टिकटॉकची भारतात पुन्हा एंट्री होणार का, याबाबतच्या चर्चा अलीकडेच जोर धरू लागल्या आहेत. असा दावा केला जात आहे की, भारतात या अॅपवरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते. मात्र, चीनी अॅपवरील बंदी इतया सहजपणे उठणार नाही. यात अनेक आव्हाने आहेत.
टिकटॉक पुन्हा चर्चेत का आले? : खरं तर, टिकटॉकची वेबसाइट भारतात पुन्हा सुरू होऊ लागली. यानंतर सोशल मीडियावर ही अफवा पसरली की सरकार टिकटॉकवरील बंदी उठवणार आहे. मात्र गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर टिकटॉक उपलब्ध नाही. हे दर्शवते की सरकारने अद्याप अधिकृतरीत्या बंदी उठवलेली नाही. वेबसाइटच्या एका भागावरून कंपनीने आपला प्लॅटफॉर्म हा लोकांच्या क्रिएटिव्हिटी आणि मनोरंजनासाठी असल्याचा दावा मांडला आहे.
याशिवाय, भारत-चीन संबंध सुधारू लागल्यामुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले, त्याचा विरोध करणार्या देशांमध्ये चीनही सामील होता. त्यामुळे भारत-चीनमधील मतभेद कमी होऊन चीनी अॅप्सना भारतात पुन्हा परवानगी मिळेल, असे काहींचे मत आहे.
५ वर्षांपूर्वी लागली होती बंदी : जून २०२० मध्ये भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. यात शेअरइट, आयएमओ व्हिडिओ, कॅम स्कॅनर यांसारख्या लोकप्रिय अॅप्सचाही समावेश होता. पुढील काही महिन्यांत सरकारने २०० हून अधिक चीनी अॅप्सवर बंदी घातली. आयटी अॅट ६९एचे उल्लंघन हा प्रमुख कारण होता. या अॅप्सचे सर्व्हर चीनमध्ये असल्याने भारतीय वापरकर्त्यांचा डेटा आणि देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होत होता. त्यावेळी गलवान खोर्यातील तणाव आणि कोरोना महामारीमुळे देशभरात चीनविरोधी भावना तीव्र झाल्या होत्या. सार्वभौमत्व, अखंडता, सुरक्षा आणि संरक्षण यांचा विचार करून सरकारने हे पाऊल उचलले. मात्र गेल्या पाच वर्षांत भारत-चीन संबंधांत काही प्रमाणात सकारात्मक बदल झाले आहेत. अनेकदा सीमा विवादांवर दोन्ही देशांत संवाद झालेला आहे. तरीदेखील, चीनी अॅप्सवरील बंदी उठवणे अजूनही कठीण आहे.
टिकटॉकची पुनरागमनाची अडचण : बंदीपूर्वी टिकटॉक भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अॅप्सपैकी एक होते. विशेषतः युवकांमध्ये त्याचा वापर प्रचंड वाढला होता. तेव्हा २० कोटींहून अधिक सक्रिय वापरकर्तेहोते आणि भारतात सर्वाधिक डाउनलोड होणार्या अॅप्समध्ये ते गणले जात होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. टिकटॉकवर बंदी आल्यावर इंस्टाग्रामने त्याची जागा घेतली. त्याशिवाय, मोज, चिंगारी यांसारख्या स्थानिक स्टार्टअप्सनीही पर्याय म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न केला.
टिकटॉकला भारतात पुन्हा येण्यासाठी येथील नियमांचे पालन करावे लागेल. वापरकर्त्यांचा सर्व डेटा स्थानिक पातळीवर संग्रहित करावा लागेल आणि त्यावर अन्य देशाचे नियंत्रण नसावे. मात्र, टिकटॉकची मातृसंस्था बाईटडान्सचे मुख्यालय बीजिंगमध्ये आहे आणि कंपनीचे चीनी सरकारसोबत धोरणात्मक भागीदारीही आहे. यामुळेच टिकटॉकची भारतात परत येण्याची वाट सोपी नाही.– शहाजी शिंदे, संगणक तज्ज्ञ
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र