लेख-समिक्षण

‌‘कॉकटेल 2‌’चा मुहूर्त ठरला

‌‘कॉकटेल‌’ या 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तरुणाईला वेड लावले होते. सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या त्रिकोणी प्रेमकथेनंतर आता तब्बल 14 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‌‘कॉकटेल 2‌’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता समोर आली असून, सप्टेंबर 2026 मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या नव्या भागात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदाना ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे.
शाहिद कपूरचा ‌’ओ रोमिओ‌’ हा चित्रपट फेब्रुवारी 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर बरोबर सहा महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबरमध्ये ‌‘कॉकटेल 2‌’ प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी जाणीवपूर्वक घेतला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही चित्रपटांमधील शाहिदच्या भूमिका एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. ‌’ओ रोमिओ‌’मधील त्याच्या प्रतिमेतून बाहेर पडून प्रेक्षकांना ‌’कॉकटेल 2‌’ मधील त्याच्या नव्या अवताराचा आनंद घेता यावा, यासाठी हा पुरेसा वेळ देण्यात आला आहे. व्यापार विलेषकांच्या मते, दोन मोठ्या चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे अंतर असणे चित्रपटगृहातील यशासाठी फायदेशीर ठरते.
संगीतावर विशेष भर ‌’कॉकटेल 2‌’ चे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले असून पटकथा लव रंजन यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण आणि संकलनाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून सध्या चित्रपट अंतिम टप्प्यात आहे. ‌’कॉकटेल‌’चा पहिला भाग जसा त्याच्या गाण्यांसाठी गाजला होता, तसाच प्रयत्न याही भागात केला जात आहे. सध्या चित्रपटातील गाण्यांचे ध्वनी मिश्र्ण (साउंड मिक्सिंग) आणि संगीत नियोजनावर विशेष लक्ष दिले जात आहे. संगीताचा ओघ कथानकाशी सुसंगत ठेवण्यासाठी निर्माते मेहनत घेत आहेत. अद्याप चित्रपटाच्या कथेबद्दल निर्मात्यांनी कमालीची गुप्तता पाळली असली तरी, शाहिद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदाना ही नवीन त्रयी पडद्यावर काय जादू करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट 2026 मधील सर्वांत मोठ्या आकर्षणांपैकी एक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.- जगदीश काळे

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …