लेख-समिक्षण

छोटी गावे, मोठे चित्रपट

बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिनेरसिकांना देश-विदेशातील नितांतसुंदर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवले. स्वित्झर्लंड, मॉरीशस, लंडन, ऑस्ट्रेलिया यांसह जगभराची सफर रुपेरी पडद्यामधील दृश्यांमधून प्रेक्षकांना घडवून आणली आणि ती पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशातील काही छोट्या गावांमध्येही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले. ‌‘स्वदेस‌’, ‌‘पीके,‌’, ‌‘बजरंगी भाईजान‌’, ‌‘गंगाजल‌’, ‌‘जब वी मेट‌’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा आपला गाव पाहून या गावच्या मातीशी नाळ जुळलेल्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अनन्यसाधारण होता. – सोनम परब

बॉलिवूडमध्ये महानगरांमध्ये आणि अतिशय सुंदर अशा परदेशी लोकेशन्सवर चित्रपट चित्रित करण्याचा ट्रेंड सुरुवातीपासूनच राहिला आहे. आजही बहुतेक निर्माते चित्रपटाच्या बजेटनुसार देश आणि विदेशातील प्रसिद्ध ठिकाणांवर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास प्राधान्य देतात. मात्र, असेही काही चित्रपट निर्माते आहेत ज्यांनी देशातील छोटी शहरे किंवा दुर्गम भागातील एखाद्या लोकेशनची निवड चित्रपट चित्रीकरणासाठी केली. प्रेक्षकांनी अशा चित्रपटांना भरभरून पसंती दिली, ज्यामुळे ही छोटी ठिकाणे देखील देश आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली.
एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दृश्यामध्ये आपल्या छोट्या शहराचा किंवा कसब्याचा पूल, हवेली, गल्ल्या, रेल्वे स्टेशन किंवा इमारत दिसली की मन आनंदाने भरून येते. अगदी असाच आनंद चंदेरी गावातील लोकांच्या मनात दाटून आला. याचे कारण त्यांनी त्यांच्या कसब्यात उघडलेल्या पहिल्या सिनेमागृहात लागलेला पहिलाच चित्रपट ‌‘स्त्री‌’. मध्य प्रदेशात बेतवा नदीच्या काठी वसलेले चंदेरी हे एक छोटेसे कसबा आहे. हे ठिकाण डोंगर, जंगले, तलाव आणि येथील शांत, निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते. ‌‘स्त्री‌’ सिरीजमधील चित्रपटांचे चित्रीकरण प्रामुख्याने चंदेरीमध्ये झाले आहे. ‌‘स्त्री‌’ व्यतिरिक्त या ठिकाणी वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या अभिनयाने सजलेल्या ‌‘सुई धागा-मेड इन इंडिया‌’ चित्रपटाचेही चित्रीकरण झाले होते. चंदेरी हे ठिकाण तेथील साड्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. चंदेरीतील एका साध्या भोळ्या स्त्रीच्या वेशभूषेसाठी अनुष्का शर्माला चंदेरीचीच साडी नेसवण्यात आली होती.
*मांडवा आणि मंडावा ः मांडवा आणि मंडावा ही दोन्ही नावे ऐकायला जरी सारखी वाटत असली तरी ही दोन्ही ठिकाणे एकमेकांपासून खूप दूर आहेत. मांडवा हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे, तर मंडावा हे राजस्थानमधील झुंझुनू येथील एक कसबा आहे. चित्रपट प्रेमी मांडवाला अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन यांच्या ‌‘अग्निपथ‌’ चित्रपट सिरीजमुळे अधिक ओळखतात. मात्र, हृतिकच्या ‌‘अग्निपथ‌’मध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये प्रत्यक्षात मांडवामधील नसून एका सुंदर बेटावर चित्रित करण्यात आली आहेत. दुसरीकडे राजस्थानमधील मंडावा हे ठिकाण आधुनिक जीवनशैली आणि विकासाच्या झगमगाटापासून दूर असून तेथील हवेल्या आणि किल्ल्‌‍यांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या एका दशकात येथे डझनावारी हिट चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
मंडावा येथील अतिशय सुंदर अशा स्नेही राम लाडिया हवेलीमध्ये ‌‘पीके‌’, ‌‘बजरंगी भाईजान‌’, ‌‘लव आज कल‌’, ‌‘जब वी मेट‌’, ‌‘शुद्ध देसी रोमान्स‌’, ‌‘कच्चे धागे‌’, ‌‘दिल्ली चलो‌’ यांसारख्या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. 180 वर्षेजुन्या असलेल्या या हवेलीच्या भिंतींवरील चित्रकला ही मुघल, पर्शियन आणि इंडियन आर्टचा एक उत्कृष्ट संगम आहे. याच कारणामुळे कबीर खान यांना जेव्हा ‌‘बजरंगी भाईजान‌’ चित्रपटात पाकिस्तानमधील गल्ल्‌‍यांची दृश्ये दाखवायची होती, तेव्हा ते चित्रीकरणासाठी मंडावा येथे आले होते.
*सेंट पॉल स्कूल: ‌‘मैं हूं ना‌’ चे चित्रीकरण स्थळ
दार्जिलिंगमधील जलपहार येथे असलेले सेंट पॉल स्कूल हे तेच शाळा आहे जिथे शाहरुख खानच्या सुपरहिट ‌‘मैं हूं ना‌’ चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. समुद्रसपाटीपासून 7800 फूट उंचीवर असलेले सेंट पॉल स्कूल हे जगातील सर्वात उंचीवर असलेले स्कूल मानले जाते. शाळेतून दिसणाऱ्या कांचनजंगाच्या टेकड्या आणि शाळेच्या इमारतीचे उत्कृष्ट वास्तुकला चित्रपट निर्मात्यांना येथे खेचून आणते. येथे चित्रीकरणाची परंपरा खूप जुनी आहे. बी. आर. चोप्रा यांचा ‌’हमराज‌’, राज कपूर यांचा ‌‘मेरा नाम जोकर‌’, दुलाल गुहा यांचा ‌‘दो अनजाने‌’, प्रियांका चोप्रा आणि रणबीर कपूर यांच्या ‌’बर्फी‌’ सारख्या चित्रपटांचे महत्त्वाचे भाग येथे चित्रित झाले आहेत.
*महेश्वर घाट: ‌‘पॅडमॅन‌’चे चित्रीकरण*
नर्मदा नदीच्या चंचल लाटांच्या किनारी वसलेला इंदूरचा अतिशय सुंदर महेश्वर घाट अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपली उपस्थिती नोंदवून गेला आहे. ‌‘पॅडमॅन‌’ चित्रपटाची अनेक दृश्ये या घाटावर चित्रित करण्यात आली आहेत. इतकेच नाही तर कंगना रनौत अभिनीत ‌‘मणिकर्णिका‌’ चित्रपटाची अनेक महत्त्वाची दृश्ये देखील येथे चित्रित झाली. ‌‘दबंग-3‌’ चे टायटल साँग, ‌‘नीरजा‌’ आणि ‌’बाजीराव मस्तानी‌’ मधील काही दृश्येही येथे शूट झाली आहेत.
*पटौदी पॅलेसमध्ये चित्रित झाला ‌‘ॲनिमल‌’
नुकताच प्रदर्शित झालेला ‌‘ॲनिमल‌’ चित्रपट गुरुग्राम येथील पटौदी पॅलेसमध्ये चित्रित करण्यात आला होता. चित्रपटात दाखवण्यात आलेले रणबीर कपूरचे घर हे प्रत्यक्षात पटौदी पॅलेसच आहे. यश चोप्रा यांच्या सुपरहिट ‌‘वीर झारा‌’ चित्रपटाचे चित्रीकरण देखील पटौदी पॅलेसमध्येच झाले होते. ‌‘मंगल पांडे: द रायझिंग‌’ या चित्रपटाचा मोठा भाग चित्रित करण्यासाठी पटौदी हाऊसची निवड करण्यात आली होती. या व्यतिरिक्त ‌‘गांधी माय फादर‌’, ‌‘मेरे ब्रदर की दुल्हन‌’, ‌‘तांडव‌’ यांसारखे अनेक चित्रपट देखील येथे चित्रित झाले आहेत.
*काही इतर ऑफबीट फिल्मी लोकेशन्स
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांवर आधारित ‌‘फँटम‌’ चित्रपटाचे चित्रीकरण पंजाबमधील मलेरकोटला या गावात झाले आहे. कानपूरमधील बिठूर, काकादेव, शिवाला, माल रोड, मोतीझील, भैरव घाट येथेही अनेक चित्रपट चित्रित झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेले वाई हे गाव बॉलीवूडसाठी पंढरीच मानले जाते. या गावाला अनेकदा चित्रपटांमध्ये उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशातील गावाच्या रूपात दाखवले जाते. ‌‘स्वदेस‌’ या गाजलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण येथेच झाले होते. चित्रपटातील चरणपूर हे गाव प्रत्यक्षात वाईच होते. ‌‘दबंग‌’ चित्रपटात वाईला उत्तर प्रदेशातील लालगंज म्हणून दाखवण्यात आले आहे. याशिवाय ‌‘गंगाजल‌’, ‌‘ओमकारा‌’, ‌‘दबंग‌’, ‌‘सिंघम‌’ आणि ‌‘चेन्नई एक्सप्रेस‌’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. येथील मेणवली वाडा आणि कृष्णा नदीचे घाट चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती असतात.

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …