बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आणि खास करुन युद्धाच्या काळात आलेल्या देशभक्तीपर चित्रपटांच्या लाटेचे प्रमुख नायक म्हणून मनोज कुमार यांनी अग्रस्थान पटकावले. त्यांच्या चित्रपटांनी समाजातील विविध समस्यांचे, विशेषत: देशभक्ती आणि संघर्षाचे मुद्दे उठवले. पूरब और पश्चिम, रोटी, कपड़ा और मकान आणि क्रांति यासारख्या चित्रपटांतून त्यांनी भारतीय समाजाच्या विविध अंगांचा आढावा घेतला. हिंदी सिनेसृष्टी, सिनेरसिक त्यांचे योगदान कधीच विसरु शकणार नाही. – मानवेंद्र उपाध्याय, कलासमीक्षक
———————
भारतीय आणि खास करुन हिंदी सिनेसृष्टी आजवर अनेक दिग्गज आणि कसदार कलाकारांच्या अभिनयाने आणि योगदानाने समृद्ध होत गेली. काळाच्या ओघात यातील अनेक दुवे निखळत गेले. भारत कुमार ऊर्फ मनोज कुमार यांच्या निधनाने सिनेसृष्टीच्या गौरवशाली परंपरेला समृद्ध करणारा एक महान कलाकार काळाच्या पदराआड गेला आहे. कृष्णधवल चित्रपटांपासून ते ओटीटीपर्यंतचा सिनेसृष्टीचा प्रवास पाहण्याचे आणि त्यामध्ये मोलाचे योगदान देण्याचे भाग्य त्यांना लाभले. खासकरून त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांनी भारतीय समाजावर उमटवलेली छाप अमीट आहे. त्यांच्या चित्रपटांतून समाजातील विविध समस्यांचा, संघर्षाचा आणि देशभक्तीचा मुद्दा सशक्तपणाने मांडला गेला. ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी, कपड़ा और मकान’ आणि ‘क्रांति’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भारतीय संस्कृती, देशभक्ती आणि समाजातील संघर्ष प्रगल्भतेने मांडला गेला.
‘उपकार’ हा चित्रपट 1967 मध्ये प्रदर्शित झाला, आणि त्यानंतर त्यांना भारत कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. हा चित्रपट त्या काळातील भारतीय समाजाच्या समस्यांना समर्पित होता. विशेषतः देशातील शेतकर्यांच्या आणि सैनिकांच्या कष्टांची आणि त्यागाची गाथा सांगणारा हा चित्रपट सिनेरसिकांना कमालीचा भावला आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला. त्या काळात भारत-पाकिस्तान युद्धानंतर लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली होती. ‘उपकार’ने या भावना आणखी प्रगल्भ केल्या. या चित्रपटातील मनोज कुमार यांचा अभिनय त्यांच्या कलेविषयीच्या समर्पणाची साक्ष देणारा ठरला. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेला उत्तर देत या चित्रपटाने देशाच्या शेतकर्यांना आणि सैनिकांना गौरविले. या सिनेमाच्या संगीत आणि गाण्यांमध्ये ती भावना व्यक्त झाली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
मनोज कुमार हे मूलतः देशभक्तीपर चित्रपटांमुळे सिनेरसिकांच्या लक्षात राहिले. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण करण्याचे अत्यंत मोलाचे काम त्यांनी केले. त्यांच्या चित्रपटांनी समाजातील विविध समस्यांचे, विशेषत: देशभक्ती आणि संघर्षाचे मुद्दे उठवले. पूरब और पश्चिम, रोटी, कपड़ा और मकान आणि क्रांति यासारख्या चित्रपटांतून त्यांनी भारतीय समाजाच्या विविध अंगांचा आढावा घेतला.
‘क्रांती’ या चित्रपटातील मनोज कुमार यांचा अभिनय म्हणजे सिनेक्षेत्रात येणार्या कलाकारांसाठी आदर्श ठरला. या चित्रपटात भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील संघर्षाचा आणि ब्रिटिश साम्राज्याविरोधी लढाईचा इतिहास दाखवला आहे. मनोज कुमार यांनी जाज्वल्य देशभक्तीचे आणि ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध समाजमनात असणार्या प्रचंड विद्वेषाचे अचूक प्रतिबिंब आपल्या अभिनयातून या चित्रपटातून मांडले. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर सुमारे 16 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. नंतरच्या काळात मनोज कुमार यांनी स्वत:ला पूर्णपणे या प्रकारच्या चित्रपटांमध्ये झोकून दिले. परिणामी, त्यांच्या कामामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली.
क्रांती हा त्यांच्या काळातील एक पॉप कल्चर सेन्सेशन होता. या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या ठिकाणी क्रांती टी-शर्ट, जॅकेट, बनियान आणि अगदी अंतर्वस्त्रे विकणारी दुकाने होती. शोलेने कलाकारांच्या कपड्यांची विक्री करण्याचा ट्रेंड सुरू केला होता, परंतु चित्रपटाच्या ब्रँडसह माल बाजारात येणे हा प्रकार भारतात नवीन होता. या वस्तूंच्या प्रचंड विक्रीमुळे बॉलिवूडमधील अनेकांना चित्रपटांसाठी व्यापार करण्याचा विचार करावा लागला. पुढे जाऊन नव्वदीच्या दशकात तो संघटित पद्धतीने सुरू झाला.
मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबाद या ठिकाणी झाला. त्याच वेळी, भारत ब्रिटिश साम्राज्याच्या अधीन होता. विभाजनाच्या काळात त्यांचा परिवार भारतात दाखल झाला. त्यांचे खरे नाव हरिवंश यादव होते, पण सिनेक्षेत्रात करिअर सुरू करण्यासाठी त्यांनी मनोज कुमार“हे नाव स्वीकारले. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीमध्ये झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. यासाटी त्यांनी मुंबईतील चित्रपट उद्योगात पाऊल ठेवले. त्यांचा पहिला चित्रपट ‘कली और माली’ हा 1962 मध्ये प्रदर्शित झाला. पण त्यात त्यांना मोठे यश मिळाले नाही. पण पुढच्याच वर्षी आलेल्या ‘बिना कोई’ या चित्रपटाने त्यांना ओळख मिळाली.
मनोज कुमार यांच्या अभिनयात सच्चेपणा आणि साधेपण होते. त्यांचे पात्र प्रामुख्याने भारतीय माणसाच्या चांगुलपणाचे, सत्यतेचे, संघर्षशीलतेचे, सोशिकतेचे आणि कर्तव्यनिष्ठतेचे प्रतीक होते. त्याच्या चेहर्यावर सदैव एक गहिरा विश्वास आणि ठामपणाचा भाव असायचा.‘शहीद’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि ‘पूरब और पश्चिम’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. त्यामुळे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती सिनेमाच्या तिन्ही अंगांची त्यांना पूर्ण जाण होती. अभिनयाइतकीच त्यांची संवादफेकही अप्रतिम होती. अभिनयामध्ये शब्दांचे आणि हावभावांचे सामर्थ्य काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या सर्व चित्रपटांमधील गाणी काळाच्या कसोटीवर उतरली आहेत.
रुपेरी पडद्यावर सर्वसामान्यांचा संघर्ष मांडणार्या मनोज कुमार यांना कारकिर्दीमध्येही बराच संघर्ष करावा लागला. त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिले, परंतु ते कधीही मागे हटले नाहीत. ‘क्रांती’ चित्रपटासाठी त्यांनी आपल्या घराची आणि संपत्तीची विक्री केली. मनोज कुमार केवळ एक अभिनेता किंवा दिग्दर्शक नव्हते, तर ते एक प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या चित्रपटांनी भारतीय समाजात एक नवा दृष्टिकोन निर्माण केला आणि देशभक्तीच्या भावना लोकांच्या हृदयात रुजवल्या.2005 मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा सन्मान देऊन गौरवले होते. आज हा महान नायक अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Check Also
मल्टिप्लेक्सची मनमानी आणि सिनेमाउद्योग
मल्टिप्लेक्स थिएटर्स तिकीटाचे दर आणि शोची वेळ ठरवताना चुकत आहेत, असा सूर अलीकडील काळात सातत्याने …