लेख-समिक्षण

दीदींचे फासे, भाजपचे उसासे!

हल्दियाचे आमदार तापसी मंडल यांचा पक्षात समावेश करून तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच काळ असला तरी पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच चढाओढ सुरू झाल्याचे यावरुन दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे 12 आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या 77 वरून 65 झाली आहे. त्यामुळे भाजपाचा उधळलेला वारु रोखण्यासाठी ममतांनी टाकलेले फासे यशस्वी होताना दिसत आहेत.
हल्दियाच्या आमदार तापसी मंडल यांचा पक्षात समावेश करून तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी तापसी कोलकात्यात आल्या होत्या; पण विधान भवनातून बाहेर पडल्यानंतर त्या थेट टीएमसी कार्यालयात गेल्या. पश्चिम बंगालमध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जींना यंदा कोणत्याही किंमतीत हा डाव जिंकायचा आहे. भाजपचे अनेक आमदार येणार्‍या काळात तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात, असा दावा ममतादीदींनी केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या असून ज्या आमदार आणि नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्याशी संपर्क साधावा. 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे 12 आमदार तृणमूलच्या गोटामध्ये सामील झाले आहेत. परिणामी, विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या 77 वरून 65 झाली आहे.
निवडणुकीपूर्वी नेत्यांची पक्षांतरे ही भारतीय राजकारणातील सामान्य घटना बनली आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदारांचा तृणमूलप्रवेश हा लक्षवेधी म्हणायला हवा. विशेषतः तापसी मंडळ भाजपकडून हिसकावून घेणे हा ममतादीदींचा मोठा विजय मानला जात आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये तापसी यांचा समावेश होता. सुवेंदू यांनी तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमच्या नेत्यांना भाजपमध्ये आणून मेदिनीपूर जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनवला होता. त्यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणुकीत टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. 2023 च्या पंचायत निवडणुकीत भाजपने तृणमूल काँग्रेसवर विजय मिळवला होता. 2021 मध्ये ममता बॅनर्जींचा पराभव टीएमसी विसरलेली नाही. तृणमूलचे खासदार आणि ममता दीदींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी आधीच सूचित केले आहे की आगामी निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांना पराभूत करण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील.
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये विजयाची हॅटट्रीक साधली असली तरी आता त्या चौथ्यांदा सत्ता मिळवून विजयाचा चौकार ठोकण्याच्या तयारीत आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने इतर पक्षांच्या नेत्यांना तिकीट देऊन आपली ताकद वाढवली होती. या निवडणुकांमधील यशामुळे काँग्रेस आणि डाव्या पक्षांना हुसकावून लावत भाजपा पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष बनला. 2016 मध्ये, 294 सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपला केवळ तीन जागा जिंकण्यात यश आले होते. या निवडणुकीत टीएमसीने 294 पैकी 211 जागा जिंकल्या होत्या. परंतु 2021 मध्ये भाजपचा आकडा थेट 77 वर पोहोचला होता. 2016 मध्ये भाजपची मतांची टक्केवारी सुमारे 10 टक्के होती, पाच वर्षांनंतर 2021 मध्ये ती वाढून 38.1 टक्क्यांवर पोहोचली. 2019 लोकसभा निवडणुकांमध्येही भाजपाने या राज्यात मोठी प्रगती केली. लोकसभेच्या एकूण 42 पैकी टीएमसीने 22 जागा जिंकल्या, तर भाजपाने 18 जागा मिळवल्या होत्या. मतांच्या टक्केवारीत टीएमसीला 43% आणि भाजपाला 40% मते मिळाली, ज्यामुळे भाजपाची वाढती लोकप्रियता दिसून आली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 38.73 टक्के मते पश्चिम बंगालमध्ये मिळवली. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत 45.76 टक्के मते मिळाली होती. यानंतर आता पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध भाजप यांच्यात होणारी लढत घनघोर असणार याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये घडवून आणलेला सत्ताबदल सोपा नव्हता. डाव्या पक्षांची राजवट तब्बल 34 वर्षेया राज्यात होती. या राज्यात जमिनीच्या राजकारणाची एक खासियत आहे. विचारसरणीचे कट्टर मानले जाणारे लोकही सत्ताबदलानंतर यू-टर्न घेतात, हा इथला इतिहास आहे. ममतादीदीही त्याला अपवाद राहिल्या नाहीत. सध्या त्यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सीपीआय आणि सीपीएमसारख्या डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भरणा अधिक आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली तेव्हा टीएमसीशिवाय डावे कार्यकर्तेही भगवे वस्र परिधान करुन भाजपावासी झालेले दिसले. तापसी मंडल या 2016 मध्ये सीपीएम उमेदवार म्हणून हल्दियामधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. पण आता त्यांनी ममतादीदींच्या पक्षात प्रवेश केला आहे. डाव्यांच्या विरोधात प्रदीर्घ लढा देणार्‍या ममता बॅनर्जी यांना सत्तेची ताकद काय करु शकते, याची पूर्ण कल्पना आहे. विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी आमदारांना आपल्या बाजूने आणण्याची ममता बॅनर्जींची रणनीती आणि क्षमता या राज्यातील जनतेसह संपूर्ण देशाला अवगत आहे. 2011 ते 2021 दरम्यान काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे सुमारे 30 आमदार टीएमसीमध्ये सामील झाले होते. आता भाजपची बारी असून विधानसभा निवडणुकीनंतर या दिशेने दीदींना तात्काळ हालचाली सुरू केल्या होत्या. 2021 नंतर, रायगंजमधील कृष्णा कल्याणी, कालियागंजमधील सौमेन रॉय, बगदा येथील बिस्वजित दास, बिष्णुपूरमधून तन्मय घोष आणि कृष्णनगर उत्तरमधून मुकुल रॉय अशा पाच भाजप आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर अलिपुरद्वारमधून पहिल्यांदा आमदार झालेल्या सुमन कांजीलाल आणि हरकाली प्रोतिहेर या आमदारांनीही भाजप सोडला. आतापर्यंत भाजपचे 12 आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या14 वर्षात पक्षांतर करणार्‍या एकाही आमदारावर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई केलेली नाही.
पश्चिम बंगालमधील राजकारणात टीएमसी आणि भाजपाच्या संघर्षाने या राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर महत्त्वपूर्ण परिणाम केले आहेत. आगामी काळात या दोन पक्षांमधील स्पर्धा राज्याच्या भवितव्याची दिशा ठरवेल. पण तूर्त तरी या स्पर्धेत ममतादीदींचे पारडे पूर्वीपेक्षा अधिक जड झाल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या इशार्‍यावर राज्यातील मतदार यादीत बाहेरील व्यक्तींची नावे फसव्या पद्धतीने जोडली जात असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रात आणि दिल्लीत भाजप अशा पद्धतीने जिंकला, पण बंगालमध्ये हे चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. आता टीएमसी नेते या मुद्द्यावरून आक्रमक होत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, भाजपला फायदा व्हावा यासाठी निवडणूक आयोगाचे काही अधिकारी पश्चिम बंगालमधील विविध विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत बाहेरील व्यक्तींची नावे जोडत आहेत. अशा प्रकारच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी येणार्‍या काळात वाढत जाणार आहेत. ममता दीदींनी 2026 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 215 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने पुढील 8-10 महिन्यांमध्ये त्या भाजपला किती मोठे खिंडार पाडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. -सरोजिनी घोष, कोलकाता

Check Also

अमरावती विमानतळ उद्घाटनाचा पंतप्रधानांना आनंद

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *