लेख-समिक्षण

आजारावर पाळत

नव्वद तास काम करण्याची अपेक्षा व्यक्त झाल्यानंतर कार्यसंस्कृतीवर बरीच चर्चा सुरू आहे. विनोदही चाललेत. मीम्स बनतायत. कर्पोरेट कल्चर तारक की मारक याविषयी उद्बोधक आणि गंभीर संवादही सुरू आहेत. खरंच आपण दिवसाकाठी किती तास काम केलं पाहिजे? आठवड्यातून एक दिवस सुट्टी गरजेची आहे का? गरजेची नसेल तर साप्ताहिक सुट्टीची कल्पना पुढे कशी आली? वर्षानुवर्षेअंगवळणी पडल्यानंतर रविवारची सुट्टी अचानक रद्दच झाली तर..? कुटुंबाला तोंड कसं दाखवायचं, याऐवजी तोंड कधी दाखवायचं असा प्रश्न उभा राहिला तर..? या विचारांनी हैराण झालो. कामात लक्ष लागेना. तणाव इतका वाढला की तब्येतीवर परिणाम दिसू लागला. हे विचार डोक्यातून पूर्णपणे काढून तरी टाकले पाहिजेत किंवा पचवले तरी पाहिजेत असं वाटू लागलं. मग इमानदारीत आराम करण्याचा निर्णय घेतला आणि मागचा-पुढचा विचार न करता ‘सीक लिव्ह’ काढली. चार दिवस झोपून काढायचे असं ठरवलं; पण झोप लागेना. अशा वेळी नेमके ‘ले-ऑफ’ किंवा ‘कॉस्ट कटिंग’ वगैरे शब्द आठवायला लागतात. ऑफिसशी आपण इतके बांधले गेलेलो असतो, की ऑफिस डोक्यातून घरात येतं. ते सुखद असतं, तर त्यालाही हरकत नव्हती. पण ऑफिस म्हटलं की भीतीच का वाटावी? आजारपणाची रजा घेतल्यानंतरसुद्धा आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवतंय, कुणीतरी पाठलाग करतंय असं का वाटावं?
मग आठवलं, यालाही सुरुवात झालीये. जर्मनीत सुरू झालेली ही नवी परंपरा आपल्याकडे यायला आजच्या काळात कितीसा काळ लागणार! जर्मनीत म्हणे, लोक आजारपणाची रजा काढून ऐष करतात. कामाचे खूप तास बुडतात आणि कंपनीचं नुकसान होतं. त्यामुळं आजारपणाची रजा घेणार्‍यांवर पाळत ठेवण्यासाठी गुप्तहेर नेमायला सुरुवात झालीये. कर्मचारी खरंच आजारी आहे का? आजाराचं स्वरूप काय? आजार किती दिवसांचा? रजा किती दिवसांची? ही सगळी माहिती ताडून पाहिली जातीये. 2021 मध्ये जर्मनीत कर्मचारी वर्षाकाठी सरासरी 11 दिवस आजारपणाची रजा घ्यायचे. आता ही सरासरी 15 दिवसांवर गेलीय. आजाराचं कारण सांगून प्रदीर्घ रजा घेणार्‍यांची संख्या वाढतच चाललीये. या दांडीबहाद्दरांमुळं जीडीपी 0.8 टक्क्यांनी घसरला असं सांगितलं जातंय. जर्मनी आधीच आर्थिक अरिष्टात सापडलाय. मग एवढं मोठ्ठं नुकसान कंपन्या कसं सहन करतील? मग काही कंपन्यांनी खासगी गुप्तहेर संस्थांना कॉन्ट्रॅक्ट द्यायला सुरुवात केली. कर्मचार्‍याने सीक लिव्ह घेतली, की गुप्तहेर त्याच्या मागे लागतात. तो खरंच आजारी आहे की मजा मारतोय हे बघतात आणि रिपोर्ट करतात.
जगभरातून या अजब कार्यपद्धतीवर टीकाही झाली. कारण हा खासगी जीवनातला हस्तक्षेपच. एखादा कर्मचारी मानसिक तणावाखाली असेल आणि रजा काढून तो चार दिवस कुठे फिरायला गेला असेल, तर त्याचा पाठलाग करणारा गुप्तहेर काय रिपोर्ट करणार? कॉर्पोरेट कल्चरमध्ये कर्मचार्‍यांना मानसिक आजार अधिक प्रमाणात होतात, हे लपून राहिलेलं नाही. त्यांच्यावर कामाचा ताण येतो का, हे पाहायला कुणी गुप्तहेर नेमणार नाही. रजेवर असलेल्या कर्मचार्‍यावर पाळत ठेवण्याची व्यवस्था मात्र होऊ शकते. हे ‘कल्चर’ आपल्याकडे येणारच नाही, याचा काय भरवसा?

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …