लेख-समिक्षण

असरानी नावाचे हास्यपर्व

हिंदी चित्रपटसृष्टीतील चालतीबोलती दंतकथा ठरलेल्या शोले चित्रपटात लहानशी, परंतु अविस्मरणीय भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे नुकतेच निधन झाले. केवळ शोलेच नाही, तर त्यापूर्वी व त्यानंतर असंख्य चित्रपटांत लहान-मोठ्या व सर्व छटांच्या भूमिका साकारणारे असरानी काही दिवसांपासून प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होते. ‘हम अंग्रेज़ों के ज़माने के जेलर हैं’ व हमारे जेलमें सुरंग?’ हे विशिष्ट लकबीत त्यांनी उच्चारलेले संवाद चित्रपटप्रेमींच्या कायम स्मरणात आहेत. असरानी यांनी केवळ विनोदी भूमिका साकारल्या नाहीत, तर गंभीर आणि भावनिक भूमिकांमध्येही आपली छाप सोडली. त्यांच्या अभिनयात सहजता, प्रामाणिकता आणि आत्मीयता होती.- मानवेंद्र उपाध्याय, सिनेसमीक्षक
—————
भारतीय सिनेमाच्या इतिहासात आपल्या बहुआयामी प्रतिभेने, हास्याने आणि सुस्पष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडणार्‍या गोवर्धन असरानी यांनी अलीकडेच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एका निखळ विनोदवीराला गमावले आहे. असरानींचा जन्म १९४१ मध्ये जयपूरमध्ये एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील शहरात गालिचे विकायचे, तर लहानपणापासूनच असरानी यांनी आपल्या शिक्षणासाठी ऑल इंडिया रेडिओ, जयपूरमध्ये व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले. याच काळात त्यांची कला आणि संवादकौशल्य अधिक खुलून आले. मात्र, नियतीने जे ठरवले ते मोठे होते; त्यांच्या जीवनातील मोठे यश येणे निश्चित होते.
चित्रपटांच्या प्रेमामुळे त्यांनी जयपूर सोडून १९६० च्या दशकात मुंबईत स्थलांतर केले. असरानींच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा प्रवास. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अभिनयाचा अभ्यास करून आपल्या कला-कौशल्याला शास्रीय दृष्टिकोन दिला. त्यांनी सांगितले की, अभिनय शिकण्यासाठी प्रयोगशाळेत जावे लागते, प्रयोग करावे लागतात आणि आंतरिक मेकअप समजून घेतल्याशिवाय उत्कृष्ट अभिनय शय नाही. या तत्त्वज्ञानामुळेच त्यांचा अभिनय इतका नैसर्गिक, मजेशीर आणि जिव्हाळ्याचा ठरला.
असरानींना आपल्या करिअरची पहिली मोठी संधी ऋषिकेश मुखर्जींच्या ‘गुड्डी’ चित्रपटात मिळाली. या चित्रपटात जया भादुरी यांच्यासोबत ते झळकते. या चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षक आणि दिग्दर्शक यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. यानंतर त्यांची कारकीर्द बहरत गेली आणि त्यांनी तब्बल ३५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत १९७२ ते १९९१ या काळात सुमारे २५ चित्रपटांमध्ये असरानी यांनी काम केले. त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे तो बहुआयामी होता.‡कधी हास्य, तर कधी गंभीर भूमिका; परंतु नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा.
असरानी हे मुख्यत्वे विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांच्या प्रतिभेची व्याप्ती खूप मोठी होती. रमेश सिप्पींच्या ‘शोले’ या अजरामर चित्रपटात त्यांनी साकारलेल्या जेलरची भूमिका प्रचंड गाजली. ‘ हम अंग्रजों के ज़माने के जेलर हैं’ हा संवाद चित्रपटाइतकाच अजरामर ठरला आणि आजही प्रेक्षकांच्या तो आठवणीत आहे. त्यांचा अभिनय नैसर्गिक, साधा आणि प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारा आणि त्यांना निखळपणाने हसवणारा होता.
‘चुपके चुपके’, ‘बावर्ची’, ‘हेरा फेरी’, ‘छोटी सी बात’, ‘दीवाने हुए पागल’ आणि ‘रफू चक्कर’ अशा अनेक चित्रपटांमधील नर्मविनोदी अभिनयशैलीने त्यांनी प्रेक्षकांना हसवले. १९७० च्या दशकात त्यांनी ‘मेरे अपने’, ‘कोशिश’, ‘परिचय’, ‘अभिमान’ आणि ‘छोटे-सी बात’ यासारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
असरानींनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही आपली छाप उमटवली. १९७४ ते १९९७ या काळात त्यांनी सहा चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये ‘चला मुरारी हीरो बनने’ हा चित्रपटही होता. त्यांनी गुजराती सिनेमात १९७२ ते १९८४ या काळात मुख्य भूमिकांमध्ये काम केले. त्यांच्या कामाची व्याप्ती केवळ चित्रपटपुरती मर्यादित नसून, टेलिव्हिजनवरही त्यांचा ठसा उमटला.
असरानींच्या अभिनयाची वैशिष्ट्ये म्हणजे शुद्ध, नैसर्गिक आणि जिव्हाळ्याचे हास्य जे पिढ्यान्पिढ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. २००० च्या दशकात ‘हेरा फेरी’, ‘भूल भुलैया’, ‘दीवाने हुए पागल’ आणि ‘मालामाल वीकली’ सारख्या चित्रपटांमधून त्यांनी नव्या प्रेक्षकांमध्येही लोकप्रियता मिळवली. त्यांच्या कामाचे कौतुक अनेक पुरस्कार आणि नामांकनांद्वारे केले गेले. १९७४ मध्ये ‘आज की ताज़ा खबर’साठी, १९७७ मध्ये ‘बालिका बधू’साठी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्तम विनोदी अभिनेता म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आला. याशिवाय ‘सरगम’, ‘एक दूजे के लिए’, ‘पति पत्नी और वो’ यासारख्या चित्रपटांमध्येही त्यांना नामांकन मिळाले. त्यांच्या कामाची लोकप्रियता त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या कारकिर्दीत स्पष्ट दिसून येते.
असरानींच्या आयुष्यात हास्याचा अर्थ केवळ मनोरंजन नव्हता, तर सहानुभूती, माणुसकी आणि सौजन्याचा संदेश होता. त्यांच्या पात्रांनी कधीही व्यंगात्मक प्रहसन केले नाही. ते प्रेक्षकांपर्यंत सहानुभूतीने पोहोचले. आजच्या काळात विनोदाचा दर्जा ज्याप्रकारे घसरत गेला आहे, तेथे असरानींसारख्या निखळ आणि निर्भेळ हास्य उमटवणार्‍या कलावंताची उणीव प्रकर्षाने जाणवते. आजही त्यांच्या भूमिकांचे संवाद, अभिनयाची शैली, आणि सहज हास्य प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहेत. त्यांनी भारतीय सिनेमाला एक नवी ओळख दिली‡. त्यांनी आपली प्रतिभा आणि वेळेची जाण दाखवून स्वतःसाठी स्थान तयार केले. ‘आज की ताज़ा खबर’ आणि ‘छोटी सी बात’ सारख्या चित्रपटांमुळे ते घराघरांत ओळखले जाऊ लागले.
असरानी यांनी लहान रोल्समध्येही आपल्या अभिनयसामर्थ्याची चुणूक दाखवली. ज्येष्ठ पत्रकार सुभाष के. झा यांच्या मुलाखतीत ऋषिकेश मुखर्जी यांनी सांगितले की, माझा आवडता अभिनेता राजेश खन्ना, धर्मेंद्र किंवा अमिताभ बच्चन नाही; तो आहे असरानी. तो कोणत्याही भूमिकेसाठी सदैव तयार असतो. माझ्या चित्रपटात त्याला घेतले नाही तर मी बेचैन होतो. असरानी यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमोल पालेकर यांसारख्या कलाकारांसोबत सहज आणि प्रभावी अभिनय केला. त्यांनी साधेपणातही विलक्षणता आणली.
असरानींचा हास्यविचार अत्यंत साधा होता. ते म्हणत की, कॉमेडी अतिशय सोपी आहे. दुसर्‍यांची नकली नक्कल करून हसू निर्माण करण्याची आवश्यकता नाही. डबल मीनिंग किंवा अपमानास्पद संवाद मला खूप त्रास देतात. कोणाला शिव्या देऊन हास्यनिर्मिती करणे मला कधीच पटले नाही. याच कारणामुळे त्यांच्या हास्यनिर्मितीत प्रामाणिकपणा दिसून येत असे.
भारतीय सिनेमातील माणुसकी, साधेपणा आणि प्रेक्षकांसोबत जुळणारे हास्य यांचे प्रतीक असणारा हा कलावंत पिढ्यान्पिढ्या प्रेक्षकांच्या आठवणीत राहणार आहे.

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …