लेख-समिक्षण

अंतरिक्षातील पहारेकरी

‘घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी,’ हे संत जनाबाईंचे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. आधुनिक काळात या शब्दांची आठवण करून देतात ते आपण अवकाशात सोडलेले उपग्रह. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, भूस्थिर कक्षेत काम करणारे हे उपग्रह आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनं खूप मोलाची जबाबदारी पार पाडतात. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आणि तणाव आपण सध्या अनुभवतो आहोत. दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने अचूक हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. शत्रूची महत्त्वाची लष्करी ठिकाणेही आपल्या विविध आयुधांनी अचूक टिपली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या तांत्रिक प्रगतीचा हा ढळढळीत पुरावा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी तब्बल दहा उपग्रह घारीसारखी अवकाशातून जमिनीवर नजर ठेवून आहेत, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी नुकतीच दिली. सात हजार किलोमीटरच्या समुद्रकिनार्‍यासह भारताच्या उत्तर सीमेवर शत्रूकडून होत असलेल्या हालचालींची माहिती या उपग्रहांच्या माध्यमातून आपल्या सुरक्षा दलांना सातत्याने मिळत असते. आरआय-सॅट आणि जी-सॅट या मालिकेतील उपग्रहांचं याकामी मोठं योगदान आहे. त्यामुळंच दहशतवाद्यांच्या सीमेपलीकडील तळांचं अचूक ‘लोकेशन’ आपल्याला समजलं आणि आयुधेही तितयाच अचूकपणे डागली गेली. आरआय-सॅट मालिकेतील ‘वन-बी’ हा उपग्रह इस्रोकडून लवकरच प्रक्षेपित केला जाणार असून, त्यामुळं आपल्या संरक्षणक्षमतेत वाढ होणार आहे. श्रीहरीकोटा येथून १८ मे रोजी प्रक्षेपित होत असलेला हा उपग्रह ‘ईओएस-०९’ नावानेही ओळखला जातो.
इस्रोच्या या उपग्रह नेटवर्कमधील ‘आरआयसॅट-टू बी’ हा उपग्रह रात्रीच्या अंधारात तसेच ढगाळ वातावरण असतानाही डोळ्यात तेल घालून नजर ठेवतो. ‘आरआयसॅट-टूबीआर-१’ शत्रूच्या छुप्या हालचालींवर नजर ठेवून लगेच माहिती देऊ शकतो. ‘आरआयसॅट’ मालिका म्हणजे रडार इमेजिंगसाठी वापरण्यात येणारे उपग्रह होत. या उपग्रहांना सिंथेटिक अपार्चर रडार बसवण्यात आले आहेत. उत्कृष्ट प्रतीची छायाचित्रे या रडारवरून घेता येतात. तसेच खराब हवामानातही छायाचित्रांची गुणवत्ता कमी होत नाही. ‘आरआयसॅट’व्यतिरिक्त ‘जीसॅट’ मालिकेतील उपग्रहसुद्धा संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. जीसॅट-७ हा उपग्रह विशेषत्वाने सागरातील हालचालींवर लक्ष केंद्रित करून शत्रूच्या हालचालींची माहिती देऊ शकतो. असंख्य विमानं आणि जहाजांशी हा उपग्रह संपर्क प्रस्थापित करू शकतो. ‘जीसॅट-७-ए’ हा उपग्रह वायुसेनेच्या सर्व तळांशी आणि विमानांशी संपर्क साधू शकतो. संपर्कशक्तीशी संबंधित युद्धक्षमता वाढवणारा हा उपग्रह ‘अँग्री बर्ड’ नावाने ओळखला जातो. ‘हायसिस’ या उपग्रहाच्या माध्यमातून ‘हायस्पेट्रल इमेजिंग’चं काम केलं जातं. शत्रूचे तळ, त्यांची ठिकाणं आणि संरचनेतील बदल याच्या नजरेतून निसटत नाहीत. म्हणजेच, शत्रू आपल्या देखरेखीखाली आहे.
याखेरीज ‘इमिसॅट’, ‘कार्टोसॅट’ हे उपग्रहसुद्धा शत्रूविषयी महत्त्वाची माहिती रिमोट सेन्सिंग आणि अन्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या सुरक्षा दलांना वेळोवेळी देत आहेत. लहानात लहान म्हणजे २५ ते ३५ सेंटीमीटर आकाराच्या वस्तूचा ‘हाय रिझोल्यूशन फोटो’ घेण्याची क्षमता असलेल्या आपल्या या उपग्रह मालिकेचा शत्रूने चांगलाच धसका घेतला आहे. विशेष म्हणजे, ‘इस्रो’ येत्या पाच वर्षांत ५२ नवीन उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडणार आहे. या उपग्रहांमुळं शत्रूवर देखरेख करण्याची आपली क्षमता शतगुणित होणार आहे. अंतरिक्षातील या पहारेकर्‍यांना आणि त्यांच्या निर्मात्यांना कडक सॅल्यूट!

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …