लेख-समिक्षण

इराणचा ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगलवर हल्ला

जोपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी जागतिक जहाजांच्या वाहतुकीसाठी पुन्हा उघडली जात नाही आणि ती ‌‘मुक्त आणि सुरक्षित‌’ राहत नाही, तोपर्यंत अमेरिका युद्धविरामाचा विचार करणार नाही, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले असताना इराणने बुधवारी रात्री बहरीनमधील अमेरिकन कंपनी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या डेटा सेंटरवर हल्ला केला. फायनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार, या हल्ल्‌‍यानंतर त्या ठिकाणी आग लागली.
यापूर्वी, बहरीनच्या गृह मंत्रालयानेही कंपनीच्या इमारतीत आग लागल्याचे कळवले होते, जी अग्निशमन दलाच्या पथकांकडून विझवली जात होती. मात्र, त्यावेळी कंपनीचे नाव उघड करण्यात आले नव्हते. मध्यपूर्वेत कार्यरत असलेल्या 18 अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला केला. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगल आणि मेटा यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी कोणत्याही कराराची गरज नाही. अमेरिका हे युद्ध 2 ते 3 आठवड्यांत संपवू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणच्या नवीन नेतृत्वाने युद्धविरामासाठी संपर्क साधला आहे. मात्र, जोपर्यंत धोरणात्मकदृष्ट्‌‍या महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक जहाजांची वाहतूक पूर्ववत होत नाही, तोपर्यंत अमेरिका यावर कोणताही विचार करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‌‘ट्रुथ सोशल‌’वर केलेल्या निवेदनात ट्रम्प यांनी इराणच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेतले नाही, परंतु संबंधित व्यक्तीचे वर्णन पूर्वीच्या नेतृत्त्वापेक्षा खूपच कमी कट्टर आणि अधिक बुद्धिमान, असे केले आहे. मात्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी हे स्पष्ट केले की, जेव्हा हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली, मुक्त आणि स्पष्ट असेल, तेव्हाच आम्ही विचार करू. तोपर्यंत लष्करी कारवाया सुरूच राहतील, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. तोपर्यंत आम्ही इराणचा नायनाट करत राहू, किंवा लोक म्हणतात त्याप्रमाणे त्यांना पुन्हा पाषाण युगात धाडू!!!, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने इराकमधील आपल्या तळांवर झालेल्या हल्ल्‌‍यांसंदर्भात जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या हल्ल्‌‍यांसंबंधी माहिती देणाऱ्यास 3 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 250 दशलक्ष रुपये) चे बक्षीस जाहीर केले आहे. हे हल्ले बगदादमधील अमेरिकी दूतावास आणि एरबिलमधील अमेरिकी वाणिज्य दूतावासाला लक्ष्य करून करण्यात आले होते. या हल्ल्‌‍यांमागे इराणशी संबंधित सशस्त्र गट असू शकतात, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे, अमेरिका जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेत आहे.
व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमादरम्यान 28 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या युद्धानंतर इंधनाच्या वाढत्या किंमतींच्या परिणामाबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले की, मला फक्त इराणमधून बाहेर पडायचे आहे आणि आम्ही ते लवकरच करू. त्यानंतर किंमती मोठ्या प्रमाणात खाली येतील. आमचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कदाचित दोन आठवड्यांत किंवा त्याहून थोड्या कालावधीत लष्करी कारवाई संपवून सैन्याला परत बोलावले जाईल. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन लष्करी अभियान संपणे हे इराणसोबत कोणत्याही करारावर अवलंबून नाही. दरम्यान, प्रत्युत्तरादाखल इराणने तेल टँकरांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‌‘स्ट्रेट ऑफ होर्मुज‌’ (होर्मुज सामुद्रधुनी) मार्गावरील हालचाल जवळपास बंद केली आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, इस्फहान प्रांतातील काशान येथील विमानतळावर बुधवारी दुपारी हल्ला झाला; अधिकाऱ्यांनी शहरझा, आरान, बिदगोल आणि नजाफाबाद येथेही हल्ले झाल्याचे वृत्त दिले आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी हा एक अरुंद जलमार्ग आहे, जिथून जगातील तेलाचा मोठा पुरवठा होतो. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्‌‍यांनंतर इराणने या मार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा भाग सध्या युद्धाचे मुख्य केंद्र बनला आहे.

Check Also

अविवेकाच्या अंधारात श्रद्धेचा बाजार

महाराष्ट्र हा संतांचा, समाजसुधारकांचा आणि क्रांतीकारकांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या मातीने देशाला विज्ञानाची कास …