भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र त्या दिशेने खर्या अर्थाने वाटचाल करायची असेल, तर केवळ वाढीचे टक्केवारी दाखवणारे आकडे किंवा अल्पकालीन उद्दिष्टे पुरेशी ठरणार नाहीत. औद्योगिक उत्पादनात शाश्वत गती निर्माण करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील आणि नव्या शयता उघडाव्या लागतील. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन ३.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे गेल्या चार महिन्यांतील सर्वोच्च पातळी मानली जात असली तरी मागील वर्षी याच काळात उत्पादनवाढ ५ टक्के होती. त्याआधी या वर्षाच्या मार्च महिन्यात ती ३.९ टक्के होती. म्हणजेच सध्याच्या वाढीला ऐतिहासिक संदर्भात फारसे तेजस्वी म्हणता येत नाही. विशेष म्हणजे ही वाढ प्रामुख्याने उत्पादन क्षेत्राच्या जोरावर आहे. पण औद्योगिक ढाच्यात खनिज उत्पादन आणि वीजपुरवठा यांचा वाटा दुर्लक्षित करून चालणार नाही. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार खाणकाम क्षेत्रात तब्बल ७.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. एक वर्षापूर्वी ह्याच क्षेत्रात ३.८ टक्क्यांची वाढ नोंदली गेली होती. वीज उत्पादनामध्येही फारसा उत्साहवर्धक कल दिसत नाही. केवळ अल्पशी वाढ झाली आहे.
या सगळ्या चित्रातून असे स्पष्ट होते की केवळ एका क्षेत्रावर विसंबून संपूर्ण औद्योगिक पायाभूत रचनेला बळकटी देता येणार नाही. याशिवाय, जागतिक पातळीवरील आव्हानेही आपल्यासमोर आहेत. अमेरिकेने भारतावर काही उत्पादनांवर शुल्क लादले आहे. त्याचा दीर्घकालीन परिणाम भारतीय निर्यातक्षेत्रावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भारताने फक्त उत्पादन वाढवणे एवढ्यावर न थांबता, आपले अंतर्गत बाजार मजबूत करण्यासोबतच नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि संशोधनालाही चालना द्यावी लागेल.
निर्मितीच्या क्षेत्रात अमर्याद शयता आहेत हे खरे आहे, परंतु त्याचबरोबर खनिज क्षेत्रात आणि ऊर्जानिर्मितीत दुप्पट लक्ष घालणे अपरिहार्य आहे. देशाच्या उत्पादन क्षमतेला व्यापक आधार देण्यासाठी या क्षेत्रांना वेग देणे गरजेचे आहे. आजवर सरकारने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम काही प्रमाणात सकारात्मक आहेत, पण केवळ आकडेवारीचा आधार घेऊन प्रगतीची कहाणी लिहिता येणार नाही. औद्योगिक विकासाला सर्वंकष स्वरूप देण्यासाठी दीर्घकालीन धोरणे आखावी लागतील. त्यात संशोधन, कौशल्य विकास, तंत्रज्ञानातील गुंतवणूक, तसेच पर्यावरणस्नेही उत्पादन पद्धतींचा अंगीकार या सगळ्यांचा समावेश असला पाहिजे. जेव्हा केवळ एका क्षेत्राच्या आधारावर नव्हे, तर सर्व घटकांचा समतोल साधत सर्वांगीण औद्योगिक उत्पादन वाढवले जाईल तेव्हाच भारताची अर्थव्यवस्था खर्या अर्थाने वेग पकडेल आणि जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येईल.– श्रीकांत देवळे
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र