सोशल मीडियावर ओळख झालेल्या अमरावती येथील एका तरुणीला आपली खरी ओळख लपवत प्रेमजाळ्यात फसवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना कोतवाली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी उशिरा रात्री दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला जिल्ह्यात शिक्षकाने सहा विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्याला शासकीय नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातही अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करुन अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेची दाहकता अद्याप शमलेली नाही. तोच आता बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची चिड आणणारी घटना घडली आहे. सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्याविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला.
अमरावती येथील पीडित 32 वर्षीय तरुणी आणि अमजद खान यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यावेळी अमजद खानने तरुणीला स्वतःचे नाव सचिन इंदोरे असे सांगितले. त्यांच्यात बोलचाल वाढल्यानंतर तो अमरावतीत आला. त्याने तरुणीला प्रेमजाळ्यात फासून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तरुणीला शेगाव व नांदेड येथे बोलावून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने लग्नाची मागणी केल्यावर त्याने आपण मंदिरात लग्न करु, असे सांगितले. त्यानंतर त्याने तरुणीसोबत शहरातील एका मंदिरात हार घालून लग्न केले. दरम्यान, आपण मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरीवर आहे, असे सांगून तो निघून गेला. लग्नानंतर काही दिवसांनंतर तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्याचे खरे नाव अमजद खान असल्याचे माहिती झाले. मात्र, त्यावेळी त्याने तरुणीला मी सचिन इंदोरेच आहे, असे पटवून दिले. दरम्यान काही दिवसांनी अमजद खानचे दुसरे लग्नसुद्धा झाले आहे, असे तरुणीला कळले. त्यामुळे तरुणीने अमजदचा भाऊ युनूस खान याचा मोबाइल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. त्यावर त्याने तिला धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणीने रात्री कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमजद खान पठाण आणि त्याचा भाऊ युनूस खान पठाण दोघेही रा. उदगीर, लातूर अशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
मुंबईनजीकच्या बदलापूरमध्ये एका नमांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला. यामध्ये आरोपी संदीप शिंदे याला अटक करण्यात आली. ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली. जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरडीला तपासले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. तर, आपल्या अवघ्या साडेतीन वर्षांच्या लेकीसोबत नेमके काय घडले हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून आता या घटनेची अखेर दखल घेण्यात आली आहे. या घटनेने संतापाची लाट उसळली. जनता रस्त्यावर उतरली. जनतेकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आल्यावर ‘बदलापूर बंद’ची हाक देण्यात आली होती. त्याचदरम्यान, ज्या शाळेत ही घटना घडली होती, त्या शाळेत आता तोडफोड करण्यात आली. या शाळेची तोड-फोड करण्यामध्ये महिला आंदोलक मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या. तसेच आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन येथे दगडफफेक केली.
या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ केला. या घटनेविरोधात मुंबई, नाशिक, ठाणे आदी भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. ऑटोरिक्षा, दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. पालकांनी शाळेसमोर आणि बदलापूर रेल्वे स्थानकात मोठे आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या दगडफफेकीत काही महिलांना दुखापत झाली आहे. तसेच काही पोलिसही जखमी झाले आहेत. याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणार्या दोन सेविकांचे निलंबन केले आहे.
अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील सहा विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणात बुधवारी दोषी शिक्षकाला बडतर्फ करण्यात आले. यासोबतच मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णव यांनी निलंबित केले. प्रमोद मनोहर सरदार हा चार महिन्यांपासून आठवीतील सहा विद्यार्थिनींचा विनयभंग करीत होता. त्यांना अश्लिल चित्रफित दाखवित होता. नको तिथे स्पर्श करणे, वाइट नजरेने पाहणे, अश्लील संभाषणही करीत असल्याची तक्रारही विद्यार्थिनींनी दिली आहे. ‘हौसला’ कार्यक्रमात या विद्यार्थिनींनी आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र