लेख-समिक्षण

कोण बनणार पक्षाध्यक्ष?

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उत्तराधिकार्‍याचा शोध जवळपास एक वर्षापासून चालू आहे. 2023 मध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर नड्डा यांना लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने मुदतवाढ मिळाली होती. नड्डा यांची जागा कोण घेणार, याचा शोध चालू असतानाच त्यांना 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिपदही देण्यात आले. साहजिकच ‘एक व्यक्ती एक पद’ हे सूत्रदेखील बासनात गुंडाळून ठेवण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार देशातील किमान अर्ध्या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले गेल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होऊ शकते. भाजपच्या अध्यक्षपदासाठी मनोहरलाल खट्टर यांचे नाव आता पुढे आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खट्टर यांच्या नावाला पाठिंबा दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. आरएसएसच्या बंगळुरू येथे झालेल्या बैठकीनंतर आता एप्रिलच्या मध्याला भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार आहे. साहजिकच पुन्हा एकदा नड्डा यांचे उत्तराधिकारी कोण, हा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. संघाची शताब्दी आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सलग तिसर्‍यांदा भाजपची सत्ता असल्यामुळे नामधारी अध्यक्ष असला तरी जगातील सर्वात मोठ्या सदस्य संख्येच्या पक्षाची देशव्यापी सूत्रे हाती असणे ही निश्चितच मोठी जबाबदारी आहे. नवीन अध्यक्षांना भाजपच्या द्विध्रुवीय (मोदी, शहा) नेतृत्वाबरोबरच संघ परिवाराच्याही गुडबुक्समध्ये राहाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. 2019 मध्ये अमित शहा जेव्हा गृहमंत्री म्हणून मोदी सरकारमध्ये सामील झाले तेव्हा सुरुवातीला नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते. आतादेखील तसाच प्रयोग भाजप राबविण्याची शक्यता आहे. भाजपसमोर अजूनही पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारत जिंकण्याचे आव्हान कायम आहे. त्यामुळे मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान या नावांबरोबरच केंद्रीय मंत्री मुरुगन, कर्नाटकचे प्रल्हाद जोशी, तेलंगणाचे किशन रेड्डी आणि ओबीसी मोर्चाचे प्रमुख के. लक्ष्मण आदी नेत्यांची नावेदेखील चर्चेत आहेत. मतदारसंघ फेररचना, नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्र या प्रश्नांमुळे दक्षिण भारतात भाजपसमोरचा अडथळा वाढेल की कमी होईल, याचा अंदाज सध्यातरी बांधणे अवघड आहे. भाजप अध्यक्षांच्या निवडीत संघाची अंतिम मान्यता घेणे आता जास्तच अनिवार्य झाली आहे. नड्डा यांनी गेल्या निवडणुकीत आत्मनिर्भर भाजपचा नारा दिला होता. त्यानंतर संघाने भाजपला दिलेला 240 व्होल्टचा झटका पुरेसा ठरलेला आहे. आता संघदेखील भाजपला पूर्वीप्रमाणे मोकळीक देण्याच्या बाजूने नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री निवडीमध्ये अनेक प्रयोग करणार्‍या मोदी-शहा जोडीने महाराष्ट्रात मात्र संघाचे ऐकत देवेंद्र फडणवीसांकडे सूत्रे सोपविली आहेत. आगामी काळात भाजपच्या कारभारात संघ हस्तक्षेप करीत नाही, ही केवळ औपचारिकताच राहाणार आहे.- कमलेश गिरी

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …