राज्यात नाशिक, धुळ्यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत गुरुवारी अवकाळीने तडाखा दिला. अवकाळी पावसासोबत वीज कोसळून भंडारा जिल्ह्यातील दोन, तर यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. बीड जिल्ह्यात शेतात गेलेल्या शेतकर्यावर काळाने घाला घातला. धुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात ठिकठिकाणी शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. अवकाळी पावसासोबत वीज कोसळून भंडारा जिल्ह्यातील दोन, तर यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी येथे मनीषा भारत पुष्पतोडे (वय 32) व प्रमोद मणिराम नागपुरे (42, दोघेही रा. पाथरी), तर यवतमाळ जिल्ह्यात वसंत नरसिंग चव्हाण (वय 40) या शेतकर्याचा वीज पडून मृत्यू झाला. दोन दिवस ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहत होते. गुरुवारी मात्र ढगांचा रंग बदलला. सकाळपासून काळेभोर झालेल्या आकाशातून थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसत राहिल्या. या अवकाळीच्या पावसाने दुपारनंतरच उसंत घेतली. पावसाळी वातावरणामुळे तापमान मोठ्या फरकाने खाली घसरले. बुलढाणा जिल्ह्यातील आठ तालुक्यांना वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा बसला. सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जना येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे छत उडाले. यामुळे शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळणारा एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
बीड जिल्ह्यात दुपारी अवकाळी पाऊस पडला. केज तालुक्यातील केकाणवाडी येथे लिंबाच्या झाडावर अचानक वीज कोसळल्याने झाडाखाली थांबलेला शेतकरी ठार झाला. केकाणवाडी येथील शेतकरी देवीदास शहाजी केकाण (वय 70) हे आसरडोह रस्त्याकडील शिवारात गाय घेऊन कोठ्याकडे निघाले असता अचानक पाऊस आल्याने ते लिंबाच्या झाडाखाली अडोसा म्हणून उभे राहिले आणि तिच चूक ठरली यावेळी या झाडावर वीज कोसळली आणि शेतकरी देवीदास केकाण यांचा जागीच मृत्यू झाला. देवीदास यांच्यासोबतच गाय देखील दगावली.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यातही पाऊस झाला. विदर्भात भंडारा, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तर मराठवाड्यात वैजापूर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. नंदुरबारमध्ये बुधवारी झालेल्या पावसामुळे 25 घरांची पडझड झाली. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने गुरुवारी सलग दुसर्या दिवशी हजेरी लावली. चांदवड तालुक्यात गारपिटीने तडाखा दिला, तर निफाड तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. देवळा तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनमाड परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर, अकोले तालुक्यात वादळी वार्यासह पाऊस झाल्याने गहू, बाजरी, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.
Check Also
अमरावती विमानतळ उद्घाटनाचा पंतप्रधानांना आनंद
14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती …