आजही अनेक मुली कमी उंचीमुळे स्टाईलच्या बाबतीत काहीशा बावचळलेल्या दिसतात. त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो. वास्तविक, उंची कमी असली तरीही योग्य कपडे, रंगसंगती आणि फॅशन ट्रिक्समुळे तुम्ही अधिक उंच, स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण बनू शकता.
कंबरेच्या वर असणारे बॉटम्स घाला ः हाय-वेस्ट जीन्स, पँट किंवा स्कर्ट अशा प्रकारचे कपडे कंबरेच्या थोड्या वरपासून सुरू होतात. त्यामुळे पाय लांब दिसतात आणि शरीराचा खालचा भाग मोठा वाटतो. हे तुमच्या एकंदर उंचीत भर घालते.
उभ्या पट्ट्यांचे डिझाइन निवडा ः उभ्या रेषा असलेले किंवा उभ्या पट्ट्यांचे कपडे उंचपणाचा लूक देतात. याउलट मोठे प्रिंट किंवा आडव्या रुंद पट्ट्यांचे कपडे परिधान केल्यास तुमचे शरीर अधिक ठेंगणे वाटू शकते, त्यामुळे ते टाळावेत.
शरीराला बसणारे कपडे घाला ः जास्त सैल, ढिले किंवा साईझपेक्षा मोठे कपडे घातल्यास उंची कमी दिसते. त्यामुळे तुम्हाला चांगले बसणारे, नीट शिवलेले किंवा फिटिंगचे कपडे निवडावेत.
त्वचेच्या रंगाशी जुळणारे किंवा टोकदार आकाराचे बूट वापरा ः ज्या बुटांचा रंग तुमच्या त्वचेशी मिळता-जुळता आहे असे फुटवेअर वापरा. शक्यतो पुढील बाजूस टोकदार असणारे बूट वापरावेत. कारण यामुळे तुमचे पाय अधिक लांब दिसू शकतात. टाचेजवळ पट्ट्या असलेले बूट टाळावेत, कारण त्यामुळे पाय छोटा वाटतो. उंच टाच असलेल्या स्लीपर्स, वेजेस किंवा प्लॅटफॉर्म पादत्राणांमुळे उंची तत्काळ वाढते. मात्र त्यासाठी आरामदायक पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून दिवसभर घालणं सहज शक्य होईल.
एकसंध रंगसंगती ः डोक्यापासून पायापर्यंत एकाच रंगाचे कपडे घातल्यास उंची अधिक वाटते. विशेषतः काळा, निळा किंवा गर्द तपकिरी असे गडद रंग निवडा.
व्ही-शेप नेक ः व्ही-नेक डिझाइन डोळ्यांना वरपासून खालपर्यंत खेचते आणि शरीराचा वरचा भाग अधिक लांब दिसतो. यामुळे शरीराचा समतोल राखला जातो आणि तुमचा लूक अधिक उठून दिसतो.
मोठ्या हँडबॅग टाळा ः मोठ्या विशेषतः जड आणि लांब पट्ट्यांच्या हँडबॅग्स कमी उंंचीच्या शरीररचनेशी विसंगत वाटतात. यामुळे उंची कमी दिसते. त्याऐवजी मध्यम आकाराच्या किंवा लहान बॅग्ज वापराव्यात.
स्मार्टपणे लेअर्स घाला ः छोट्या लांबीचे जॅकेट्स, फिटिंग असलेले ब्लेझर किंवा अंगाला चपखल बसणाऱ्या लेअर्सचा वापर करा. खूप लांब किंवा अती सैल कपडे शरीराचा आकार लपवतात आणि उंची कमी वाटते. पँट घालताना थोडा घोटा उघडा राहील, अशी लांबी ठेवा. यामुळे पायांची लांबी अधिक वाटते आणि तुमचा संपूर्ण लूक आकर्षक दिसतो.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र