दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या जंगलात भडकलेल्या वणव्याच्या ज्वालांपुढे जागतिक अर्थसत्ता, महासत्ता, सामरीक सत्ता असणारी अमेरिका हतबल ठरताना दिसत आहे. ही आग मानवतेवरचे, जीवसृष्टीवरचे किती मोठे नैसर्गिक संकट आहे, याचा अंदाज अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू इराणही यामध्ये अमेरिकेला मदतीचा हात देत आहे, यावरून समजू शकतो. या आगीत जळून खाक झालेल्या इमारती नवतंत्रज्ञानाने काही दिवसांत पुन्हा उभ्या करता येतीलही; पण शेकडो वर्षांपासून विकसित होत आलेली तेथील जैवसाखळी, नैसर्गिक परिसंस्था उद्ध्वस्त, बेचिराख झाली त्याचे काय? या आगीने निसर्गापुढे आजही मानव कैकपटींनी थिटा आहे, हे दाखवून दिले आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका सध्या नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात सापडली आहे. एकीकडे मध्य अमेरिकेतील भीषण हिमवादळामुळे सुमारे 6 कोटी लोक प्रभावित झाले आहेत. अनेक प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार हे वादळ गेल्या दशकातील सर्वांत धोकादायक वादळ आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने कॅन्सस आणि मिसूरी ते न्यू जर्सीपर्यंत हिमवादळाचा इशारा जारी केला आहे. या प्रदेशातील ज्या ठिकाणी सर्वाधिक बर्फवृष्टी होते त्या ठिकाणी दशकातील सर्वात जास्त हिमवर्षाव होऊ शकतो. या बर्फाच्या वादळामुळे मध्य अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असताना, दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून लागलेली आग अजूनही पूर्णपणे आटोक्यात येत नाहीये. या आगीची तीव्रता शब्दात वर्णन करता येणार नाही. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करण्याबरोबरच आतापर्यंत सुमारे दोन लाख लोक या अग्नितांडवामुळे बेघर झाले आहेत. आयुष्यभराची संपत्ती वाहून जाताना लोक असहाय्यपणे पाहत आहेत. या आगीमुळे आतापर्यंत सुमारे 250 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचा प्रकोप अद्यापही कायम असल्याने एकूण नुकसानीचा आकडा समोर येण्यास काही दिवस जावे लागतील.
नैसर्गिक आपत्तींमध्ये संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणावर मदत देणारी अमेरिका लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेली आग विझवण्यात पूर्णपणे असमर्थ असल्याचे सिद्ध झाले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सांता आना वारे. या भागात ताशी 100 ते 135 किलोमीटर वेगाने वाहणारे हे वारे जंगलातील आग पसरवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावतात. वास्तविक पाहता वर्षातून अनेक वेळासांता आना वारे पूर्वेकडून किंवा उत्तर-पूर्व दिशेकडून अमेरिकेच्या किनार्याकडे वाहतात.पण जंगलातील आगीसोबत ते एकत्र येतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर विनाश होतो. या आगीत हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा मोठा परिसर आणि त्याच्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक वास्तू जळून खाक झाल्या आहेत.
लॉस एंजेलिसमधील पाणीपुरवठा पाईपलाईन 100 वर्षेजुनी आहे. ती पाइपलाइन अनेक ठिकाणी तुटलेली किंवा बंद पडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांना आग विझवण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे. याखेरीज काही ठिकाणी पाणी फवारण्यासाठी विमानांची संख्या कमी आहे. यावरुन अमेरिकन अग्निशमन दलही या अग्नितांडवापुढे असहाय्य ठरताना दिसत आहे. याचाही परिणाम आगीचा कल्लोळ पसरण्यावर झाला आहे.
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील विशेष झाडे आणि वनस्पतीही काही वेळा आग पसरविण्यात मोठी भूमिका बजावतात. विशेषतः ओक आणि पाइन्ससारख्या झाडांच्या पानांत व फांद्यांत तेलांश असतो. यामुळे आग वेगाने पसरण्यास मदत होते. याखेरीज जंगलातील मुक्कामादरम्यान काही जणांकडून सिगारेटच्या किंवा कॅम्पफायरच्या ठिणग्या पडल्यामुळे वणवे पेटतात.
ही आग मानवतेवरचे, जीवसृष्टीवरचे किती मोठे नैसर्गिक संकट आहे, याचा अंदाज अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू इराणही यामध्ये अमेरिकेला मदतीचा हात देत आहे, यावरून समजू शकतो. इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीचे प्रमुख पीर होसेन कोलीवंद यांनी यासंदर्भात अमेरिकन रेड क्रॉसचे सीईओ क्लिफ होल्झ यांना संदेश पाठवला आहे. यात त्यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि ही मोठी शोकांतिका असल्याचे म्हटले आहे. या आपत्तीत आम्ही अमेरिकेला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, असे त्यांनी नमूद केले आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून तणावपूर्ण संबंध आहेत. पण आगीची भयावहताच इतकी प्रचंड आहे की ती पाहून इराणने वैरभाव विसरून मदतीचा हात पुढे केला.
जगातील सर्वात भयानक आणि सर्वाधिक नुकसान करणारे अग्नितांडव म्हणून या लॉस एंजेलिसमधील या वणव्याचा उल्लेख होत आहे. या आगीमुळे गेल्या तीन दशकांपासून जगभरात चर्चेत असलेल्या जागतिक तापमानवाढीच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे. तथापि, ही आग काही जणांच्या खोडसाळपणामुळे लागल्याची माहितीही पुढे आली असून अमेरिकन पोलिसांनी संशयाच्या आधारे काही जणांना अटकही केली आहे. वस्तुतः या भागात जंगलातील घर्षणामुळे यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा प्रकारची अनियंत्रित आग यापूर्वी कधीही दिसली नव्हती. जगाच्या कानाकोपर्यातील गवताच्या गंजीतील सुई शोधण्याचे सामर्थ्य आणि तंत्रज्ञान असणारी, जगातील सर्वांत मोठे सामरीक सामर्थ्य असणारी, जगातील सर्वाधिक जीडीपी असणारी महासत्ता ही आग आटोक्यात आणण्यास असमर्थ ठरत असेल तर एखाद्या विकसनशील देशात अशी आग भडकल्यास काय होईल?
गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळे बदललेल्या हवामान पद्धतीमुळे निसर्गाचा एकूणच रागरंग बदलत चालला आहे. मानवाच्या विकासाची भूक जंगलांच्या मुळावर उठली आहे. ‘झाडे तोडा आणि विकास करा’ ही नीती भारतासह जगभरात दिसून येत आहे. परिणामी पृथ्वीच्या वातावरणात मिसळणारा कार्बन शोषून घेणारी यंत्रणाच कोलमडून पडत चालली आहे. हा कार्बन पृथ्वीवरील तापमानाचा पारा उंचावत चालला आहे. परिणामी, जगाचा हंगामी समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या हिमनद्या आता वेगाने वितळत आहेत. हे प्रचंड हिमखंड समुद्रात तुटून पाण्यात मिसळत आहेत. अनेक वाळवंटी प्रदेशात, जिथे लोकांना पाऊस आणि बर्फवृष्टीची माहिती नव्हती, तिथे अतिवृष्टी झाल्याच्या घटना घडताहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्वतांच्या सौंदर्याला ग्रहण लागले आहे. डोंगराळ भागात उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ध्रुवीय अस्वलासारखे अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर असूनही भांडवलशाहीच्या तावडीत अडकलेल्या जागतिक व्यवस्थेचे डोळे उघडत नाहीयेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी तर जागतिक तापमानवाढ ही संकल्पनाच फेटाळून लावली होती. ट्रम्प यांच्या कार्यकाळात निसर्गाचे दोहन आणि पर्यावरणाचा विनाश आणखी वाढणार आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. लॉस एंजेलिसमध्ये पेटलेल्या वणव्यामध्ये हॉलीवूडच्या तारेतारकांची घरे नष्ट झाल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या; पण तेथील जंगलामध्ये, झाडाझुडपांमध्ये असणार्या पशुपक्ष्यांची, किटकांची काय स्थिती झाली असेल याची चर्चा कुठेही होताना दिसली नाही. जंगलांमध्ये निसर्गाची एक परिसंस्था असते. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले भौतिक इमले पुन्हा उभारता येतील. थ्रीडी प्रिंटिंगसारख्या नवतंत्रज्ञानाने ते काही दिवसातही उभे करता येऊ शकतील. पण शेकडो वर्षांपासून विकसित होत आलेली तेथील जैवसाखळी, नैसर्गिक परिसंस्था उद्ध्वस्त, बेचिराख झाली त्याचे काय? या आगीने निसर्गापुढे आजही मानव कैकपटींनी थिटा आहे, हे दाखवून दिले आहे. -राजीव मुळ्ये, पर्यावरण अभ्यासक
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र