लेख-समिक्षण

ट्रम्प आणि फडणवीस

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी यांचे पाच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदी पुनरागमन झाले. तसेच पुनरागमन अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे चार वर्षांनंतर झाले आहे. महाराष्ट्रात फडणवीस यांनी जाणीवपूर्वक नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारले आहे. तिकडे अमेरिकेत ट्रम्प यांनी पदग्रहणाआधीच कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य करण्याचा, ग्रीनलँड व पनामा कालव्यावर नियंत्रण मिळविण्याचा आणि मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात करण्याचा मनोदय जाहीरपणे त्यांनी मांडला आहे. त्यामुळे पुढील चार वर्षांत जगाला अस्थैर्य आणि अनपेक्षिततेला सामोरे जावे लागणार आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेले इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असा ट्रम्प यांचा लौकिक लक्षवेधीच म्हणावा लागेल. प्रचारादरम्यान दोन जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या ट्रम्प यांनी शांत राहात प्रचार चालूच ठेवला होता. अमेरिकेच्या मतदारांनी त्यांच्या पारड्यामध्ये दुसर्‍या कार्यकाळाचे दान टाकले आहे. आता ट्रम्प हे अमेरिकी इतिहासातील सर्वात वयोवद्ध (वय 78) राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. देशांतर्गत समस्यांवर कसा तोडगा काढायचा, यावरुन ट्रम्प यांचे नेतृत्व तावून-सुलाखून निघणार आहे. अमेरिकेचा दबदबा संपूर्ण जगभरात पूर्वीसारखा आहे काय ? याचेही उत्तर आगामी चार वर्षांत मिळणार आहे. शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ट्रम्प यांनी अमेरिकेला भेडसावत असलेली प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून ऐतिहासिक वेगाने काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वॉशिंग्टन येथील कॅपिटल वन अरिना येथे वीस हजार लोकांसमोर बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, अतिशय वेगाने मला काम करावेच लागेल. ट्रम्प यांच्या दुसर्‍या कारकिर्दीत भारताबरोबरील अमेरिकेचे संबंध अधिक सुधारतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. ट्रम्प यांनी काही भारतीय अमेरिकींची विविध पदांवर नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये हरमीत कौर ढिल्लन, विवेक रामास्वामी, काश पटेल, जय भट्टाचार्य, श्रीराम कृष्णन यांचा समावेश आहे. इकडे महाराष्ट्रात फडणवीस यांनी प्रशासनावर जरब बसवण्यासाठी त्यांच्या मर्जीतले अनेक अधिकारी मंत्रालयात आणले आहेत. हे अधिकारी योग्य निर्णय घेण्यासाठी फडणवीस यांना मदत करणार आहेत. दाओस येथील जागतिक उद्योग परिषदेला रवाना होण्यापूर्वी फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यावरुन आता रुसवे-फुगवे सुरु झाले आहेत. आता पुन्हा महायुतीमधील । तीन नेते एकत्र बसून हा तिढा सोडवणार आहेत. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपूर्वी हप्ता देण्याची पक्रिया सुरु झाली आहे. एकूणच ट्रम्प असोत अथवा फडणवीस वेगाने कामे करण्यामध्ये दोघांनाही स्वपक्षातील लोकच अडथळे आणणार आहेत. विरोधकांपेक्षा या गृहकलहाला ते कसे सामोरे जातात, यावरच दोन्ही नेत्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. – – जगदीश काळे

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …