१८ वर्षांत पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आयपीएलचे विजेतेपद जिंकले. मात्र हा विजय मृत्यूचे तांडव घेऊन आला. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल २०२५ च्या विजयाच्या जल्लोषादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी सायंकाळी चेंगराचेंगरी झाली. त्यात किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ हून अधिक लोक जखमी झाले. अनेकजण गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शयता व्यक्त करण्यात आली होती. या दुर्दैवी घटनेनं आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागले. हजारो चाहते त्यांच्या चॅम्पियन संघाला पाहण्यासाठी स्टेडियमच्या गेटवर जमले होते, तेव्हा ही दु:खद घटना घडली. त्यामध्ये चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर काही महिलांचाही मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनं आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागलं गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काल आयपीएलचा अंतिम सामना झाला. त्यात रजत पाटीदाराच्या नेतृत्त्वाखाली खेळणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात खेळणार्या पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव केला. आरसीबीनं तब्बल १८ वर्षांनी आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्याची विजयी मिरवणूक आयोेजित करण्यात आली होती. आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएलचं जेतेपद पटकावल्याने संघाचे चाहते बेभान झाले होते. आरसीबी संघ येथील एचएएल विमानतळावर पोहोचला, तेव्हा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यांचे वैयक्तिकरित्या स्वागत केले. शिवकुमार यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीचे खास स्वागत केले. आरसीबी संघ एअरपोर्टला उतरल्यापासून ते विधान सौधाला टीम बस पोहोचेपर्यंत खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती. अनुष्का शर्मानेही व्हीडिओ शेअर करत बंगळुरूमधील चाहत्यांचं प्रेम दाखवले होते. त्यानंतर आरसीबीने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव करून पहिला आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर शहरातील उत्साह शिगेला पोहोचला होता. चाहते आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्टेडियमजवळ मोठ्या संख्येने जमले होते. पण या चाहत्यांच्या गर्दीने वेगळंच रूप घेत आता चिन्नास्वामी स्टेडियमजवळ एक धक्कादायक स्थिती निर्माण झाली.
चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. जल्लोषादरम्यान, स्टेडियमबाहेर आणि आत अचानक गर्दी अनियंत्रित झाली. त्यात गोंधळ उडाला. अनेक लोक चिरडले गेले आणि डझनभर जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. काही चाहते चिन्नास्वामी स्टेडियमच्या भिंती आणि कुंपणावर चढले. पोलिसांनी लोकांना तेथून निघून जाण्याचे आणि अशा प्रकारच्या कृतींमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले. तरीही चाहते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांना नियंत्रित करताना पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गेटवर मोठी गर्दी होती. गेटजवळ मुलींची संख्या जास्त होती. गेट उघडावा यासाठी मुली धक्का मारत होत्या. स्टेडियममध्ये शिरण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु होता. माझ्या डोळ्यांदेखत तीन मुली पडल्या. पण त्यांना कोणीही वाचवले नाही, असा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शीने कथन केला. चेंगराचेंगरीनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले होते की, मी पोलिस आयुक्तांशी बोललो आहे आणि मी रुग्णालयात जात आहे, आम्हाला अद्याप बळींची संख्या माहित नाही. आम्ही सर्वांना शांत राहण्याची विनंती करतो. आम्ही आमचे अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत, असे ते म्हणाले. या प्रकरणी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
चेंगराचेंगरीनंतर रस्त्यांवरील गर्दीमुळे रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचू शकली नाही, असे पोलिसांनी सांगितले. दुसर्या एका घटनेत, स्टेडियममध्ये उडी मारण्यासाठी गेटवर चढताना एक चाहता पडला आणि त्याचा पाय मोडला. स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीमुळे नव्हे, तर आयोजनस्थळावरील बेजबाबदारपणामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात काही चाहते स्टेडियमच्या बाहेर उभ्या असलेल्या कारवर चढलेले दिसत आहेत. चाहते मोठ्या संख्येने कारवर चढल्याने वाहनाची दुर्दशा झाली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश, आयोजनाच्या तयारीत राहिलेल्या त्रुटी आणि सुरक्षेच्या उपाययोजना यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र