लेख-समिक्षण

थरुरांचे काय होणार?

केरळमधील काँग्रेसचा चेहरा असणारे शशी थरूर हे सध्या भाजप नेत्यांच्या जवळीकतेवरून चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासमवेतच्या सेल्फीने ते पुन्हा राजकीय वादात सापडले आहेत. शिवाय काँग्रेसही गेल्या काही वर्षांपासून थरूर यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेताना दिसत नाही. आता केरळची विधानसभा निवडणूक दीड वर्षावर आलेली असताना भाजपचे नेते तेथे सत्ता मिळवण्यासाठी थरुर यांना आपल्या तंबूत ओढतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशावेळी ते भाजप नेत्यांच्या गळाला लागतील का? यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली नसली तरी वर्षभरात भाजपने देशात सत्तेची व्याप्ती वाढविली आहे. महाराष्ट्र, हरियानापाठोपाठ आता दिल्लीतही कमळ फुलले आहे. राज्यांत भाजपला मिळालेले घवघवीत यश पाहता पक्षाचा आत्मिविश्वास दुणावला आहे आणि ते आता बिगर भाजप शासक राज्यात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाधिक राज्य आपल्याकडे असल्यास केंद्रात मजबूत सरकार राहिल, हे भाजपच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. दुसर्‍या पक्षातील सक्षम नेत्यांना साम, दाम, दंड, भेद या रणनितीचा वापर करून त्यांना फोडण्याचे काम भाजपकडून केला जात असल्याचा आरोप होतो. एखाद्या राज्यात विरोधी पक्षासमवेत सरकार स्थापन होत असेल तर त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही म्हटले जाते. या कामात भाजपचे वरिष्ठ नेते आघाडीवर राहताना दिसतात. भाजपचे मातब्बर नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे अन्य पक्षातील नेत्यांशी अशा रितीने भेटतात की त्याविषयी राजकीय चर्चांना उधाण येते. विशेषत: पक्षावर प्रभाव असलेल्या नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तर सरकारी यंत्रणा आणि पोलिसांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला होतो आणि या माध्यमातून ते दुसर्‍या पक्षातील नेत्यांना ओढून घेतात, असे म्हटले जाते.
अर्थात या आरोपापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अपवाद राहिलेले नाहीत. पण ते विरोधी पक्षातील नेत्यांना अशा पद्धतीने भेटतात की त्यांच्यावरील आरोपांना बळ मिळत नाही.उदा. अलिकडेच ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात भेटले. त्यांनी व्यासपीठावर पवारांसाठी खुर्ची ओढून दिली नाही तर त्यांना ग्लासमध्ये पाणी देखील भरून दिले. असाच अनुभव काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेयाच्यावेळीही आला. ते मोठ्या आत्मयितेने भेटले. एकार्थाने पंतप्रधानांच्या या स्वभावात काँग्रेसचे अनेक नेते अडकत आहेत. यापैकीच एक काँग्रेसचे मातब्बर नेते आणि खासदार शशी थरूर यांचा उल्लेख करावा लागेल. दीड वर्षानंतर होणार्‍या केरळ विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ते काँग्रेसची साथ सोडून भाजपचा हात धरू शकतात असे म्हटले जात आहे.
शशी थरूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असणारी जवळीक ही पूर्वीपासूनच आहे आणि ते आता आणखी जवळ येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अर्थात ही बाब राहुल गांधी यांना कळून चुकलेली असल्याने ते शशी थरूर यांच्यावर विश्वास ठेवताना दिसत नाहीत. दुसरीकडे काँग्रेसमध्ये महत्त्व कमी होत असल्याबद्दल शशी थरुर नाराज आहेत. त्यांच्यावर कोणतिही जबाबदारी सोपविली जात नसल्याचे दिसून येते आणि यामुळेच त्यांचा भाजप किंवा पंतप्रधानांच्या दिशेने कल वाढत चालला आहे. यादरम्यान खासदार शशी थरूर यांचे एक विधान व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, “मी पक्षासाठी उपलब्ध आहे, मात्र पक्षाला माझ्या सेवेची गरज नाही. माझ्याकडे पर्याय देखील आहे.” परंतु हा पर्याय कोणता हा खरा प्रश्न आहे. साहजिकच भाजप. कारण भाजपला केरळमध्ये आजतागायत सत्ता मिळालेली नाही. अशावेळी भाजपसाठी शशी थरुर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. केरळची जनता शिक्षित आहे आणि म्हणूनच ते भाजप व संघापासून लांब राहत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला 17 टक्के मते मिळाली आणि भाजपला केवळ एकच त्रिशूर लोकसभेची जागा मिळाली. मतांची टक्केवारी वाढल्याने केरळमध्ये केवळ भाजपच नाही तर संघ सक्रिय राहत आहे. ही सक्रियता एवढी वाढली की दुसर्‍या अन्य राज्यांत एवढी सक्रियता क्वचितच दिसते. एकीकडे संघ गरजेपेक्षा अधिक शाखांची उभारणी करत भाजपसाठी मतपेढी तयार करत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून ते अनेक मोठे नेते केरळला सातत्याने भेट देत आहेत. कोणत्याही स्थितीत जिंकण्यासाठी आखण्यात येणार्‍या मोहिमांत केरळचा समावेश असून तेथे लवकरच विधानसभेचा बिगुल वाजणार आहे. यानुसार तेथे भाजप पार्श्वभूमी तयार करत आहे.
काँग्रेसला केरळमध्ये मोठा आधार आहे. वायनाडमध्ये प्रियांका वद्रा यांना मिळालेला मोठा विजय हा मोठा पुरावा आहे. शिवाय काँग्रेस सत्तेतही राहिले आहे. केरळच्या मागील विधानसभा निवडणुकीत 140 जागांपैकी माकपच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीला 90 जागा मिळाल्या आणि त्यांनी पुन्हा सत्ता स्थापन केली. काँग्रेसप्रणीत युडीएफला 41 जागा मिळाल्या आणि तो दुसर्‍या क्रमाकांचा पक्ष बनला. यानुसार केरळमधील लोकसभेच्या वीस जागा असून तेथे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला पंधरा जागा मिळाल्या. आता पुढील वर्षी म्हणजे 2026 च्या मे महिन्यांत केरळ विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. याच काळात पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणूक आहेत. भाजपला कोणत्याही स्थितीत केरळ आणि पश्चिम बंगाल मिळवायचे आहे. अर्थात देशातील बहुतांश राज्यात भाजपचे सरकार असले तरी केरळ आणि बंगालमध्ये विजय मिळवणे वाटते तेवढे सोपे नाही. मात्र काँग्रेसपासून तोडून शशी थरूर हे भाजपकडे आले तर केरळ विधानसभेला या स्थितीचा फायदा भाजपला मिळू शकतो.
शशी थरुर यांना र्कांग्रेसमध्ये मोठे पद हवे आहे. 2022 मध्ये कॉग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्यापूर्वी त्यांनी या पदावर बसण्याची इच्छा व्यक्त केली हेाती. परंतु काँगे्रसने मल्लिकार्जुन खर्गेयांना पुढे केले. अशावेळी थरुर यांनी बंडखोरीची भूमिका घेत त्यांच्याविरोधात मैदानात शड्डू ठोकला. अर्थात थरूर पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसची धुरा सांभाळण्याची तयारी केली. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. अशा अनुभवामुळे थरूर नाराज आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षातील अनेक नेते तसेच संघ परिवार देखील शशी थरूर यांना भाजमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. भाजपला यात यश मिळाले तर 2026 च्या केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसवर नक्कीच परिणाम होईल. -डॉ. जयदेवी पवार

Check Also

अमरावती विमानतळ उद्घाटनाचा पंतप्रधानांना आनंद

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती …