लेख-समिक्षण

अजितदादांची कोंडी झालीय?

लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिकेत बदल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदारांशी ताळमेळ बसविण्यासाठी ते वेगळी रणनिती आखत आहेत. सुनेत्रा पवार यांना लोकसभेला उतरवून मोठी चूक केली असे खळबळजनक विधान अलीकडेच दादांनी केले. काकांशी संघर्ष करून काही फायदा होत नसून उलट शरद पवार यांना अधिक सहानुभूती मिळत असल्याचे दादांच्या लक्षात आले आहे. लोकसभेला पवार कुटुंबातील अनेक सदस्य सुप्रियांच्या बाजूने प्रचार करताना दिसले. कुटुंबात फूट पाडणारा व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा सादर केली गेली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतही दादांचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसत आहे.पक्षाचे अनेक नेते सोडून शरद पवार यांच्या गटात सामील होत असल्याने दादा दबावाखाली वावरत आहेत.
लाकसभा निकालानंतर महाराष्ट्रात आता विधानसभेचे पडघम वाजत असून बदलणार्‍या राजकारणांमुळे निवडणुकीबाबत उत्सुकता वाढत चालली आहे. लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिकेत बदल केला आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदारांशी ताळमेळ बसविण्यासाठी ते वेगळी रणनिती आखत आहेत.
अजित पवार यांनी अलिकडेच एक वक्तव्य केले. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवून मोठी चूक केली असे खळबळजनक विधान केले. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, “मी सर्व बहिणींवर प्रेम करतो. राजकारणाला घरात कधीही थारा देऊ नये. मी माझ्या बहिणीविरुद्ध सुनेत्रा यांना मैदानात आणून चूक केली. असे घडायला नको होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. पण ती चूक होती, असे मला वाटते.”
गेल्यावर्षी बंडखोरी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आता एनसीपी (शरदचंद्र पवार) च्या प्रमुख आहेत. त्यांनी अजित पवार यांच्या मतांवर भाष्य करण्याचे टाळले. त्या म्हणाल्या, “मी अजित पवार यांचे मत ऐकले नाही आणि त्यामुळे काही बोलू इच्छित नाही. ” गेल्यावर्षी जुलै महिन्यात शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी काही आमदार अणि नेत्यांसह वेगळा गट स्थापन करून बंडखोरी केली. पक्षात फूट पाडली आणि भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करत महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पक्ष महायुतीकडून मैदानात उतरला. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात बहिण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिले. पण सुळे यांनी वहिनी सुनेत्रा यांना 1.58 लाख मतांनी पराभूत करत आपली जागा कायम राखली. अजित पवार म्हणतात, की सुनेत्रा यांना तिकीट देण्याचा एनसीपीच्या संसदीय मंडळाचा निर्णय होता आणि त्याचे पालन केले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार आणि 83 वर्षीय काका शरद पवार यांची भाषणे मतदारांना विचार करण्यास भाग पाडणारी होती. अजित पवार यांनी त्यांना राजकीय संन्यास घेण्याचा सल्ला दिला. त्यांनीच मला भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केल्याचा दावा करत अजित पवार यांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या सहकार्‍यांनी देखील हेच मुद्दे मांडले. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पुस्तक लिहिण्याचा इशारा दिला. त्यात अनेक गौप्यस्फोट केले जातील आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका भाषणात अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची संधी का दिली नाही? असा सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केला.
संघर्षाने नुकसानच
अनेक आठवड्यानंतर अजित पवार यांना काकाशी संघर्ष करून काही फायदा होत नसल्याचे कळून चुकले आणि उलट शरद पवार यांना अधिक सहानुभूती मिळत असल्याचे त्यांना दिसू लागले. लोकसभा निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील अनेक सदस्य शरद पवार यांच्यासमवेत राहिले आणि सुळे यांच्यासाठी सक्रियपणे प्रचारही केला. परिणामी अजित पवार यांच्याबाबत राज्यात नकारात्मक भावना निर्माण झाली आणि कुटुंबात फूट पाडणारा व्यक्ती म्हणून प्रतिमा सादर केली गेली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला. 48 पैकी केवळ 17 जागांवर यश मिळाले तर विरोधी पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी खराब राहिली. त्यात भाजपला नऊ अणि शिवसेनेला सात जागा मिळाल्या. अजित पवार यांना एकच जागा मिळाली. महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून एकत्र लढताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नऊ आणि काँग्रेसच्या तेरा जागांच्या तुलनेत आठ जागा जिंकल्या.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार आता रणनितीत बदल करत असून आपले काम योग्यरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, अजित पवारांनी शरद पवार यांना सोडल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांनी आपला मार्ग निवडला आहे. या भूमिकेचे मतदारांनी स्वागत केले नाही आणि हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून कळते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध पत्नीला उतरविण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मान्य करणे सहानभुती मिळवण्याचा आणि संभ्रम निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. 2013 मध्ये तत्कालिन काँग्रेस एनसीपी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना अजित पवार यांनी राज्यातील धरणे भरण्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यामुळे जनतेत आणि विशेषत: शेतकर्‍यांत अजित पवार यांच्याविषयी नाराजी पसरली. या मताने वाद निर्माण झाला. शेवटी त्यांनी माफी मागितली आणि एवढेच नाही तर आत्मक्लेष करण्यासाठी कराड येथे यशवंतराव चव्हाण येथील समाधीस्थळी एक दिवसाचो उपोषणही केले होते. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत पत्नीला उतरविण्याचा निर्णयाबाबत अजित पवार यांच्याकडून खंत व्यक्त करणारे मत म्हणजे राजकीय आघाडीवर मतदारांना शांत करणे आणि पश्चाताप व्यक्त करण्याचा एक प्रयत्न म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. प्रामुख्याने बारामतीत.
एनसीपी (शरदचंद्र पवार) च्या मते, अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत आपले पुतणे युगेंद्र पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरू शकतात. अजित पवार हे 1991 पासून सलग सात वेळेत जिंकले आहेत. लोकसभा निवडणुकीत 33 वर्षीय युगेंद्र यांनी सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली. परिणामी सुनेत्रा पवार यांची पिछेहाट झाली. सुप्रिया सुळे यांच्या विजयाने उत्साही झालेल्या अनेक नेत्यांनी शदर पवार यांना विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र यांना मैदानात उतरविण्याबाबत आग्रह केला आहे.
शरद पवार यांची रणनिती
एका ज्येष्ठ नेत्यांच्या मते, पवार कुटुंबीयांत आणखी एक निवडणुकीची लढाई पाहता अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत खंत व्यक्त करत आपला चेंडू शरद पवार यांच्या कोर्टात टाकला आहे. कुटुंबात राजकारण आणले जात असल्याबद्दल अजित पवार यांनी खेद व्यक्त केला. राजकारणात नैतिकतेला प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. आता शरद पवार कुटुंबातील आणखी एका निवडणुकीला परवानगी देतील का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. संभ्रमावस्थेतील मतदार हे अजित पवार यांच्यासारख्या प्रबळ नेत्यांच्या प्रतिमेबाबत संवेदनशील राहू शकतात. एका मुलाखतीत तटकरे यांना अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यावर मत मांडण्यास नकार दिला. ते म्हणाले. त्यांना जे म्हणायचे होते ते म्हटले आहे. त्यांना समजून सांगणारा मी कोण? परंतु त्यांनी असे विधान का केले हे सांगतो, आम्ही किमान समान कार्यक्रमानुसार ‘एनडीए’त प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसभेची निवडणूक एनडीएच्या रणनितीनुसार लढली गेली. आता विधानसभेची निवडणूक देखील एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढणार आहोत.
सध्याच्या स्थितीत अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मनोमिलन होण्याची शक्यता धुसरच आहे. कारण यात शरद पवार राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे आणि राज्यातील आगामी निवडणुका पाहता ते अशा प्रकारची कोणतिही जोखीम उचलणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील अजित पवार यांच्यासमवेत ताळमेळ बसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकारणात अजित पवार एकाकी तर पडणार नाहीत ना? असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांना आपले राजकीय वर्चस्व कमी होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत बदल झालेला दिसून येत आहे. पक्षाचे अनेक नेते सोडून जाणे अणि शरद पवार यांच्यात सामील होत असल्याने अजित पवार दबावाखाली वावरत आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीतही त्यांचा वावर सहजपणे होताना दिसत नाही. कॅबिनेट मंत्रीपद हवे म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभाग घेतला नाही. यादरम्यान, संघ समर्थक एका मासिकेने भाजप हा अजित पवार यांना बाहेरचा रस्ता दाखवेल, असा दावा केला आहे. – श्रीकांत देवळे

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …