संभाजीनगरपासून काही अंतरावर खुलताबाद येथे असणार्या औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटानंतर हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम शासक होता, असे विधान केल्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. भाजपचे सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाका, अशी मागणी केल्यामुळे या वादामध्ये आणखीन तेल ओतण्याचे काम केले आहे. उदयनराजे यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनीदेखील कबर उखडून टाकावी, असेच वाटत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतील, असे सांगत सावध प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसच्या राजवटीमध्ये या कबरीला ‘एएसआय’चे संरक्षण मिळालेले आहे. त्यानंतर हा मुद्दा संसदेतही गाजला होता. शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी हिंदूंची अनेक मंदिरे पाडणार्या तसेच शिखांच्या नवव्या आणि दहाव्या धर्मगुरूंची हत्या करणार्या, क्रूर पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणार्या औरंगजेबाबाबत सवाल उपस्थित केला होता. केवळ औरंगजेबच नव्हे तर भारताविरोधी काम करणार्या सर्वांचीच स्मारके आणि कबरी नष्ट करण्याची मागणी म्हस्के यांनी संसदेत केली होती. दरम्यान, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनेदेखील शनिवारी महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सरकारने जर ही कबर हटवली नाही तर कारसेवा करून ती हटवण्याचा इशाराही विहिंपने दिला आहे. उबाठा गटाचे संजय राऊत यांनी बेरोजगारी आणि शेतकर्यांच्या मुद्द्याकडे सर्वप्रथम लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत बेरोजगार मुलांच्या डोक्यात धर्मांधता भरवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेब आणि फडणवीस यांचा कारभार सारखाच असल्याचे वक्तव्य करून वातावरण आणखी तापवले आहे. औरंगजेब क्रूर शासक होता आणि धर्माचा आधार घेणारे फडणवीस हेदेखील क्रूर शासक असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. गेले दहा दिवस या विषयावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा वाद नेमका कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासारखी परिस्थिती महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता दिसून येत आहे. मानापमान आणि अहंकाराच्या या खेळाची किंमत राज्यातील सर्वसामान्य जनतेला निश्चितच चुकवावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांनीच डोकी शांत ठेवून राज्य पुढे नेण्यासाठी सर्वधर्मसमभावाची भूमिका घ्यायला हवी.- प्रसाद पाटील
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र