‘फेस युवर प्रॉब्लेम, डोन्ट फेसबुक यूवर प्रॉब्लेम्स’, असे म्हटले जाते. सोशल मिडियामुळे जेवढे फायदे होत आहेत, तेवढेच नुकसानही सोसावे लागत आहे. फेसबुक, ट्विटर किंवा व्हाटसअपसारख्या मिडियातून एखादी चुकीची बाब आपल्याकडून पोस्ट झाली किंवा चित्र व्हायरल झाले तर त्याचे परिणाम गंभीर होतात आणि नको त्या गोष्टीत अडकण्याची भीती असते. काही मंडळी सोशल मिडियाला अकारण दोषी धरतात. याउलट सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने करावा, ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरली जाते. सोशल मिडिया हे प्रभावी माध्यम मानले जात असल्याने त्याचे परिणामही चटक उमटतात आणि सारवासारव करेपर्यंत बर्याच गोष्टी घडून गेलेल्या असतात. चॅटिंगवरून, पोस्टवरून किंवा फोटोमुळे मित्र-मैत्रिणीत, ग्रुपमध्ये वाद विवाद होतात. कधी कधी हे वाद इतके टोकाला जातात आणि संबंध तुटण्याची वेळ येऊन ठेपते. कोणताही विचार न करता किंवा भावनेच्या आहारी जावून केलेली पोस्ट किंवा कमेंट अंगलट येते आणि त्यामुळे संबंधितावर रोष पत्करण्याची वेळ येते. हे टाळण्यासाठी काही टिप्स ः
पोस्ट करण्यापूर्वी विचार करा: विचार करून बोलावे, बोलून विचारात पडू नये, अशी एक म्हण आपल्याकडे रुढ आहे. हीच बाब फेसबुकवरून पोस्ट करताना लागू पडते. एखाद्या घटनेबाबत, प्रसंगाबाबत, फोटोबाबत किंवा मतांबाबत आपल्याला कमेंट, पोस्ट करायची असेल तर त्याचा विचार करूनच पुढे जायला हवे. तात्काळ प्रतिक्रिया देण्याची केलेली घाई आपल्याला धोक्याची घंटा ठरू शकते. भावनेच्या आहारी जावून आपण कमेंट करतो आणि ती कमेंट क्षणात जगभरात पोचते. ती योग्य आणि समतोल असेल तर वातावरण बिघडत नाही किंवा गैरसमज निर्माण होत नाही. त्यामुळे सांभाळूनच आपण मत व्यक्त केले पाहिजे. विशेषत: महिला, युवती यांनी केलेल्या पोस्टवर, फोटोवर कमेंट करताना विचार केला पाहिजे. आपल्या पोस्टवरून प्रतिमा उभा राहत असते. एखादेवेळी पोस्ट केली नाही तरी चालेल. परंतू केलेली पोस्ट आपल्या हिताला बाधा पोचणार नाही, याची खात्री देणारी असावी
हाताळण्याची योग्य पद्धत: जर कोणी आपल्या कमेंट किंवा पोस्टबद्धल तक्रार केली तर संबंधितास आपला दृष्टिकोन स्पष्ट करून देणे क्रमप्राप्त ठरते. आपल्याला काय सांगायचे आहे, हे जर त्याला समजले नसेल तर त्याची माहिती त्याला करून द्यावी. आपल्या कमेंटवर येणार्या वाईट प्रतिक्रिया हाईड करू शकता किंवा खूपच वादग्रस्त पोस्ट ठरत असेल तर ती डिलिट करणे योग्य ठरू शकते. आपली प्रतिक्रिया समोरच्या व्यक्तीला आवडली नसेल तर आपली पोस्ट त्याला हाइड करण्यास सांगू शकतो किंवा तो जर ऐकत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे एवढेच आपल्या हातात असते. अन्य व्यक्तीच्या कमेंटच्या आधारे आपला दृष्टिकोन मांडण्यास वाव मिळू शकतो.
ओव्हरस्मार्ट नको: डीपी आणि स्टेटसमधून आपल्या व्यक्तीमत्त्वाची ओळख होत असते. विशेषत: तरुण मंडळी वारंवार आपला डिपी आणि स्टेटस अपडेट करत असतात. मग ते व्हॉटसअप असो की फेसबुक. स्टेटस किंवा डीपी अपडेट करत आपण आपल्या सहकारी मित्रांना आपले लोकेशन सांगत असतो. उदा. आपण जर फिरायला गेलो असू तर तेथील फोटो आणि स्टेटस अपडेट करतो. फेसबुक किंवा व्हाटसअपला आणि मॅपद्वारे आपले लोकेशनही सहकारी मित्रांना सांगत असतो. कदाचित आपला जुना मित्र संबंधित ठिकाणी असेल तर त्याची भेट होईल, असाही हेतू त्यामागचा असू शकतो. परंतु अपग्रेड राहताना आपण ओव्हरस्मार्ट बनू नये, याचीही खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते. सतत डिपी, स्टेटस बदलत राहिल्यास आपली प्रायव्हसी संपुष्टात येण्याची भिती अधिक असते.
धोकादायक पोस्ट टाळा: मित्रात गैरसमज निर्माण होतील, वाद निर्माण होतील किंवा संशयाला जागा मिळेल अशा प्रकारच्या धोकादायक, भितीदायक किंवा वलय निर्माण करणारे पोस्ट, कमेंट करणे टाळले पाहिजे. दुसर्याच्या डिपीला किंवा स्टेटसला सांभाळूनच प्रतिक्रिया देणे हे शहाणपणाचे लक्ष ठरू शकते. समोरच्या भावनांचा आदर राखून कमेंट केली पाहिजे. चारचौघात खिल्ली उडवणारे किंवा टर उडवणारे विधान करू नये.
ग्रुप चॅटिंगवर किंवा फेसबुकवर एखाद्या कमेंटवर पोस्ट करताना वाद निर्माण झाला तर संबंधित व्यक्तीला पर्सनली मेसेज करून हा वाद लवकर कसा मिटवता येईल, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र