भारतीय अंतराळवीर शुभांशु शुला आपल्या ऐतिहासिक अंतराळ यात्रेनंतर मंगळवारी दुपारी पृथ्वीवर परतले आहेत. देशाच्या या यशस्वी सुपुत्राचे स्वागत करण्यासाठी १४० कोटी भारतीय डोळे लावून बसले होते. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनार्यावर उतरले आहे. शुभांशू हे सुमारे १८ दिवस अवकाशात होते, या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले.
शुभांशू शुला हे २५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन ९ रॉकेटने अंतराळात गेले होते. शुभांशू शुला हे अमेरिका, पोलंड, हंगेरीतील आपल्या ३ सहकारी अंतराळवीरांसह १४ जुलै रोजी दुपारी ४.४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे निघाले होते. आता हे सर्व अंतराळवीर १५ जुलै रोजी पृथ्वीवर उतरले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) १८ दिवस वास्तव्य केल्यानंतर, शुभांशु आपल्या एसिओम-४ मिशनमधील तीन सहकारी अंतराळवीरांसह आज दुपारी ३.०१ वाजता प्रशांत महासागरात, कॅलिफोर्नियाच्या किनार्याजवळ यशस्वीरित्या उतरले. शुभांशु यांना आयएसएसवरून पृथ्वीवर परत येण्यासाठी सुमारे साडे २२ तासांचा रोमांचक आणि आव्हानात्मक प्रवास करावा लागला. स्पेसएसचे क्रू ड्रॅगन अंतराळयान सोमवारी आयएसएसवरून वेगळे झाले होते. यानाला अंतराळ स्थानकापासून वेगळे करण्याची (अनडॉकिंग) प्रक्रिया भारतीय वेळेनुसार सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता पार पडली होती. यानंतर, अत्यंत नियंत्रित आणि नियोजित पद्धतीने यानाने पृथ्वीच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला.
या १८ दिवसांच्या वास्तव्यात शुभांशु यांनी अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग केले. अंतराळवीर शुभांशु शुला यांनी भारताच्या अॅसिओम-४ मिशनअंतर्गत सात मायक्रोग्रॅव्हिटी प्रयोग केले आहेत. यापैकी चार प्रयोग यशस्वी झाले आहेत. शुभांशू शुला यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मानवी आरोग्य आणि वनस्पतींची वाढ यावर महत्त्वपूर्ण प्रयोग केले. त्यांचे कार्य तरुण वैज्ञानिकांसाठी आणि नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरणार आहे. दरम्यान, इस्रोने शुलाच्या आयएसएसच्या प्रवासासाठी सुमारे ५५० कोटी रुपये दिले आहेत. हा अनुभव २०२७मध्ये अंतराळात जाणार्या मानवी उड्डाण कार्यक्रम गगनयानच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये फायदेशीर ठरणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे. त्यांनी आणलेला डेटा भारताच्या भविष्यातील ‘गगनयान’ मोहिमेसाठी अत्यंत मौल्यवान ठरणार आहे. त्यांच्या या प्रवासाने भारतीय तरुणांना अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नवी प्रेरणा दिली आहे. शुभांशु शुला यांच्या पुनरागमनामुळे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमात एका नव्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात झाली आहे.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र