लेख-समिक्षण

चटकदार मेयोनीज वापरताय?

बर्गर, मोमोज आणि सँडविचमध्ये लावले जाणारे मेयोनीज हा मुलाबाळांसह हल्ली सर्वांच्याच आवडीचा अन्नघटक म्हणून पुढे आला आहे. अर्थातच, पाश्चिमात्य देशांमधून आलेल्या फास्टफूड-जंकफूड कल्चरमधून याची चटक सर्वदूर वाढत चालली आहे. पण ते आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता तर तमिळनाडू सरकारने ८ एप्रिल २०२५ पासून पुढील एक वर्षासाठी अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजवर बंदी घातली आहे. मेयोनीज हे मोठ्या प्रमाणावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. ते एक जाडसर व मलईदार चविष्ट सॉस आहे. साधारणपणे अंड्याचा बलक, तेल, व्हिनेगर आणि मसाले यांच्या मिश्रणाने ते तयार केले जाते. बर्गर, सँडविच, मोमोज यांमध्ये मेयोनीजचा वापर हल्ली सर्रास केला जातो. मात्र तमिळनाडू सरकारच्या निरीक्षणानुसार, कच्च्या अंड्यांपासून बनवलेल्या मेयोनीजमध्ये योग्य स्वच्छता व साठवण न केल्यामुळे धोकादायक जंतू वाढत जातात. त्यामुळे अन्नसुरक्षा व मानक अधिनियम २००६ च्या कलम ३०(२)(अ) अंतर्गत ही बंदी घातली असून ती पुढील एक वर्षासाठी लागू असेल.
फूड पॉइजनिंगचा धोका
मागील काळात आलेल्या काही अहवालांनुसार, अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजमध्ये साल्मोनेला, ई. कोलाई आणि लिस्टीरियासारखे घातक जंतू विकसित होऊ शकतात. जर एखाद्याने दूषित मेयोनीज खाल्ले, तर त्याला पोटदुखी, उलट्या, जुलाब व ताप यांसारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची वेळही येऊ शकते. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांसाठी हा धोका जास्त असतो.
मेयोनीज नीट आणि स्वच्छतेचे निकष पाळून बनवले नसेल किंवा योग्य तापमानावर साठवले नसेल तर ते सहज खराब होऊ शकते. खराब झालेले मेयोनीज दिसायला सामान्य वाटते, पण त्यात हानीकारक जंतू असू शकतात. त्यामुळे सध्या तरी मेयोनीज खाताना सावध राहणे गरजेचे आहे. विशेषतः मुलांना ते देताना दक्षता बाळगा. घरगुती मेयोनीज करताना देखील स्वच्छता आणि योग्य साठवण याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
मेयोनीजला पर्याय यासाठी दही, हंग कर्ड किंवा अ‍ॅव्होकाडो बेस्ड डिप्स वापरू शकता. तसेच बाजारातून मेयोनीज विकत घेताना पॅकिंग, एसपायरी डेट आणि ब्रँडची विश्वासार्हता नक्की तपासा. शय असल्यास फक्त दर्जेदार व सुरक्षित प्रोडट्सच वापरा.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …