मॅडम सी. जे. वॉकर यांचे खरे नाव सारा ब्रेडलव्ह होते. त्या अमेरिकेतील पहिल्या सेल्फ मेड महिला कोट्यधीश ठरल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपला व्यवसाय उभारला आणि केवळ आर्थिक यशच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनातही मोठा वाटा उचलला.
सारा यांचा जन्म 23 डिसेंबर 1867 रोजी लुईझियाना, अमेरिका येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील गुलामगिरीतून मुक्त झालेले होते. लहान वयातच आई-वडिलांचे निधन झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात त्यांनी कपडे धुण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवला.त्या आणि त्यांची मोठी बहीण जीवंत राहण्यासाठी संघर्ष करू लागल्या. गरीबीमुळे त्या फारसे शिक्षण घेऊ शकल्या नाहीत आणि त्यांना लहानपणीच घरकामगार म्हणून काम करावे लागले. 14व्या वर्षी लग्न झाले, पण काही वर्षांतच त्यांचे पती वारले, आणि त्या एकटीच आपल्या मुलीला वाढवत होत्या.
साराला 20 व्या वर्षी केसगळतीची मोठी समस्या निर्माण झाली. त्या काळात योग्य प्रकारची वैद्यकीय सोय नसल्यामुळे त्यांना हा त्रास अधिक जाणवत होता. या समस्येवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात त्यांचे सौंदर्यप्रसाधनांच्या व्यवसायाकडे लक्ष वेधले गेले.त्यांनी अनेक वेगवेगळे केसांसाठी उत्पादने वापरून पाहिली आणि शेवटी स्वतःचेच उत्पादन विकसित केले. परंतु, त्या काळात कृष्णवर्णीय स्त्रियांना व्यवसाय करण्याची संधी दिली जात नव्हती. त्यांना अनेक ठिकाणी हेटाळणीला सामोरे जावे लागले.
त्यावेळी सौंदर्यप्रसाधने आणि मोठे व्यवसाय हे फक्त गोर्या किंवा श्रीमंत लोकांचे क्षेत्र मानले जात होते. त्यामुळे त्यांनी अनेक अडचणींवर मात करत स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्याकडे कोणतीही मोठी गुंतवणूक नव्हती, त्यामुळे त्यांना स्वतःच घराघरांत जाऊन उत्पादने विकावी लागली. त्यांनी अनेक महिलांना रोजगाराच्या संधी दिल्या आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले.
त्यांनी केवळ व्यवसायच वाढवला नाही, तर समाजसेवेसाठीही मोठे योगदान दिले. कृष्णवर्णीय महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला आणि त्यांच्या शिक्षण व सशक्तीकरणासाठी मदत केली.
मॅडम सी. जे. वॉकर यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्यांनी स्वतःसाठी मोठी संपत्ती मिळवली. 25 मे 1919 रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांची प्रेरणादायी कहाणी आजही अनेकांना स्वावलंबन आणि ध्येयनिष्ठेचा संदेश देते.
मेहनत आणि नवनिर्मितीची भावना असेल, तर कोणताही माणूस कोणत्याही परिस्थितीतून यशाचे शिखर गाठू शकतो ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
कहाणी एका ‘डोसा सम्राटा’ची
प्रेम गणपती यांचा जन्म 1973 साली तामिळनाडूतील तूतीकोरिन या खेडेगावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. …