लेख-समिक्षण

अश्वेत अभिनेत्याची यशोगाथा

सिडनी पॉइटियर हे बहामासमधील हॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. वर्ण किंवा रंग माणसाच्या यशाच्या आड येऊ शकत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे त्यांचा जीवनसंघर्ष. १९६४ मध्ये ‘लिलीज ऑफ द फील्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार (ऑस्कर ) मिळवणारे ते पहिले आफ्रिकन अमेरिकन होते. पण त्यांना हे यश सहजासहजी मिळाले नाही. यासाठी त्यांना अनेक अडथळे आणि निराशेवर मात करावी लागली.
सिडनी पॉइटियरचा जन्म २० फेब्रुवारी १९२७ रोजी फ्लोरिडामधील मियामी येथे झाला. पॉइटियर कॅट आयलंडवरील वडिलांच्या टोमॅटो फार्ममध्ये त्यांचे बालपण गेले. तेथे त्यांना वीज, पाणी, पक्के रस्ते किंवा इतर आधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. पण लहानपणापासून त्यांची फक्त एकच महत्त्वाकांक्षा होती: अभिनेता बनायचे!
या वेडापोटी १९४० च्या दशकात ते एकटे न्यूयॉर्क शहरात आले आणि अमेरिकन निग्रो थिएटरमधून हार्लेममध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या प्रवासात वाटेत त्याला लुटण्यात आले. अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्या खिशात जुजबी पैसे होते. ते बस स्टॉपवर आणि छतावर झोपले. कारण भाड्याची खोली परवडत नव्हती. वयाबद्दल खोटी माहिती देऊन थंडीपासून बचाव करण्यासाठी ते सैन्यात भरती झाले. हार्लेमच्या अमेरिकन निग्रो थिएटरमध्ये, त्यावेळच्या आघाडीच्या आफ्रिकन अमेरिकन नाट्यकंपनीत त्यांनी प्रयत्न केला. परंतु थिएटरच्या दिग्दर्शकाने त्यांच्या कॅरिबियन उच्चार आणि वाचन कौशल्याची थट्टा केली. पॉईटियर यांनी याकडे आव्हान म्हणून पाहिले आणि त्या माणसाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी अभिनेता होण्याचे वचन दिले. पुढील सहा महिने वाचन कौशल्य वाढविण्यासाठी कठोर अभ्यास केला. भाड्याच्या खोलीत ते तास न तास रेडिओ ऐकत असत. आपले उच्चार बदलण्यासाठी प्रत्येक शब्द पुन्हा-पुन्हा उच्चारत असत. पुढे ब्रॉडवे प्रॉडशनच्या लिसिस्ट्राटामध्ये त्यांना मुख्य भूमिका मिळाली. याला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. १९५८ मध्ये द डिफियंट वन्ससाठी, ते स्पर्धात्मक अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले पहिले कृष्णवर्णीय पुरुष अभिनेता बनले आणि १९६३ मध्ये लिलीज ऑफ द फील्डसाठी, ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कार जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय अभिनेता बनले. त्यांच्या रुपाने पहिल्यांदाच आफ्रिकन-अमेरिकन पुरुषाने स्पर्धात्मक ऑस्कर जिंकला. २००१ मध्ये सिडनी पॉइटियर यांना मोशन पिचर्समधील जीवनगौरवसाठी विशेष अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बराक ओबामा यांनी सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. हत्यांच्या संघर्षाला मिळालेली ही पोचपावती होती.
सिडनी पॉइटियर यांनी आयुष्यात आलेल्या असंख्य अडथळ्यांना न जुमानता, कधीही हार न मानता जिद्द आणि चिकाटीने यशाची वाट सुकर केली म्हणूनच ते यशाच्या शिखरावर पोहचु शकले हे खरे नाही काय?

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …