लेख-समिक्षण

वादळ बेताल ‘ग्रोक’ चे

भारतात आता चॅटजीपीटीनंतर आणखी एका एआय मॉडेलची जोरात चर्चा असून एलॉन मस्कच्या एक्सएआय कंपनीच्या ‘ग्रोक-3’ चा गाजावाजा होत आहे. या टूलने अनफिल्टर्ड आणि धाडसी वक्तव्यांनी हाहाकार माजवला आहे. एलॉन मस्क यांच्याप्रमाणेच ग्रोकही बिनधास्त आहे. त्याला जे योग्य वाटते, ते बोलून टाकतो. अगदी प्रश्न कोण विचारत आहे, याची पर्व न करता. शिवाय कोणत्या संदर्भात विचारणा केली जात आहे, याचा विचार न करता बोलतो. यामुळे काहींचे मनोरंजन होत असले तरी काही प्रश्नही निर्माण होताहेत. या प्रकरणाने एआयकडून नैतिकता बाळगण्याच्या आणि जबाबदारपणाच्या प्रयोगाला हवा दिली आहे. नियामक संस्थेच्या देखरेखीखाली त्याला आणण्यासंदर्भात पुन्हा जोरात चर्चा सुरू झाली आहे.
भारतात आता चॅटजीपीटीनंतर आणखी एका एआय मॉडेलची जोरात चर्चा असून एलॉन मस्कच्या एक्सएआय कंपनीच्या ‘ग्रोक-3’ चा गाजावाजा होत आहे. या टूलने अनफिल्टर्ड आणि धाडसी वक्तव्यांनी हाहाकार माजवला आहे. एलॉन मस्क यांच्याप्रमाणेच ग्रोकही बिनधास्त आहे. त्याला जे योग्य वाटते, ते बोलून टाकतो. अगदी प्रश्न कोण विचारत आहे, याची पर्व न करता. शिवाय कोणत्या संदर्भात विचारणा केली जात आहे, याचा विचार न करता बोलतो. परंतु त्यांच्यासमवेत सौजन्याने प्रश्न विचारले तर तो सौजन्यतेने उत्तरे देतो. मात्र सभ्यता ओलांडली तर तुम्हाला ‘जसाश तसे’ उत्तर मिळू शकते. यामुळे काहींचे मनोरंजन होत आहे तर काहीनां अवघडल्यासारखे वाटत आहे. आपल्या भारतीयांच्या हाती एक खेळणेच आहे आणि संपूर्ण देश त्याच्याच मागे पळत असल्याचे दिसून येते.
ग्रोक-3 च्या बिनधास्त उत्तराच्या महापुरामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अर्थात ग्रोक-3 हा दिशाहीन झालेला नाही. एआय मॉडेलकडून ढोबळ उत्तर मिळणे सामान्य बाब. यास ‘हॅलुसिनेशन’ असे म्हटले जाते. एवढेच काय तर एलॉन मस्क यांना मात्र ग्रोकच्या मतांवरून कोणतेही आश्चर्य वाटलेले नाही. त्यांनी भारताच्या घटनाक्रमावर बीबीसीवरच्या एका लेखाला प्रतिक्रिया देत एक इमेज पोस्ट केली. ती पोस्ट म्हणजे ‘सर्वकाही आलबेल’. एलॉन मस्क हे ग्रोक-3 ला या जगातील सर्वात स्मार्ट आणि सत्याच्या शोधात असणारे एआय मानत आहेत. तो अन्यपेक्षा वेगळा आहे आणि ते सिद्ध झाले आहे. ग्रोक-3 लाँच करताना मस्क यांनी ते अन्य मॉडेलप्रमाणे ‘वोक’ करणार नाही असे म्हटले होते. यार्चा अर्थ ‘पॉलिटिकली करेक्ट’च्या अगदी विरुद्ध. म्हणजेच बिनधास्त, बेलगाम वक्तव्य करण्याचा स्वभाव यात फीट करण्यात आला आहे. ही त्याची नैसर्गिकता आहे. तो डिप्लोमॅटिक भाषेत सुरक्षितरित्या उत्तर देणारा नाही. तो सामान्य माणसाप्रमाणे वर्तन करतो. आपल्यासारखाच विचार, भाषा, उडाणटप्पूपणा, हास्यविनोद, मित्र, शिवीगाळ आदी स्वाभाविक गोष्टी दिसतील. बहुतांश एआय चॅटबोट हे भाषा शैली आणि दृष्टीकोन बाळगत असताना ग्रोक मात्र अनेक प्रकारच्या भूमिका घेतो. प्रोफेसर, रोमॅटिंक, आणि सेक्सही. सध्या ‘अनहिज्ड’ नावाच्या अवताराने गदारोळ माजला आहे. त्याचा अर्थ कोणतीही तमा न बाळगणे. ग्रोकने तर स्वत: मस्क, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासंदर्भात बोलताना तिघेही अमेरिकेचे नुकसान करत असल्याचे म्हटले होते. भारतीय राजकारण आणि सामाजिक मुद्दयावर ग्रोकचे मत गोंधळ माजविणारे आहे. राजकीय पक्षांनी आणि नेत्यांबाबत त्यांनी दिलेले वादग्रस्त उत्तरे सध्या चर्चेत आहेत.
ग्रोकची रचना करताना त्याच्यात बिनधास्तपणाची पेरणी देखील केली आहे. हा डेटा मस्कची दुसरी कंपनी ‘एक्स’मधून आली असून तेथे जगभरातील असंख्य यूजर बिनधास्त मत मांडत असतात. मात्र या प्रशिक्षणात आणखी काही डेटा वापरला आहे. अर्थात ‘एक्स’चा कंटेटवर त्याचा विशेषाधिकार आहे. या प्लॅटफॉर्मवर विनोद करणे, तीव्र शब्दांत मते, एकमेकांवर चिखलफेक करणारी भाषा शैली, आरोप प्रत्यारोप, फेक न्यूज, ट्रोलिग यासारख्या गोष्टींचा ग्रोकवर प्रभाव आहे. त्यामुळे जसे इनपुट असेल, तसेच आऊटपूट पाहवयास मिळेल. तुम्ही रजनीकांत यांचा रोबो पाहिला असेल. एकीकडे चांगल्या सवयी शिकत असताना चित्रपटातील व्हिलन डॅनी हे रोबोत वाईट विचार ठासून भरतात आणि याप्रमाणे रोबो विनाशकारी प्रवृत्ती दाखवतो.
तूर्त या प्रशिक्षाचा एक फायदा ग्रोकला झाला असून हिंदीसह अनेक डझनभर भाषा त्याने चांगली अवगत केली आहे. त्याची हिंदीतील भाषाशैली ही अन्य मशिनप्रमाणे औपचारिक वाटत नाही. पण एखादे एआय मॉडेल एखाद्या बाबतीत काहीही बोलू शकतो का ? आणि त्याला अशाच स्वभावात सांभाळायचे का? संवेदना नसलेली एखादी मशिन कोणाबद्दल काहीही बोलत असेल आणि त्याची मजा लोक घेत असेल तर ते कितपत योग्य आहे? या प्रक्रियेत ज्यांचे नुकसान होत आहे, त्यांचे काय? मात्र हा मुद्दा एकतर्फी नाही.
एकीकडे एखाद्याची मानहानी करणे , चुकीची माहिती पसरवणे, फेक नॅरेटिव्ह निर्माण करणे यासारखे प्रश्न असताना त्यास एआय उद्योगच चुकीचे असल्याचे मानत आहे. यासंदर्भात सॅम अल्टमॅन यांनी देखील एआयवर नियमांचा बडगा असायला हवा, असे म्हटले आहे. दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा अधिकार असून तो कायदा केवळ माणसांना लागू आहे की मशिनला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारत सरकारने देखील ‘एक्सएआय’शी संपर्क केला असून मस्क तर मस्क आहेत. अशास्थितीत त्यांच्या चॅटबोटविरुद्ध सरकारी कारवाईची शक्यता वाटत नसताना त्यांनी धक्कादायक पाउल उचलत सरकारलाच कर्नाटक उच्च न्यायालयात ओढले. त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 79(3) चा वापर करत ऑनलाइन कंन्टेटवर सेन्सॉरशीप लावल्याचा भारत सरकारवर आरोप केला आहे.
भूतकाळात गुगलच्या जेमिनी नावाच्या चॅटबोटने आपल्या नेत्यांविषयी काही वादग्रस्त मते मांडली तेव्हा सरकार नाराज झाले आणि म्हणून गुगलला माफी मागावी लागली होती. ग्रोक-3 प्रकरणाचे आणखी काही पदर उलगडणे बाकी आहे. त्यामुळे सरकारकडून त्याला इशारा दिला जावू शकतो, जसे डिसेंबर 2023 मध्ये जारी केलेल्या गाइडलाईन्सचे पालन करणे. तत्कालिन काळात सरकारने डीपफेक कंपनीला निर्देश देत आयटी कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याची तंबी दिली. शेवटी या प्रकरणाने एआयकडून नैतिकता बाळगण्याच्या आणि जबाबदारपणाच्या प्रयोगाला हवा दिली आहे. नियामक संस्थेच्या देखरेखीखाली त्याला आणण्यासंदर्भात पुन्हा जोरात चर्चा सुरू झाली आहे.-महेश कोळी, संगणक अभियंता

Check Also

अमरावती विमानतळ उद्घाटनाचा पंतप्रधानांना आनंद

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *