लेख-समिक्षण

गर्दीबळींचे आव्हान

शनिवारी (२७ सप्टेंबर) तामिळनाडूतील करुरमध्ये अभिनेता आणि तमिझगा वेत्री कळगमचे प्रमुख विजय थलापती याच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तब्बल ३६ लोकांचा जीव गेला. शिवाय अनेक जखमी झाले. ही दुर्घटना कशी घडली, रॅलीसाठी कसे नियोजन केले होते, पोलिसांनी परवानगी देताना कोणती काळजी घेतली होती, आदी सर्व माहिती चौकशीत कालांतराने समोर येईल. मात्र, तोपर्यंत दुसरी दुर्घटना घडलेली असेल. आपला समाज आणि राजकीय रचना पाहिल्यानंतर अशा रॅली, आंदोलने अगदी हट्टाला पेटून काढल्या जातात. मग त्यात लोक किडामुंगीसारखे मेले तरी चाललील, अशी परिस्थिती आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. हे लक्षात घेऊन सुपरस्टार विजयने टीव्हीके पक्षाची गेल्या वर्षी स्थापना केली. दक्षिणेतील राजकारण पाहता अभिनेता ते नेता असा प्रवास सर्रास दिसतो. विधानसभा निवडणुकीचा भाग म्हणून त्याने करूरमध्ये सभेचे आयोजन केले होते. दक्षिणेत लोक कलाकारांच्या अक्षरश: प्रेमात पडलेले असतात. त्यांची मंदिरे बांधणे, दुधाने अभिषेक करणे या गोष्टी नव्या नाहीत. त्यामुळे या रॅलीला अलोट गर्दी झाली होती. या गर्दीवर कुणाचेच नियंत्रण नव्हते. म्हणून त्याने भाषणही थांबवले होते. मात्र, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल ३६ लोकांचा जीव गेला. रॅलीत प्रचंड गोंधळ झाला. काय चाललंय हे कुणालाच कळत नव्हते. यामुळे महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अशा रॅलींना परवानगी देताना, पोलीस किंवा सरकार कोणती काळजी घेते? गर्दी नियंत्रणाची जबाबदारी कुणाची? दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण आणि मुख्य म्हणजे अशा ठिकाणी डॉटर, अँब्युलन्स, अग्निशमनची गाडी हजर असते का? त्यातही या संपूर्ण गर्दीला मार्गदर्शन करणे किंवा नियंत्रित करण्याची जबाबदारी कुणाची असते, याबाबत विचार केला जातो का?
दुर्दैवाने या सर्व प्रश्नांना नाही असेच उत्तर मिळणार! सभा घेणे, मोर्चा काढणे, आंदोलन करणे अशा वेळी मॉब सायकॉलॉजीचा विचार करावा लागतो. ही बाब आपल्याकडे दुर्लक्षित केली जाते. म्हणूनच भारतात चेंगराचेंगरीच्या घटना वारंवार घडत असूनही यातून सरकार आणि संबंधित यंत्रणा धडा घेताना दिसत नाहीत. गेल्या वर्षी ५ डिसेंबर रोजी हैदराबादमध्येही अशीच दुर्घटना घडली होती. ‘पुष्पा २’ च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन आला होता. त्यामुळे त्याला पाहायला प्रचंड गर्दी झाली. या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा ९ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता.
या दुर्घटनेनंतर अल्लू अर्जुनला अटक झाली होती. अशीच अटक विजय थलापतीला होणार का, हे पाहावं लागेल. करूर दुर्घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून केली जाणार आहे तर केंद्रानेही या दुर्घटनेचा अहवाल मागितला आहे. मात्र, चौकशी होते, अहवाल तयार होतात तरीही दुर्घटना होतच असतील तर नक्की कुणाचं काय चुकतंय, यावर सखोल विचार होणे गरजेचे आहे.अशा दुर्घटना वारंवार होत आहेत म्हणजेच आधीच्या दुर्घटनांमधून आपण काहीच शिकत नाही. अशा दुर्घटनेनंतर चौकशी समिती स्थापन केली जाते. त्यांचा अहवाल येतो, त्यात शिफारसी असतात. त्यांचे पुढे काय केले जाते, माहीत नाही. तोपर्यंत नवी दुर्घटना होते.– विधिषा देशपांडे

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …