लेख-समिक्षण

अमेरिकन टेरीफअस्त्राचा ‘कडकडाट’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिसिप्रोकल टॅक्स धोरणांतर्गत 2 एप्रिल रोजी जगातील 60 देशांविरोधात आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आणि जगभरात खळबळ उडाली. अमेरिकन शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली असून भारतीय शेअर बाजारातही मोठी पडझड झाली आहे. भारतावरही त्यांनी 26 टक्के आयात शुल्क लावले आहे. आयात शुल्काच्या भयामुळे आपण बचावाच्या भूमिकेत गेलो तर भारतालाही त्यातून काही साध्य होणार नाही. मात्र आपण या आव्हानाचा मुकाबला करू शकतो हे पूर्वीच्या उदाहरणांवरून स्वत: ला पटवून दिले, तर आपण कथित संकटातून बाहेर पडू शकतो. ज्या क्षेत्रांना आज फटका बसताना दिसतो आहे तेच भविष्यात आपले सगळ्यात मोठे बलस्थान झाल्याचे दिसून येईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले मित्र देश आणि मित्र नसलेले किंवा ज्यांच्याशी फारसे सख्य नाही अशा देशांनाही जशास तसे आयात शुल्क लावण्याचे जाहीर केले. याचा तक्ताच त्यांनी प्रसिद्ध केला. ट्रम्प यांचा निर्णय धाडसी आहे, म्हणणे कदाचित काहींना खटकू शकते, तथापि, देश म्हणून अमेरिकेचा प्रथम विचार करण्याचा त्यांना तो अधिकार आहे व त्यांच्या निर्णयाचे जे काही भले बुरे परिणाम होतील, त्याला सामोरे जाण्याची तयारी अमेरिकेलाही ठेवावी लागेल.
अमेरिका जागतिक महासत्ता असल्यामुळे त्यांच्या साध्या निर्णयामुळे जगात उलथापालथ होत असते. येथे तर ट्रम्प यांनी सरळ व्यापार युद्धच सुरू केले असल्यामुळे जगात बर्‍याच घडामोडी घडणार आहेत. त्याकडे बघत कुढत बसायचे, अमेरिकेच्या नावाने बोटे मोडत ट्रम्प यांना शिव्या शाप घालायचे की या कथित आपत्तीतून आपल्याला वेगळे आणि चांगले काही करता येऊ शकते का याचा शोध घ्यायचा हा ज्या त्या देशाचा विषय असणार आहे.
भारतावरही त्यांनी 26 टक्के आयात शुल्क लावले आहे. भारतातील राजकीय विद्वान ’बघा मोदींच्या मित्राने काय केले’ हे भारतीयांच्या निदर्शनास आणून देण्यात कोणती कसर सोडत नसल्याचे दिसते. एखादे मोठे स्थित्यंतर होत असते तेव्हा कोणताही देश अथवा तेथील सरकार आपल्या देशातील उद्योगांचे संरक्षण करण्याचे उपाय करण्यास सुरुवात करत असतो. अमेरिकेच्या निर्णयानंतर अनेक प्रगत देशांनी तिखट प्रतिक्रिया दिली. याची किंमत अमेरिकेलाच चुकवावी लागेल असा सर्वसाधारण सूर होता. तथापि, भारत आणि ब्राझिल या दोन देशांनी मात्र तातडीने व्यक्त होणे टाळले. भारतातील तज्ज्ञांनी वारंवार म्हटले आहे, की काही विशिष्ट क्षेत्रे सोडली तर याचा भारतावर फारसा परिणाम संभवत नाही. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यानंतर किंबहुना त्या अगोदरच भारताने काय घडू शकते याचा विचार करून पर्यायी उपाय योजना सुरू केल्याचे वाटते. गेल्या काही काळात विविध क्षेत्रांतील उद्योजकांनीही अमेरिकेच्या जशास तसे कराबाबत आपल्या भूमिका सरकारकडे मांडल्या आहेत. यातील काही जणांच्या म्हणण्यानुसार, भारतातील उद्योग जगताने टॅरिफ संरक्षणाऐवजी जागतिक स्पर्धेत आपली गुणवत्ता वाढवणे गरजेचे आहे. यासाठी संशोधन आणि विकासावर विशेष भर दिला जायला हवा आहे. ट्रम्प यांच्या धोरणाचा भारताच्या टेक्सटाइल, वाहनांचे सुटे भाग, हिरे आणि आभूषणे तसेच कृषी उत्पादनांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
अर्थात, भारतावर त्यांनी अन्य देशांच्या तुलनेत कमीच आयात कर लावला आहे; पण त्याचे समाधान मानण्यापेक्षा आपले फार नुकसान होत नसल्याची सकारात्मक बाब ध्यानात घेत ही भरपाई कुठून करता येईल किंवा त्याहीपुढे यातून संधी शोधत आपले उत्पन्न कसे अधिक वाढवता हे पाहायला हवे.
राजकीय आघाडीवर जो गदारोळ होणार आहे त्याला फारसा अर्थ नाही. एसबीआयच्याच अलीकडच्या अहवालानुसार, भारताच्या निर्यातीवर तीन ते साडेतीन टक्के प्रभाव पडणार आहे. भारतासह अन्य आशियाई देशही ट्रम्प यांच्या निर्णयाच्या फेर्‍यात सापडले आहेत. उलट आता गमतीने असेही म्हटले जाते आहे, की अन्य देशांना ट्रम्प यांनी जे आयात शुल्क लावले आहे त्याच्याशी तुलना करता त्यांनी आपले मित्र असलेल्या मोदींना डिस्काउंटच दिला आहे. यातील गमतीचा भाग सोडला आणि स्वतः ट्रम्प यांनीच ती गंमत केली असली तरी भारताला त्यांच्या मैत्रीच्या भरवशावर अवलंबून न राहता युरोप, आशियाई देशांशी व्यापार वाढवण्याच्या पर्यायावर विचार करण्याची आणि व तो उपाय करण्याची संधी आहे.
गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला 78 अब्ज डॉलरची निर्यात केली होती. ही भारताच्या एकूण निर्यातीच्या 18 टक्के होती. भारतातील ज्या फुटकळ क्षेत्रावर परिणाम होणार आहे तो झटका सहन करण्याची भारताची निश्चितच क्षमता आहे. अन्य बाजारांवर लक्ष केंद्रित करून त्यातून सावरता येऊ शकते. अमेरिका जर आपल्या कंपन्यांच्या हिताची चिंता असेल तर भारत तेच करेल. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा नवा मार्ग शोधलाच जातो. किंबहुना कोणतीही समस्या जेव्हा जन्म घेते तेव्हा त्यासोबतच तिच्यावरचा उपायही आलेला असतो हे भूतकाळात आपण अनुभवले आहे. सुपर कॉम्प्युटरच्या वेळी आणि क्रायोजनिक इंजिन तंत्रज्ञानाच्या वेळी अमेरिकेच्या दबावाने हे तंत्रज्ञान भारताला नाकारले गेले, मात्र भारताने ते स्वत: विकसित केले.
अमेरिकेने केवळ भारतच नव्हे तर अनेक देशांशी युद्ध सुरू केले आहे. त्यामुळे निर्यात घटणार आहे. किमती वाढणार आहे व त्याचा अमेरिकेच्या नागरिकांनाही फटका बसणारच आहे. तुम्ही झाडाच्या कितीही वरच्या भागात जाऊन बसलात आणि सगळ्यात वर स्थापित झाल्यावर स्वतःला सुरक्षित मानू लागलात तरी झाडाच्या मुळाला हादरा बसला तर वरचा कोणीही ढळल्याशिवाय राहत नाही.
जागतिक व्यापारात एक नवीन व्यवस्था आणण्याच्या दिशेने ट्रम्प यांचा प्रवास असला तरी हा अविचार करताना त्यांनी काही विचार निश्चितच केला असणार. मात्र आपण जे करतो आहोत त्यातून अमेरिकेचा आर्थिक पाया कमकुवत होणार आहे हे त्यांच्या ध्यानात आलेले दिसत नाही. भारतासोबत व्यापार संबंध बिघडवून त्यांना लाभ होणार नाही. आयात शुल्काच्या भयामुळे आपण बचावाच्या भूमिकेत गेलो तर भारतालाही त्यातून काही साध्य होणार नाही. मात्र आपण या आव्हानाचा मुकाबला करू शकतो हे पूर्वीच्या उदाहरणांवरून स्वत: ला पटवून दिले, तर आपण कथित संकटातून बाहेर पडू शकतो. ज्या क्षेत्रांना आज फटका बसताना दिसतो आहे तेच भविष्यात आपले सगळ्यात मोठे बलस्थान झाल्याचे दिसून येईल.-अभिजित कुलकर्णी

Check Also

अमरावती विमानतळ उद्घाटनाचा पंतप्रधानांना आनंद

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *