लेख-समिक्षण

कृषीक्रांतीचा सुहानपी पॅटर्न

सुहानी चौहान या १७-१८ वर्षांच्या सर्जनशील तरुणीच्या प्रतिभेतून साकार झालेलं सो अ‍ॅप्ट अ‍ॅग्रोे हे सौरऊर्जेवर चालणारे शेतीवाहन शेतकर्‍यांसाठी एक वरदान ठरत आहे. हे वाहन शेतकर्‍यांचा उत्पादनखर्च कमी करुन पीक उत्पादनात वाढ करण्यास लाभदायक ठरत आहे.
इयत्ता सातवीत असताना मानेसर येथील एका शैक्षणिक सहलीदरम्यान शेतकर्‍यांचे कष्ट पाहून सुहानी ढवळून निघाली. याबाबत ती सांगते की, शेतकरी दिवसभर राबताना पाहिलं आणि त्यांच्या आत्महत्या संबंधीच्या आकडेवारीने मला हादरवून टाकलं. तिथूनच मला काहीतरी करावं असं वाटू लागलं. या वाहनाची कल्पना कागदावर आली तेव्हा ती आठवीत होती. तिने काही आराखडे तयार करून तिच्या विज्ञान शिक्षिकांना दाखवले. पुढच्या वर्षी तिने त्या डिझाइनसाठी कॉपीराइटसाठी अर्ज केला आणि प्रत्यक्ष प्रोटोटाइप तयार करण्याचं काम सुरू केलं. पारंपरिक ट्रॅटरसाठी सुमारे ५ लाख रुपये लागतात, पण सो-अ‍ॅप्ट अ‍ॅग्रो फक्त २ लाख रुपयांमध्ये तयार होतो आणि तोही सौरऊर्जेवर चालणारा! साहजिकच, हे वाहन विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकर्‍यांसाठी उपयुक्त आहे.
सुहानी सांगते, देशातील केवळ एक टक्के ट्रॅक्टर जरी सो अ‍ॅप्ट अ‍ॅग्रो या वाहनाने बदलले गेले, तर आपण दरवर्षी सुमारे २१७ दशलक्ष रुपयांचा डिझेल खर्च वाचवू शकतो आणि २,७२,००० मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो.
अशा प्रकारचे वाहन तयार करणं हे काही सोपं नव्हतं. तांत्रिक अडचणी, वेळेचं व्यवस्थापन, तज्ज्ञांचे सल्ले आणि स्वतःचा अभ्यास या सगळ्या गोष्टी सुहानीने समतोल साधून हाताळल्या. तिचं शाळेतील वेळापत्रक आणि सायंकाळी केलेली कामगिरी यामधूनच तिने सगळं व्यवस्थापन केलं. तिला शेतकर्‍यांकडून मिळालेल्या अभिप्रायानुसार, तिने काही महत्त्वाचे बदल केले. उदाहरणार्थ व्हर्टिकल स्फेअरन्स वाढवणे आणि टायरची गुणवत्ता सुधारणे यांसारखे बदल तिने या वाहनात केले. ऊर्जाक्षमता सुधारताना वाहनाचा खर्च नियंत्रणात ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले. काय आहे या वाहनात विशेष?
सो अ‍ॅप्ट अ‍ॅग्रो हे वाहन केवळ ट्रॅटर नसून शेतीसाठीचं बहुउपयोगी साधन आहे. यामध्ये बी पेरणीसाठी, खड्डे खोदण्यासाठी, सिंचनासाठी, तसेच खत आणि कीटकनाशक फवारणीसाठी पोर्टेबल टूल्स आहेत. या सुविधांमुळे शेतकर्‍यांना स्वतंत्र यंत्रांच्या गरजा कमी होतात आणि शेती अधिक सोपी आणि फायदेशीर बनते.
ती सध्या या वाहनाला ’स्मार्ट’ बनवण्यावरही काम करत आहे. म्हणजेच अधिक तांत्रिक सुधारणा, अ‍ॅड-ऑन टूल्स आणि ऊर्जेचा जास्तीत जास्त पुनर्वापर कसा करता येईल यासाठी ती प्रयत्नशील आहे. या अभिनव संशोधनामुळे आणि सामाजिक जाणीवेमुळे, समाजासाठी अपवादात्मक योगदान देणार्‍या तरुणांना दिला जाणारा राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन सुहानीला गौरवण्यात आले आहे.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …