहत असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे, ते ठिकाण पतीच्या गावापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर आहे. आता, तपासातल्या त्रुटींबद्दल पोलिसांना 17 तारखेला कोर्टात उत्तर द्यायचंय. दोन प्रश्न पोलिसांसमोर असणार आहेत. एक म्हणजे, सापडलेला ‘तो’ सांगाडा कुणाचा होता? दुसरा प्रश्न असा, की पत्नीच्या न झालेल्या खुनाबद्दल पतीने तुरुंगात नाहक घालवलेल्या दोन वर्षांचं काय?-अवंती कारखानीस
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र