लेख-समिक्षण

छोट्या प्रयोगातून 300 कोटींचे साम्राज्य!

मनीष चौधरी हे नाव स्किन सायन्स या नामांकित ब्रँडचे सह-संस्थापक आहेत. भारतातील सर्वात विश्वासार्ह डी 2 सी (डायरेक्ट टू कंज्यूमर) पर्सनल केअर ब्रँड्समध्ये आज या कंपनीची गणना होते. त्यांचा हा प्रवास एका रात्रीत मिळालेल्या यशाचा नाही. हा प्रवास आहे शिकण्याचा, प्रयोग करण्याचा, अपयशाचा आणि स्वतःला बदलून हळूहळू एक असा ब्रँड उभा करण्याचा, जो आज जगभरातील लाखो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.
29 व्या वर्षी दिवाळखोरी
मनीष जेव्हा 29 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्यावर 6.5 कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज होते. एका अयशस्वी व्यवसायामुळे त्यांच्यावर आर्थिक दबाव, कायदेशीर अडचणी आणि वयाच्या तिसाव्या वर्षाच्या आतच सर्व काही संपल्याची भीती होती. अनेकांसाठी ही परिस्थिती म्हणजे आयुष्याचा शेवट असू शकला असता, पण मनीष यांच्यासाठी ही एका नव्या प्रवासाची सुरुवात होती. त्यांच्या मनात व्यवसायाची अशी आग होती, जिने त्यांना खचू न देता अधिक कणखर बनवले. याच जिद्दीतून काही वर्षांतच त्यांनी भारताचा मोठा ब्युटी ब्रँड ‌‘वाव‌’ उभा केला.
छोटे प्रयोग आणि अभ्यासावर भर
कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करत असतानाच मनीष यांनी छोट्या व्यावसायिक कल्पनांवर प्रयोग करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन उत्पादने विकायला सुरुवात केली. या सुरुवातीच्या प्रयोगांचा उद्देश मोठा नफा कमावणे हा नव्हता, तर व्यवसाय शिकणे हा होता. ऑनलाईन मार्केटप्लेस कसे चालते, ग्राहकांचे वर्तन कसे असते आणि किंमत व लॉजिस्टिक्स विक्रीवर कसा परिणाम करतात, हे त्यांनी बारकाईने अभ्यासले. ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि फीडबॅक किती महत्त्वाचे असतात, याचे मोल त्यांनी याच काळात ओळखले.
आज त्यांच्या कंपनीची वार्षिक कमाई सुमारे 300 कोटी रुपये आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या उद्योजकाचा प्रवास नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे हे खरे नाही काय?

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …