‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या दोन मंत्रांचा जप करून विविध प्रकारचे विचित्र निर्णय घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणार्या परकीय नागरिकांसाठी व्हिसाचे नियम अधिक कडक करण्याचा ताजा नियम जाहीर करून पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. अमेरिकेत राहण्यासाठी येणार्या किंवा पर्यटनासाठी येणार्या परकीय नागरिकांना जी परवानगी दिली जाते ती परवानगी आता संपूर्णपणे संबंधित नागरिकांच्या आरोग्यावर अवलंबून राहणार आहे. म्हणजेच यापुढे मधुमेह किंवा लठ्ठपणा, हृदयरोग यासारखे गंभीर आजार असणार्या परकीय नागरिकांना अमेरिकेत येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. अमेरिकेत येणार्या परकीय नागरिकांवर निर्बंध ठेवण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना करणार्या ट्रम्प प्रशासनाचा हा नवीन निर्णय निश्चित चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरू शकतो. नवे नियम जाहीर करताना ट्रम्प प्रशासनाने जे त्याचे कारण दिले आहे तो त्यांच्या धोरणाचाच भाग आहे. अमेरिकेत कोणत्याही कारणाने येणार्या परकीय नागरिकांचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर बोजा होऊ नये अशा प्रकारचे धोरण ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कारकिर्दीत सुचवले होते. त्यालाच ‘पब्लिक चार्ज’ किंवा ‘सार्वजनिक शुल्क’ धोरण असे म्हटले जात होते. म्हणजेच परकीय नागरिकांच्या आरोग्यविषयक किंवा इतर खर्चाचा बोजा अमेरिकन प्रशासनाला सोसावा लागू नये असा तो नियम होता. ट्रम्प यांनी हा नियम पुन्हा लागू करून व्हिसाचे नियम अधिक कडक केले आहेत. काही कारणांनी अमेरिकेच्या भूमीवर येणार्या परकीय नागरिकांना जर कोणतीही आरोग्यविषयक समस्या झाली तर त्यांच्यावर उपचार करण्याचा बोजा अमेरिकन प्रशासनाच्या तिजोरीवर पडू नये हा त्यामागे जरी उद्देश असला तरी अशा एखाद्या कारणामुळे परकीय नागरिकांना व्हिसा नाकारणे कितपत योग्य आहे हेसुद्धा पहावे लागणार आहे. हा निर्णय घेतल्यानंतर सारवासारव करण्यासाठी अमेरिकेने सर्वांना हा नियम लागू होणार नाही आणि ज्यांना आपला आरोग्यविषयक खर्च करणे परवडणार आहे त्यांना व्हिसा नाकारला जाणार नाही, असेही म्हटले आहे. साधारणपणे व्हिसाबाबत जे नियम असतात ते लागू करत असताना कोणते समाजघातक नागरिक किंवा तत्त्वे आपल्या देशात येऊ नयेत आणि एखादे दहशतवादी कृत्य घडू नये याची काळजी करण्यासाठी या नियमांचा पाठपुरावा केला जातो. शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा पर्यटनासाठी नागरिक अमेरिकेत जात असतात तेव्हा त्यांच्या दैनंदिन व्यवहारांची संपूर्णपणे आर्थिक काळजी आधीपासूनच घेण्यात आलेली असती. अशा नागरिकांचा कोणताही बोजा अमेरिकन प्रशासनावर पडण्याची शयता खूपच कमी असते. अनेक देशातील तरुण पिढी अमेरिकेत नोकरीसाठी किंवा इतर कारणासाठी स्थायिक झाली आहे. त्यांचे नातेवाईक किंवा पालक जेव्हा त्यांना भेटण्यासाठी जातात तेव्हा ते निश्चितच वयोवृद्ध असतात आणि कोणत्या ना कोणत्या रोगांनी ग्रस्त असतात. म्हणजेच अशा लोकांना जर व्हिसा मिळाला नाही तर ते आपल्या मुलांना भेटूही शकणार नाहीत हाच त्याचा अर्थ. अशा प्रकारे विचित्र निर्णय घेत राहिल्यास भविष्यात अमेरिका विश्वासार्ह देश नाही अशी भावना इतर देशांमध्ये निर्माण होईल.– रोहन शिरगावे
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र