लेख-समिक्षण

एकतर्फी प्रेमाची रुपेरी गोष्ट

सुरुवातीच्या काळापासूनच पटकथेत प्रेमकथेवर भर दिला गेला. पटकथा कोणतिही असो, यात प्रेमाचा विषय राहिला आहे. एवढेच नाही तर युद्धकथा असो किंवा दरोडेखोरांचा थरार असो यासारख्या चित्रपटातही प्रेम फुलताना दाखविले आहे. दिग्दर्शकाने तो तात्पुरताच नाही तर शेवटपर्यंत टिकवला आहे. पटकथेचा मुळ गाभा असलेल्या प्रेमकथेत प्रेम अणि प्रेमिकेची मध्यवर्ती भूमिका असते तेव्हा अशा कथानकात फारसे अडथळे नसतात. मात्र एकतर्फी प्रेम असेल तर शेवटपर्यंत प्रेमी किंवा प्रेमिका ही कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करते, याची उत्सुकता टिकून राहते. प्रेमिका आणि प्रेमवीर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असताना तिसरा व्यक्ती तेथे येतो किंवा तो दोघांच्या प्रेमातून माघार घेतो. अशा चित्रपटांत प्रेमाची नेहमीच गुंतागुंत दाखविली आहे. कारण तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, तो तुमच्यावर प्रेम करत असेल असेही नाही. प्रेमाचा त्रिकोण दाखविणार्‍या चित्रपटात संपूर्ण कथानक हे प्रेमाचे विविध पैलू उलगडून दाखविण्याचे काम करते. त्याग, स्नेह, वैमनस्य, द्वेष यासारख्या रसाचाही भरपूर वापर केला जातो. एकतर्फी प्रेम किंवा अर्ध्यावरच प्रेमकहानी थांबत असेल तर ते पाहणे खूप वेदनादायी असते. प्रेमाचा नकार मिळाल्याने किंवा एकतर्फी प्रेमाने प्रसंगी काही जण सूड उगवितात. मग त्यांना प्रेम मिळो किंवा ना मिळो. काही त्रिकोणीपटात तिसरा नायक किवा नायिका हे स्वत:हून दूर होताना कोणताही द्वेष भाव ठेवत नसल्याचे दाखविले. उलट स्वत: वेदना सहन करत ते बाजूला होतात. राजकपूर, राजेंद्रकुमार आणि वैजयंती माला यांचा संगम असो किंवा ऋषी कपूर, कमल हसन आणि डिंपल कापाडिया यांचा सागर.
एकतर्फी प्रेमावर आधारित देवदास हा चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानता येईल. या चित्रपटाची पटकथा ही शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. या एकतर्फी प्रेमकथेवर वेगवेगळ्या भाषेत अनेक चित्रपट तयार झाले. पहिला ‘देवदास’ 1928 मध्ये प्रदर्शित झाला. तो बंगाली भाषेत आला आणि नंतर हिंदीत तीनदा आला. दक्षिणेत देखील ‘देवदास’वर चित्रपट आला. या कथानकात एक वेश्येच्या प्रेमात देवदास हा स्वत: आयुष्याची वाताहत करून घेताना दाखविला आहे. त्याचवेळी देवदासच्या प्रेमात वेडी झालेली चंद्रमुखी देवबाबूला भगवान मानत असते. एकतर्फी प्रेमात स्वत:चे आयुष्य पणाला लावणारा ‘देवदास’ हा सर्वात चर्चित चित्रपट. या कथानकावर संजय लीला भन्साळीने 2002 मध्ये देवदास चित्रपट आणला आणि त्याचे प्रमुख पात्र देवबाबू म्हणजे शाहरुख खान, पारो म्हणजे ऐश्वर्या रॉय अणि चंद्रमुखी म्हणजे माधुरी दिक्षितने भूमिका साकारली. या चित्रपटात देवबाबू हा पारोवर नितांत प्रेम करत असतो. मात्र त्याचे लग्न होत नाही. तो एकतर्फी प्रेमात स्वत: उद्धवस्त होतो. एकतर्फी प्रेमाच्या कथानकांत हा चित्रपट सर्वात सशक्त मानला जातो.
दिग्दर्शकाचा आवडीचा विषय
1999 मध्ये संजय लीला भन्साळी यांनी सलमान,ऐश्वर्या रॉय आणि अजय देवगन यांना घेत ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट तयार केला. यात समीर आणि नंदिनी हे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मात्र तिचे कुटुंब नंदिनीचा विवाह वनराज म्हणजे अजय देवगनशी ठरवतात. त्यानंतर नंदिनीचे प्रेम दूर होते. वनराज हा पहिल्याच भेटीत नंदिनीच्या प्रेमात पडतो.विवाहानंतर त्याचे प्रेम वाढत जाते. खरी कसोटी तर पुढेच दाखविली आहे. आपली पत्नी दुसर्‍यावर प्रेम करत असल्याचे तेव्हा कळते तेव्हा अजय देवगन द्विधा मनस्थितीत सापडतो. या चित्रपटात एकतर्फी प्रेमाचे सक्षमपणे सादरीकरण करण्यात आले. शेवटी वनराज हा पत्नीला तिच्या प्रेमवीराला सोपविण्यासाठी घेऊन जातो. मात्र नंदिनी या गोष्टी मान्य करत नाही आणि ती अखेर पतीसमवेत परत येते.
एकतर्फी प्रेमाचे हिंसक रुप
एकतर्फी प्रेमातून कथानकाला हिंसक वळण मिळणे नवीन बाब नाही. 1993 मधील यश चोप्रा यांचा ‘डर’ या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. एकतर्फी प्रेमातून शाहरुख खान हा दिवसेदिवस हिंसक होताना दाखविला आहे. शाहरुख खान म्हणजेच राहुल हा जुही चावला म्हणजे किरणवर एकतर्फी प्रेम करत असतो. राहुल हा आपल्यावर प्रेम करतो, हे किरणला ठाऊक नसते. यादरम्यान तिचे प्रेम सुनील म्हणजे सनी देवलवर असते आणि त्यांचा विवाहही होतो. तरीही शाहरुख खान हा सुनीलला मारण्यासाठी परदेशाात पोचतो. शेवटी राहुलच्या एकतर्फी प्रेमाची भनक या दोघांना लागते तेव्हा त्याची परिणीती राहुलच्या मृत्युत होते. अन्य चित्रपट ‘कभी हा कभी ना’ हा 1994 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान हा सुचित्रा कृष्णमूर्तीवर प्रेम करत असतो. पण ती अन्य तरुणावर प्रेम करत असते. अर्थात या चित्रपटाचा शेवट सुखद आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘मुकद्दर का सिकंदर’ मध्ये एकतर्फी प्रेमाचे दोन कथानक आहेत. एका कथानकात एक श्रीमंत मुलगी गरीब मुलाची मदत करते. तो तिला मेमसाब म्हणत असतो. कालांतराने तो मुलगा तिच्यावर प्रेम करू लागतो आणि तेही मरेपर्यंत. मात्र त्या मुलीचे अन्य मुलावर प्रेम असते. ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये तो गरीब मुलगा अमिताभ आणि श्रीमंत मुलगी राखी दाखविली आहे. त्याचवेळी रेखा ही अमिताभवर प्रेम करत असते. तर अमजद खान देखील रेखावर एकतर्फी प्रेम करत असतो.
मैत्री आणि प्रेम यातील फरक
आमीर खान याचा ‘लगान’ चित्रपट देखील एकतर्फी प्रेमाची झलक दाखविणारा आहे. या चित्रपटाचा नायक भुवन म्हणजे आमीर खान हा एलिझाबेथवर एकतर्फी प्रेम करत असतो. 2001 मधील ‘दिल चाहता है’ मधील चित्रपटात एकतर्फीच प्रेम दाखविले आहे. तिन्ही मित्र प्रेमात पडतात, पण त्याचे स्वरुप वेगवेगळे दाखविले आहे. अक्षय खन्ना हा घटस्फोटीत महिला डिंपलपवर एकतर्फी प्रेम करतो, डिंपल मात्र त्याला मित्र समजत असते. शेवटी अक्षय खन्नाचा प्रेमभंग होतो. यादरम्यान ‘कॉकटेल’ नावाचा चित्रपट आला. यातही मुलीला एकतर्फी प्रेम झाल्याचे दाखविले आहे.
काही अजरामर चित्रपट
1997 मधील ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात निशा आणि राहुल अनुक्रमे करिष्मा कपूर आणि शाहरुख खान हे चांगले मित्र असतात. निशाच्या मनात राहुलसाठी मैत्रीच्या वरचे स्थान असते. परंतु ती आपले प्रेम व्यक्त करू शकत नाही. जेव्हा राहुलच्या आयुष्यात पूजा म्हणजे माधुरी दिक्षित येते तेव्हा निशाचे प्रेम मनातच राहते. राहुल आणि पूजा प्रेमवीर होतात. शेवटी करिष्माच्या आयुष्यात अक्षयकुमार येतो. ‘ए दिल है मुश्किल’ मध्ये एकतर्फी प्रेमाची ताकद दाखविली आहे. एका मुलाचे एका मुलीवर कसे प्रेम होते आणि ती मुलगी मात्र दुसर्‍यावरच प्रेम करत असते, याचे चित्रण हे ‘दिल है मुश्किल’मध्ये दाखविले आहे. रणबीर कपूरने ‘अयान’चे पात्र साकारले. दोन अनोळखी व्यक्ती अचानक भेटतात तेव्हा प्रेमसंबंधाला सुरुवात होते. अयान हा त्यालाच प्रेम म्हणून समजतो. मात्र अनुष्का शर्मा या संबंधाला मैत्रीचे नाव देते.
सध्याचे संस्मरणीय चित्रपट
आजच्या काळात गाजलेल्या ‘रांझना’ चित्रपटाचा उल्लेख करता येईल. आनंद एल राय यांनी सोनम कपूर, अभय देवल, धनुष यांच्यावर चित्रपट तयार केला. वाराणसी शहराची पार्श्वभूमी आणि दोन धर्मातील हे पात्र दाखविले आहे. कुंदन हा जोयावर एकतर्फी प्रेम करत असतो. मात्र जोया ही जसजीत सिंहवर पेम करत असते. एकदा कुंदनच्या चुकीमुळे जसजीत याचा मृत्यु होतो. अखेर कुंदन हा जोयाच्या सांगण्यावर जीवही देतो. रणबीर कपूरचा ‘यह जवानी है दीवानी’ मध्येही दीपिका पदुकोनला एकतर्फी प्रेम करताना दाखविले आहे. ‘बर्फी’ चित्रपटात रणबीर कपूरला इलियाना डिक्रुझवर एकतर्फी प्रेम करताना दाखविले. शिवाय मेरी प्यारी बिंदू, रॉकस्टार, मोहब्बते, जब तक है जान या चित्रपटातही एकतर्फी प्रेम दाखविले आहे. ‘दिवाना मस्ताना’ हा विनोदी प्रेमाचा त्रिकोणपट आहे. अनिल कपूर, गोविंदा आणि जुही चावला यांच्यात प्रेमाचा त्रिकोण रंगतो, मात्र जुही सलमान खानसमवेत विवाह करते. त्यामुळे एखादा विषय गंभीर असो किंवा विनोदी त्यात प्रेमाच्या रंगामुळे त्या कथानकाला ‘चार चांद’ लागले आहेत.- सोनम परब

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …