लेख-समिक्षण

कडाका थंडीचा

उत्तर भारताकडून वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्यांनी आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दस्तक दिली असून, राज्याच्या बहुतांश भागात कडाक्याच्या थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. हिमालयीन पट्ट्यात झालेली जोरदार हिमवृष्टी आणि उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये पसरलेल्या दाट धुक्याचा थेट परिणाम आता दख्खनच्या पठारावर दिसून येत आहे. नाशिकमधील निफाडसारख्या भागात पारा आधीच 5 अंशांपर्यंत खाली घसरल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला असून, आगामी काळात संपूर्ण भाग थंडीच्या कवेत असेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार थंडीचा प्रभाव विभागवार भिन्न असला, तरी यंदा सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची चिन्हे आहेत. या हवामान बदलाचे मुख्य कारण म्हणजे उत्तर भारतात निर्माण झालेली उच्च दाबाची स्थिती. दिल्ली, राजस्थान आणि बिहारमध्ये सध्या दृश्यमानता शून्यावर पोहोचली आहे. या भागात साचलेले थंड वारे कोणत्याही अडथळ्याविना दक्षिण दिशेला वाहत असल्याने मध्य भारतासह महाराष्ट्र गोठू लागला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवा कोरडी झाली आहे, परिणामी रात्रीच्या वेळी जमिनीतून उष्णता वेगाने उत्सर्जित होत असल्याने थंडीचा कडाका अधिक तीव्र भासत आहे. थंडीचा हा कडाका केवळ मानवी जीवनावरच नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रावरही मोठा परिणाम करणारा ठरत आहे. सध्या रब्बी हंगाम जोरात असून गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांना थंडी पोषक असली, तरी तापमानातील अतिघट आणि दवबिंदूंचे प्रमाण वाढल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि सांगली भागातील द्राक्ष बागायतदार सध्या चिंतेत आहेत. तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेल्यास द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. तसेच, पहाटे पडणारे दाट दव आणि धुक्यामुळे ‌‘डाऊनी मिल्ड्यू‌’ सारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे पिकाची गुणवत्ता खालावते आणि शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च अतोनात वाढतो. टोमॅटो, वांगी आणि पालेभाज्यांवर थंडीचा विपरीत परिणाम होतो. कडाक्याच्या थंडीमुळे पिकांची वाढ खुंटते. जर दव साचून राहिले, तर भाज्या सडण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पहाटे बागेत शेकोट्या पेटवून धूर करणे किंवा हलके पाणी देणे यांसारखे पारंपरिक उपाय योजण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. गव्हासाठी थंडी पोषक असली, तरी थंडीची लाट आल्यास दाणे भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. विदर्भातील हरभरा उत्पादकांनाही या बदलत्या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे.– जगदीश काळे

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …