पुण्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही रुग्णासोबत संतापजनक प्रकार घडला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह 40 हजार रुपयांच्या बिलासाठी रोखून ठेवल्याचा प्रकार मलकापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये बुधवारी घडला. शिवसेना (उबाठा) पदाधिकार्यांनी तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हादरले. अखेर शिवसैनिकांनीच हा मृतदेह उचलून नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे (वय 68) या 5 एप्रिल रोजी घरात पाय घसरून पडल्या. डावा हात व पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून 7 एप्रिलला रात्री आठ ते दहा वाजेदरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचार सुरू असताना 9 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने कमलबाई इंगळे यांचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. याबाबत माहिती समजताच शिवसेना (ठाकरे)शहरप्रमुख गजानन ठोसर, नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्यासह शिवसैनिक रुग्णालयात दाखल झाले. मृतदेह का दिला जात नाही, याचा जाब विचारत हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा इशारा दिला. त्यानंतर रुग्णालय प्रशासन नरमले. मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला.
मृतक महिलेचा मुलगा योगेश इंगळे म्हणाले की, माझ्या आईचा पहाटे चार वाजता मृत्यू झाला. रुग्णालयाच्या संचालकांनी मृतदेह ताब्यात देण्यासाठी 40 हजार रुपये मागितले. मात्र आम्ही नकार दिला. शिवसेना पदाधिकारी आल्यानंतर मृतदेह आमच्याकडे सुपूर्द करण्यात आला. असे त्यांनी सांगितले. तर हकिमी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनुप मालपाणी म्हणाले की, 40 हजार रुपये मागितले, ही चुकीची माहिती आहे. मृतदेह कोणत्याही पद्धतीने अडविला नाही. जन आरोग्य योजनेतून उपचार करण्यासाठी आधी अप्रूव्हल घ्यावे लागते. ते पूर्ण झाले असेल तर कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इन्फरमेशन घेतल्या गेले नव्हते. त्या प्रोसेसला वेळ लागतो. आरोग्य मित्र आल्यानंतर 9.35 वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. डॉक्टर किंवा कर्मचार्यांनी पैशांची मागणी केली नाही, असे यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यातील मृत गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक मदत नाकारली आहे. सुशांत भिसे यांनी ही रक्कम नाकारली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मात्र ती मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली आहे. याआधीही भिसे कुटुंबियांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. पण ती देखील भिसे कुटुंबियांनी नाकारली होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात येत होते. पण ते भिसे कुटुंबियांनी नाकारले. ही आर्थिक मदत नाकारत त्यांनी आम्हाला पैसे नको, पण दिनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच यापुढे कधीही अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करा अशी विनंतीही गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत याची काळजी घ्या. पैसे नको, तर अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा. तसंच आता दिनानाथ रुग्णालयात डॉक्टरांनी राजीनामा दिला असला तरी रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, चुकीच्या डॉक्टर आणि रुग्णालयावर कारवाई करा, अशी मागणी भिसे कुटुंबाने केली आहे.
Check Also
अमरावती विमानतळ उद्घाटनाचा पंतप्रधानांना आनंद
14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती …