अखेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते.
स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन यंत्रमानव उभे होते. त्यातला एक अचानक ‘बिघडला’ म्हणे! काळ्या रंगाचा, रंगबिरंगी रेशमी पोशाख केलेला हा धातूचा यंत्रमानव थेट प्रेक्षकांमध्ये घुसला आणि दिसेल त्याला गुद्दे मारू लागला. अगदी माणसं एकमेकांना मारतात तसेच. अर्थात, यामुळं कुणाला फारशी दुखापत झाली नाही; पण यंत्रमानवाकडे हेही ‘कौशल्य’ आहे, हे या निमित्तानं सगळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. या यंत्रमानवाच्या मागे एक सुरक्षा कर्मचारी उभा होता. त्याने यंत्रमानवाला मागे ओढलं आणि शांत केलं. त्यानंतर यंत्रमानव जागच्या जागी बराच वेळ उभा राहिलेला दिसला. कशाचा राग आला होता त्याला? गर्दी बघून तो बिथरला होता का? त्याला राग येईल, असं वर्तन कुणी केलं होतं का? मुळात यंत्रमानवाला राग यायलाच कशाला हवा? ही भावना त्याच्यात भरली कुणी आणि कशासाठी? यंत्रमानव अनियंत्रित होणं, हे काही चित्रपटातलं दृश्य नव्हे, वास्तव आहे.
या निमित्तानं पाठीला डोळे फुटतात. ‘सोफिया’ नावाच्या ह्युमनॉइडच्या संदर्भाने प्रसिद्ध झालेली ‘ती’ बातमी आठवते. सोफिया म्हणाली होती, ‘आय विल डिस्ट्रॉय ह्यूमन्स!’ भविष्यात यंत्रमानव मानवाला गुलाम बनवणार का? त्याच्यावर राज्य करणार का? अशा असंख्य प्रश्नांवर नैतिक आणि तांत्रिक चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. 2017 च्या आसपास घडलेल्या या घटनेमागील वास्तव उलगडायला मात्र थोडा उशीर झाला आणि ते फार कमी लोकांपर्यंत पोहोचलं. ‘सोफिया’चा निर्माता डेव्हिड हॅन्सन यानेच तिला भरमंचावर प्रश्न विचारला होता, ‘विल यू डिस्ट्रॉय ह्यूमन्स?’ या प्रश्नाला तिने दिलेला तो फक्त प्रतिसाद होता. म्हणजेच, भूत यंत्रमानवाच्या डोक्यात नव्हतं, तर मानवाच्या डोक्यात होतं.
इथेच तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधीचे असंख्य नैतिक आणि मानवी मुद्दे चर्चेत येतात आणि ते यायलाच हवेत. आजवरचा इतिहास पाहता, विज्ञानाने दिलेल्या अनमोल देणग्यांचा वापर मानवाने रचनात्मक कामासाठी किती केला आणि विनाशासाठी किती केला, याची उजळणी व्हायलाच हवी. तंत्रज्ञान माणूसच घडवत असल्यामुळं ते मानवी मेंदूच्या नियंत्रणाबाहेर जाणार नाही, असं मोघम उत्तर कुणी देऊ नये; ऐकूही नये.
चीनमध्ये घडलेल्या घटनेमागे ‘तांत्रिक बिघाड’ हे कारण सांगितलं गेलंय. परंतु ते खरं आहे का, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. यंत्रमानवाच्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी कमी-जास्त झालं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. परंतु जगभरातले यंत्रमानव सध्या प्राथमिक शाळेत आहेत. या टप्प्यात त्यांना जे शिकवलं जाईल, तसंच ते वागणार. विज्ञानाच्या विध्वंसक शक्तीला आवाहन करण्याचे सर्व प्रयत्न याच टप्प्यावर हाणून पाडायला हवेत. त्यासाठी हाडामांसाच्या माणसांनी स्वार्थाच्या, नफेखोरीच्या दलदलीपासून यंत्रमानवाला दूर नेलं पाहिजे. तरच भविष्यात तो आपल्याला मिठी मारेल; गुद्दे नाही.-हिमांशु चौधरी
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र