नव्या वर्षाची सुरुवात एका दु:खदायक बातमीने झाली. ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व लेखक डॉ. अशोकराव मोडक यांचे नुकतेच निधन झाले. गेली काही वर्षेते आजारी होते हे खरे असले तरी ही बातमी दु:खद आहे. कारण ज्या व्यक्ती आपल्याबरोबर दीर्घकाळ असल्या पाहिजेत असे वाटत असते अशा अत्यंत कमी व्यक्तींपैकी अशोकराव होते. एक ज्ञानसंपन्न व सक्रीय आयुष्य जगून अशोकरावांनी ह्या जगाचा निरोप घेतला आहे.
डॉ. अशोकराव मोडक यांच्या निधनामुळे हिंदुत्व विचारांच्या मांडणीच्या क्षेत्रातील एक फार मोठे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आपल्या आजारपणातही अशोकरावांचे वाचन, चिंतन व लेखन सुरूच होते. रामजन्मभूमी आंदोलनाच्या राजकीय परिणामांचे विश्लेषण करणारे ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’ हे अभ्यासपूर्ण व चिकित्सक पुस्तक त्यांनी ह्याच काळात लिहिले.
साधारण 1980 सालापासून माझा अशोकरावांशी संबंध व स्नेह होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षेजबाबदारी सांभाळली. 1992 साली ते कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले. बारा वर्षेत्यांनी विधान परिषदेत प्रभावी कामगिरी करून दाखवली. तत्पूर्वी, त्यांनी 1963 ते 1994पर्यंत मुंबईत प्राध्यापक म्हणून काम केले. 2015 मध्ये, भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक पदाने सन्मानित केले. त्यांनी छत्तीसगडमधील बिलासपूर येथील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. अशोकरावांनी 104 प्रबंध आणि 40हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्रातील प्रतिष्ठित संस्था चतुरंग प्रतिष्ठानकडून जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.
डॉ. अशोकराव मोडक हे संघ परिवारातील एक फार वेगळे व्यक्तिमत्व होते. हिंदुत्व आणि संघ विचारांच्या बरोबरीने त्यांनी साम्यवाद आणि साम्यवादी जग, विशेषत: सोव्हिएत रशियाचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात एम.ए. तर जेएनयूमधून पी.एच.डी. केले होते. ‘भारताला सोव्हिएत रशियाची आर्थिक मदत’ हा अशोकरावांचा पी.एच.डी.चा विषय होता. त्या अभ्यासासाठी अशोकराव रशियामध्ये राहून आले होते. त्यांच्या सखोल अभ्यासामुळे, त्यांना सोव्हिएत रशियाच्या आर्थिक आणि राजकीय संदर्भातील तज्ज्ञ मानले जात असे.
भारतातील साम्यवाद,साम्यवादी पक्ष व त्यांच्या विविध कारवाया ह्या विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करण्याचे काम अशोकरावांनी अनेक वर्षेकेले. त्यांच्या व माझ्या स्नेहाचा तो एक समान धागा होता. ‘डाव्यांचा खरा चेहरा’ ह्या माझ्या पुस्तकाला त्यांनी 36 पानांची विस्तृत व अत्यंत मार्मिक प्रस्तावना लिहिली होती.
अशोकराव स्वभावाने, बोलण्यात व वागण्यात अत्यंत साधे व सौम्य होते. वैचारिक मांडणी आक्रमक रीतीने करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता, पण त्यांची मांडणी ठाम होती. व्यापक व सखोल अभ्यासाचा आधार असल्यामुळे त्यांचे मुद्दे खोडून काढणे किंवा त्यांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देणे विरोधकांना जड जात असे.
त्यांची भाषणाची शैली साधी पण प्रवाही होती. आपल्या विचारांची सकारात्मक, बुद्धिवादी मांडणी करत असतानाच आपल्याला विरोध करणाऱ्या विचारधारांची साधार, बुद्धिगम्य छाननी करणारा, बुद्धीवादाशी निष्ठा बाळगणारा अशोकरावांसारखा अभ्यासक, विचारवंत दुर्मिळ आहे. त्यामुळेच डॉ. अशोकराव मोडक ह्यांची उणीव दीर्घकाळ जाणवत राहील. पण त्यांनी लिहिलेली पुस्तके येणारी अनेक वर्षेहिंदुत्व विचारांच्या कार्याला मदत करत राहतील.
काही महिन्यांपूर्वी मी त्यांना घरी जाऊन भेटलो होतो. फोनवर आमच्या गप्पा अलिकडेपर्यंत चालू होत्या. प्रत्यक्ष भेटायला जाणे मात्र काही ना काही कारणाने होत नव्हते. अखेर भेट राहूनच गेली ही खंत आता मनात कायम राहील.
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र