प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से यह दिल डरता है क्यू… हे गीत ऐकताना मुसळधार पावसात एकाच छत्रीखाली असलेले राजकपूर आणि नर्गिस यांची जोडी डोळ्यासमोर येते. प्रामुख्याने बॉलिवुडपटात आतापर्यंत प्रेमावर आधारलेली गाणी, कथानक हे हिटचा फॉर्म्युला राहिले आहे. राजकपूरपासून रणबीरकपूरपर्यंत आणि नर्गिसपासून दीपिका पदुकोनपर्यंतच्या कलाकारांनी प्रेक्षकांसमोर प्रेमाचे अनोखे रंग दाखवून छाप पाडली आणि त्याल प्रोत्साहित केले. पण आता हे रंग फिके पडताना दिसत आहेत. नव्या पिढीचे प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याने त्याचे प्रतिबिंब बॉलिवुडवर उमटताना दिसते. उत्कट प्रेमाचे दर्शन घडविणार्या बॉलिवुडपटाने कधी कधी विरहाचा देखील कळसाध्य केला आहे. मग तो लैला मजनू असो किंवा एक दुजे के लिए असो.
कृष्णधवलच्यां काळापासून ते आतापर्यंतच्या डिजिटल तंत्रज्ञानयुक्त चित्रपटांचा प्रामुख्याने एकाच विषयावर भर राहिलेला दिसतो आणि तो फक्त आणि फक्त प्रेम. प्रत्येक काळात चित्रपटांचा गाभा प्रेमच हाच राहिला आहे. मग तो सामाजिक आशयाचा सिनेमा असो, युद्ध कथेवर बेतलेला असो, मारधाडपट असो किंवा भयपट असो. यात कोणती ना कोणती प्रेमकथा दडलेली असते. वास्तविक अन्य कथानकाच्या चित्रपटात प्रेमाची कथा ही बुस्ट देणारीच ठरली.
भलीमोठी यादी
हिंदी चित्रपटात अमर प्रेम कथांची मोठी यादीच आहे. मुघल ए आझम, आवारा, कागज के फूल, प्यासा, साहिब बीबी और गुलाम, पाकिजा, कश्मीर की कली, आराधना, बॉबी, सिलसिला, प्यार झुकता नही, लव्ह स्टोरी, देवदास, मैने प्यार किया, एक दुजे के लिए, दिल है की मानता नही, साजन, उमरावजान, दिल, 1942 अ लव्ह स्टशेरी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, रंगीला, कल हो न हो, जब वुई मेट असे कितीतरी असंख्य चित्रपटांची नावे घेता येईल. या चित्रपटातून प्रेमाचे अनेक रस उलगडून दाखविण्यात आले आहे.
नव्या काळातील प्रेमकथा
काळानुसार तरुणांच्या विचारांत बदल झाला आणि साहजिकच प्रेम करण्याच्या शैलीतही बदल झाला. त्याचेही सादरीकरण जोरदार करण्यात आले. नव्या पिढीच्या प्रेमाचे विविध रुप अणि स्वरुप प्रेक्षकांना भावले. यात ‘रहना है तेरे दिल मे’, बचना ए हसीनो, सलाम नमस्ते, लव्ह आजकाल, यह जवानी है दीवानी, वेकअप सिड, अजब प्रेम की गजब कहानी, रॉक स्टार, बर्फी, टू स्टेट्स, आशिकी-2, कॉकटेल, शुद्ध देसी रोमान्स, तनु वेड्स मनु, मसान, तमाशा, ऐ दिल है मुश्किल, बरेली की बर्फी यासारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
प्रेक्षकांना भावते प्रेम
पटकथेत कितीही नाविण्य असले आणि प्रेमाचा काडीमात्र संबंध नसला तरी यात प्रेमाचे माधुर्य असणे आवश्यकच असते. कारण प्रेम वास्तव असून त्यापासून कोणीही दूर जावू शकत नाही. भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीने प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या भावनेत तो वावरतो. त्याला मुघल आझम चित्रपटातील सलीम आणि अनारकली यांचा विरह हा तेवढीच वेदनादायी वाटतो तेवढा ‘सदमा’तील श्रीदेवी आणि कमल हसन यांची ताटातूट. प्रत्यक्षात सामान्य आयुष्यात देखील पे्रमकथांचा वानवा नाही. म्हणूनही प्रेक्षकही चित्रपटातील प्रेमकथा पाहून त्यात ते स्वत:ला शोधत असतात. अर्ध्यावर तुटलेल्या प्रेमाला पूर्ण करण्याचे स्वप्न या माध्यमातून पाहत असतात. निर्मार्त्यांनी हीच नाळ ओळखून प्रेक्षकांच्या मनाला भावनिक साद घालून त्यांचे बॉक्स ऑफिसच्या माध्यातून प्रेम मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. चित्रपटातील प्रत्येक कथानकात तोंडी लावण्यापुरती का असेना प्रेमकथेचे बिजारोपण केलेले असते. ‘शोले’ चित्रपटात गब्बरसिंहचा वावर असताना अमिताभ-जया बच्चन यांचे प्रेम फुलविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता हा फॉर्म्युला देखील नव्या पिढीला फारसा महत्त्वाचा वाटत नाही. काहींना तर प्रेमकथेत स्वारस्यही दिसून येत नसल्याने साहजिकच चित्रपटांचा ट्रेंड बदलत चालला आहे.
कथानकातील विषयांतर
भारतीय चित्रपटसृष्टीला प्रेमकथेचा समृद्ध वारसा लाभलेला असताना गेल्या काही वर्षांत प्रेम या विषयाला फारसे महत्त्व दिलेले दिसून येत नाही किंवा असून नसल्यासारखे वाटत आहे. एखाद्या चित्रपटात प्रेमप्रसंग असला तरी तो कथेला पुढे नेण्यासाठी पेरला जातो. बजरंगी भाईजान, सुलतान, दंगल, रुस्तम, नीरजा, पिंक, कहानी, एअरलिफ्ट, पिकू, निल बटे सन्नाटा, उडता पंजाब, एम.एस.धोनी या चित्रपटापासून ते काबिल, जॉली एलएलबी-2 पर्यंतच्या कथा पाहिल्या तर प्रेमाला स्पर्श क्वचितच झाला आहे. सलमान खानचा बजरंगी भाईजान अणि सुलतान या दोन्ही चित्रपटांत नायक-नायिका यांच्यात प्रेम दाखविले, परंतु या चित्रपटात त्याची व्याप्ती कोठेच दिसून येत नाही. अक्षयकुमारचा ‘रुस्तम’चे कथानक एका खटल्यावर आधारित आहे. सोनम कपूरचा नीरजा तर हवाईसुंदरीच्या साहसावर आधारित चित्रपट होता. प्रत्यक्षात प्रेमकथेला बाजूला ठेवून काहीतरी नाविण्यपूर्ण कथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा ट्रेंड आला असून तो यशस्वी देखील ठरत आहे. एकंदरीतच सध्याचे चित्रपट पाहिले तर प्रेमकथा बाद होत आहेत का? प्रेक्षकांत तेवढी उत्सुकता राहिली नाही का? असे वाटू लागले आहे. तूर्त प्रेमकथा मागे पडत असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे.- सोनम परब
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र